देवेंद्र ०३; फडणवीसांचा नाद करायचा नाय…

महाराष्ट्रात फडणवीसांनी नेतृत्वाची उणीव भासू दिली नाही.

देवेंद्र ०३; फडणवीसांचा नाद करायचा नाय…

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची आज विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली. भाजपाचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. ही फडणवीस यांच्या तिसऱ्या टर्मची नांदी आहे. उद्या ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील याबाबत आता कोणतीही शंका उरलेली नाही. गेली पाच वर्षे ज्याचे राजकारण संपवण्यासाठी विरोधकांची सगळी शक्ती खर्च झाली तोच नेता आता स्वत:च्या पक्षाच्या १३२ आमदारांच्या भक्कम पाठबळावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने राज्याच्या सर्वोच्च सत्तापदावर बसणार आहे. २०१९ साली जनमताचा अनादर करून सत्ता हिसकावणाऱ्यांचा हिशोब असा जनतेच्या कृपेने चुकता झालेला आहे.एक वर्तुळ पूर्ण झालेले आहे.

 

२०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपा-शिवसेनेने एकत्रिकपणे लढवली होती. तरीही उद्धव ठाकरे यांना भाजपाची साथ सोडण्याची आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसण्याची दुर्बुद्धी झाली. २०१९ चे निकाल लागल्यानंतर फडणवीस उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. ठाकरे फोन उचलत नव्हते. एका पाठोपाठ एक असे १७ कॉल केल्यानंतरही ठाकरे दाद देत नसल्यामुळे पुढे काय होणार याचा अंदाज फडणवीसांना आला होता. ठाकरेंनी खंजीर खुपसून मिळवलेले मुख्यमंत्री पद औट घटकेचे ठरले. नशीब एकदा साथ देते, परीश्रमाने, क्षमतेने मिळते ते टिकाऊ असते. यावर फडणवीसांच्या गटनेतेपदी निवडीने शिक्कामोर्तब होते आहे.

२०२४ मध्ये याची पुनरावृत्ती एकनाथ शिंदे यांनी टाळली त्यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर शिंदे थेट साताऱ्यातील त्यांच्या गावी रवाना झाले. तिथून पुढे सहा दिवस त्यांचा फडणवीसांसोबत कोणताही संपर्क झालेला नव्हता. घशाला संसर्ग झाल्यामुळे ते काल ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तिथून ते वर्षा निवासस्थानी आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले, मंत्रिमंडळात सहभागी होण्याची विनंती केली. शिंदेंनी ती मान्य केली. ‘ही दिलदारी त्यांनी आधी दाखवायला हवी होती’, ‘जर निकाल लागल्यावर लगेच केले असते तर ते हिरो झाले असते’, अशा प्रकारची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. परंतु आता या चर्चेला कोणताही अर्थ उरलेला नाही. शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत शेवट गोड केला. ‘देर आये दुरुस्त आये’. ते उद्धव ठाकरेंसारखे वागले असते तरी सरकार स्थापन झाले असते, हे सत्य आहे, परंतु ते वागले नाहीत हे महत्वाचे. त्यांनी हिंदुत्वासाठी दिलेल्या जनादेशाचा मान राखला.

भाजपा आणि शिवसेना हे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरेंनी मविआची सत्ता आल्यापासून भगवे हिंदुत्व हिरव्या चादरीत गुंडाळले होते. चादरीत गुंडाळलेले हिंदुत्वच ज्वलंत आहे, असा दावा करीत ते फिरत होते. राजकीय सोयीसाठी ठाकरेंनी चोखाळलेली वाट हिंदुत्वाचे नुकसान करून गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जळजळीत विचार ऐकणारा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत मतांसाठी मौलवींच्या बैठका घेत असल्याचे चित्र महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. स्वार्थासाठी भगव्याला फडके ठरवणाऱ्या ठाकरेंचे मतदारांनी पोतेर केले. परंतु त्यांच्या या खेळीने हिंदुत्व कमजोर केले हे विसरता येत नाही. एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यामुळे याची पुनरावृत्ती टळली.

फडणवीसांचा संघर्ष पाच वर्षांचा आहे. मविआची सत्ता आल्यानंतर त्यांनी सांभाळलेले विरोधी पक्षनेतेपद हा त्यांच्या आय़ुष्यातील सर्वात लखलखीत असा राजकीय अध्याय आहे. फडणवीसांचे नेतृत्व या अडीच वर्षांच्या काळात अधिक उजळून आले. अकेला देवेंद्र या काळात मविआच्या सरकारला जड गेले. संकटाच्या काळात ते डगमगले नाहीच, उलट सत्ताधाऱ्यांचे पाय लटपटतील असा दमदार परफॉर्मन्स त्यांनी दिला. कोविडच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून फेसबुक लाईव्हवर सरकार चालवत असताना फडणवीस पायाला भिंगरी बांधल्यासारखे राज्यभर फिरत होते. लोकांचे अश्रू पुसत होते.

हे ही वाचा:

सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेणार!

जम्मू- काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात लष्करी चौकीवर ग्रेनेड हल्ला

विरोधक देशविरोधी कारवाया करत आहेत… दक्षिण कोरियात गोंधळ

ताज महाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ

 

सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष अधिक तीव्र झाला. जातीवरून त्यांना टार्गेट करण्यात आले. मनोज जरांगे नावाचे प्रकरण त्यांच्यावर सोडण्यात आले. हा माणूस सकाळ संध्याकाळ फडणवीसांना शिव्या घालण्याचे काम न चुकता करत होता. तरीही फडणवीसांनी संयम ढळू दिला नाही. या संपूर्ण काळात विरोधक त्यांची मजा बघण्याचे काम करत होते. त्यांच्या परिवाराला टार्गेट करण्याचे काम करत होते. तरीही डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखे फडणवीस वावरत होते.

आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागतोय याचे भानही विरोधकांना नव्हते. खरे तर एकदा तोंड पोळल्यावर माणसं सुधारतात. उद्धव ठाकरे सत्तेवर असताना म्हणत होते की, ‘हिंमत असेल तर सरकार खाली खेचून दाखवा’. फडणवीसांनी तेव्हा उत्तर दिले होते, ‘सरकार जेव्हा बुडा खालून जाईल ना, तुम्हाला कळणार ही नाही’. २०२२ मध्ये फडणवीसांनी आपला शब्द खरा करून दाखवला. अकेला देवेंद्र काय करू शकतो याची झलक दाखवली. तरीही पुन्हा त्यांच्या नादाला लागण्याचा आत्मघात विरोधकांनी केला. सत्तेवर आल्यानंतर एकनाथ शिंदे राहिले बाजूला, विरोधकांनी जरांगेंना अंगावर सोडून पुन्हा फडणवीसांना टार्गेट केले.

लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा झाला खरा, परंतु विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाला. मविआचे तीन तेरा झाल्याचे चित्र आहे. निवडणूक निकाल पाहून उर बडवण्याची वेळ मविआच्या नेत्यांवर आलेली आहे. हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रात आलेली महायुतीची सत्ता ही संघाच्या अथक प्रयत्नांमुळे आली. संघ जर पूर्ण ताकदीने मैदानात उतरला नसता तर हे अशक्य होते. ही बाब शत प्रतिशत सत्य असली तरी नेतृत्व हा घटक कायम महत्वाचा असतो. संघाने जे परिश्रम हरीयाणा आणि महाराष्ट्रात केले, तेवढेच प्रयत्न झारखंडमध्ये केले होते. परंतु तिथे यश मिळाले नाही कारण नेतृत्वाचा अभाव होता. महाराष्ट्रात फडणवीसांनी नेतृत्वाची उणीव भासू दिली नाही.

महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या विजयात नि:संशय फडणवीसांचा सिंहाचा वाटा होता. तरीही त्यांच्या जागी मुख्यमंत्री पदावर अमुक तमुकची वर्णी लागणार अशा कंड्या वारंवार उठवल्या जात होत्या. परंतु संघ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. केंद्रीय नेतृत्वानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यातून देवेंद्र ०३ चा मार्ग निर्वेध झाला.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version