जंतर मंतर ते तुरुंग, व्हाया शीशमहल…

केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराबाबत ओरड करणारा काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देतोय

जंतर मंतर ते तुरुंग, व्हाया शीशमहल…

देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी २०११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले. आंदोलनातून निर्माण झालेल्या जबरदस्त प्रभावासह हे आंदोलन हायजॅक करण्यात आले. अण्णांचा व्यवस्थित कडेलोट करून अरविंद केजरीवाल नावाच्या धूर्त नेत्याने आम आदमी पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. आंदोलनाच्या लाटेवर दिल्लीत सत्ता काबीज केली. दारु घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केजरीवाल यांना काल अटक करण्यात आली आहे. जंतर-मंतर ते तुरुंग असा केजरीवाल यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

जंतर मंतर येथे अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू झाले तेव्हा देशात यूपीएची सत्ता होती. डॉ.मनमोहन सिंह पंतप्रधान असले तरी सत्तेची सूत्र काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या हाती होती. भ्रष्टाचार टिपेला पोहोचला होता. एका पाठोपाठ कोलगेट, २-जी, थ्री-जी, जीजाजी असे एका पाठोपाठ एक घोटाळे बाहेर येत असल्यामुळे सरकारचे थोबाड साफ काळे झाले होते. भ्रष्ट सत्ताधाऱ्यांकडून देशाची लूट सुरू आहे, अशा प्रकारची भावना जनमानसांत निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या अण्णांच्या आंदोलनाला देशवासियांचा पाठीबा मिळाला असता तर नवल नव्हते.

अण्णांचे हे आंदोलन म्हणजे देशातील तरुणांसाठी आशेचा किरण बनले होते. दिल्ली अभूतपूर्व मंतरलेला माहोल बनला होता. आपआपल्या वैचारिक चौकटी बाजूला ठेवून तरुण या आंदोलनात सामील झाले होते. यात डावे-उजवे असा भेद उरला नव्हता. भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत संपवायचा असा चंग बांधून तरुणाईने कंबर कसली होती. हे आंदोलन देशाला एक नवी दिशा देणार याची जनतेला जणू खात्रीच पटली होती.

अण्णा नही आंधी है, देश का दुसरा गांधी है… या घोषणा याच मानसिकतेतून निर्माण झाल्या. अण्णा यांना दुसरा गांधी म्हणणे म्हणजे या आंदोलनाला दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई म्हणण्यासारखे होते. लोकांनी तेही मान्य केले. आंदोलनात सामील असलेले नेते राजकारणापासून दूर आहेत, ही जनतेच्या दृष्टीने जमेची बाब होती. हीच या आंदोलनाची ताकद बनली होती.
लोकांचा हा वाढता पाठिंबा आपल्याला सत्तेपर्यंत नेऊ शकतो याची खात्री झाल्यामुळे केजरीवाल यांनी राजकारणापासून अंतर ठेवण्याच्या नियमाला चूड लावली. आम आदमी पार्टी नावाची चूल मांडली. राजकारणात जाणार नाही, असा दावा करून राजकारणात गेले. मुख्यमंत्री पद घेणार नाही, असा दावा करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. सरकारी बंगला घेणार नाही, असा दावा करणाऱ्या केजरीवाल यांनी जनतेच्या करांचे कोट्यवधी रुपये खर्च करून शीश महल बनवला. मुलांच्या डोक्यावर हात ठेवून घेतलेल्या सगळ्या शपथांचाही केजरीवाल यांना विसर पडला.

शीशमहलमध्ये पडदे, कमोड, मार्बलवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. बंगल्याच्या नुतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च आला असा आरोप मीडियाकडून होत असताना काँग्रेस नेते अजय माकन यांनी मात्र हा खर्च १७१ कोटी रुपये असल्याचा दावा केला. शीला दिक्षित यांच्या संपूर्ण कॅबिनेटच्या घरांवर केलेल्या खर्चापेक्षाही हा खर्च जास्त आहे, असा आरोप माकन यांनी केला. त्याच भ्रष्टाचार शिरोमणी केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर काँग्रेसला कळवळा आलेला आहे.

दारु घोटाळाप्रकरणी आजवर १७ जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यात आम आदमी पार्टीचे सत्येंद्र जैन, मनिष सिसोदीया, संजय सिंह हे नेते तुरुंगात गेले. केजरीवाल यांनी भाजपासमोर जबरदस्त आव्हान निर्माण केले असल्यामुळे भाजपाने आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर ही कारवाई केल्याचा कांगावा देशभरातील विरोधक करीत आहेत. प्रत्यक्षात या तमाम नेत्यांना जामीनासाठी केलेल्या तमाम याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सिसिदीया यांनी दारु घोटाळ्यात पुरावे सापडू नयेत म्हणून किती मोबाईल नष्ट केले याची मीडियामध्ये प्रचंड चर्चा झाली. जर काही काळेबेरे नव्हते तर सिसोदीया कसले पुराने नष्ट करत होते, या प्रश्नाचे केजरीवाल यांचे समर्थन करणाऱ्यांना उत्तर द्यायला हवे.

दिल्लीतील केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराबाबत ओरड करणारा काँग्रेस पक्ष अटक झाल्यानंतर मात्र त्यांना पाठिंबा देतोय. काँग्रेसची भूमिका राज्यात एक आणि देशात एक असते. प.बंगालमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी तृणमूलच्या विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचे जोरदार समर्थन करतात, त्यांचे मंदबुद्धी नेते राहुल गांधी मात्र भाजपावर ईडीच्या दुरुपयोगाचा आरोप करतात. ममता बॅनर्जी या इंडी आघाडीच्या घटक असल्याचा दावा करतात.

हे ही वाचा:

कर्नाटक: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १७ पैकी ११ उमेदवार मंत्र्यांचे नातेवाईक!

केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १६ जणांना अटक!

चांद्रयान-२ अजूनही देतेय चंद्राची माहिती!

रोज तोंड उचकटून अनेक विषयांवर बोलणारे संजय राऊत केजरीवालांच्या विषयावर बोलणार नाहीत हे शक्यच नव्हते. अण्णा हजार कुठे आहेत, असा प्रश्न पडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना ज्यांच्यापासून धोका आहे, त्यांना अटक केली जात असल्याचा दावा, राऊत यांनी केलेला आहे. अण्णा हजारेंनी केजरीवाल प्रकरणात अत्यंत सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे. भ्रष्टाचार आणि दारु या दोन्हीला आपला विरोध आहे. दारु घोटाळ्याचा आपण सुरूवातीपासून विरोध केला होता. केजरीवाल यांना पत्रही पाठवले होते. परंतु त्यांनी दखल घेतली नाही, जे करायचे तेच केले. थोडक्यात अण्णांच्या केजरीवाल यांच्याबद्दलच्या भावना भोगा आपल्या कर्माची फळे… अशाच आहेत. अशाच प्रकारची प्रतिक्रिया केजरीवालांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांनी व्यक्त केलेली आहे.

अरविंद केजरीवाल यांनाही ते ठाऊक आहे. त्यामुळे अटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका त्यांनी मागे घेतली. सर्वोच्च न्यायालयासमोर ठोस पुरावे आहेत, त्यामुळे याचिका करून तेच होणार जे जैन, सिसोदीया आणि संजय सिंह यांच्या याचिकेनंतर झाले, याची उपरती केजरीवाल यांना झालेली आहे. केजरीवाल यांच्यावर कारवाई झाल्याने इंडी आघाडीतील नेते प्रचंड कळवळायला लागले आहेत. काँग्रेस, तृणमूल, उबाठा, सगळेच. कारण केजरीवाल यांच्या दारु घोटाळ्याप्रमाणे यापैकी प्रत्येकाची एक दुखरी नस आहे. प्रत्येकाने तुरुंगापर्यंत जाणारा मार्ग स्वकर्तृत्वाने आधीच निर्माण करून ठेवला आहे. आपण तुरुंगात जाऊ तेव्हा आपल्या बाजूनेही ओरडायला कुणी तरी हवे म्हणून सगळे केजरीवाल यांच्यासाठी ओरडतायत. केजरीवाल यांना अटक झाली तरी दिल्ली रस्त्यावर उतरेल अशी दर्पोक्ती पक्षाचे नेते करत होते. प्रत्यक्षात आम आदमी पार्टीचे मूठभर कार्यकर्ते आणि भविष्यात केजरीवाल मार्गाने जाण्याच्या भीतीमुळे भयकंपित झालेल्या नेत्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. अण्णा हजारे यांनी २०११ मध्ये देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचे स्पप्न पाहिले होते. ते प्रत्यक्षात आणण्याचे काम मोदी करतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version