ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीविषयी न्यायालयात याचिका

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रातील जनता सतत खोके पुराण ऐकते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांनी किती खोके घेतले याचा हिशोब ठाकरे पितापुत्र देतायत. परंतु आता मातोश्रीवर किती खोके पोचायचे याचा हिशोब उद्धव ठाकरे यांना द्यावा लागणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. एड्. गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेवर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि आर.एन.लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

महाविकास आघाडी सरकार गेल्यापासून आदित्य ठाकरे राज्यात फिरून फिरून शिंदे गटाकडून खोक्यांचा हिशोब मागतायत. शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी खोकेसुरांचा वचपा करण्याची घोषणा केली होती. खोके घेण्याची परंपरा नेमकी कोणाची याचा फैसला आता होणार आहे. मातोश्री एक, मातोश्री दोन, ट्रस्ट असलेल्या प्रबोधन प्रकाशनच्या नावावर महत्वाच्या लोकशनवर मिळवलेले प्लॉट, कर्जतमधील फार्म हाऊस, महागड्या लग्झरी कार, अनेक शेल कंपन्यात केलेली गुंतवणूक, रायगड जिल्ह्यातील जमीनी अशी यादी खूप मोठी आहे.

एकेकाळी ट्रस्ट असलेले प्रबोधन प्रकाशन गुपचूप खासगी कंपनीत रुपांतरीत करण्यात आले. त्यातले शेअर मोठ्या
प्रमाणात तेजस ठाकरे यांच्या नावावर आहेत. अशा अनेक आरोपांचा कच्चाचिठ्ठा या याचिकेत मांडण्यात आला आहे.
कोविडच्या काळात नामांकीत माध्यमांना तोटा सहन करावा लागला, परंतु या काळात सामनाने ४३ कोटींची उलाढाल केली, ११ कोटी ५० लाखांचा नफाही कमावला. हा उघड उघड काळापैसा पांढरा करणारा प्रकार आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

एमसीए निवडणुकीत राजकारणी जिंकणार की संदीप पाटील?

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

 

याचिकाकर्ते हे एकेकाळी ठाकरे यांचे व्यवसाय बंधू होते. राजमुद्रा या नावाने त्यांची प्रिंटींग प्रेस होती. ठाकरेंच्या मागील पिढीकडे एक एम्बेसिडर आणि जीप एवढ्या गाड्या होत्या. मार्मिक हे पाक्षिक आणि मुद्रणालय हा एकमेव व्यवसाय होता. त्यातही दोन बंधू भागीदार होते. अशा परीस्थिती आमची मजल फियाटवरून क्वालीसपर्यंत आली परंतु ठाकरे कुटुंबियांकडे मुंबई, रायगड, नवी मुंबईत कोट्यवधींची स्थावर जंगम मालमत्ता कुठून आली. उत्पन्नाचा कोणताही मार्ग उपलब्ध नसताना जमवलेली हा माया म्हणजे निव्वळ भ्रष्टाचाराच्या मार्गाने जमवलेला काळा पैसा असून त्याची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मे २०२० मध्ये विधान परिषदेसाठी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात १४३ कोटी २६ लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात १६ कोटी पाच लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. हे दोघे पिता-पुत्र नेमका काय उद्योगधंदा करतात हे महाराष्ट्राला माहीत नाही. परंतु त्यांच्याकडे असलेली ही गडगंज प्रॉपर्टी आली कुठून? असा याचिकाकर्त्यांचा सवाल आहे.

प्रतिज्ञापत्रात एकही कार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मग ते वापर असलेल्या महागड्या कार कोणाच्या मालकीच्या आहेत. त्या उद्धव ठाकरे यांना का वापरायला दिल्या आहेत? संजय राऊत वापरत असलेल्या कार उपनगरातील एका बड्या बिल्डरच्या मालकीच्या आहेत, असे दोन महीन्यांपूर्वी ईडीने टाकलेल्या धाडीत उघड झाले आहे. इथेही तसाच मामला असण्याची शक्यता आहे.

शिंदे गटावर जेव्हा आदित्य ठाकरे खोक्यांचा आरोप करत होते. ५० खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या जात होत्या. शिंदे गटाकडून या आरोपाला खासदार राहुल शेवाळे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात उत्तर दिले, महापालिकेतून पोहोचवलेल्या खोक्यांवरच युवराज आदित्य ठाकरे मोठे झाले आहेत, असे प्रत्युत्तर शेवाळे यांनी दिले होते. शेवाळे जे म्हणाले आणि याचिकाकर्त्या गौरी भिडे जे म्हणाल्या त्यात फरक काहीच नाही.

ठाकरे गटावर जेव्हा आरोप होतात तेव्हा हा मराठी अस्मितेवर हल्ला असतो, महाराष्ट्राविरुद्ध केलेले कारस्थान असते. कोकणात सध्या हेच चालले आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध सुमारे २०० कोटीच्या बेनामी मालमत्तेप्रकरणी चौकशी सुरू आहे. उद्धव गटाचे शिवसैनिक या चौकशीविरुद्ध मोर्चे काढतायत.

शिवसेनेच्या फुटीनंतर मातोश्रीवर सतत शिवसैनिक येत असतात, परंतु त्यांना भेटण्याचा उद्धव यांचा उत्साह आता आटलेला दिसतोय, बुलढाण्याहून मातोश्रीपर्यंत ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेल्या शरद हाडे या शिवसैनिकाला ठाकरेंची भेट मिळाली नाही. पण मेलो तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे हा शिवसैनिक म्हणाला आहे. हेच शिवसैनिक नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर मोर्चे आणि आंदोलन करण्यासाठी मैदानात उतरतात. मराठी अस्मितेच्या कथा ज्यांना खऱ्या वाटतात, अशीही मंडळी आहेतच. हनुमान चालीसा प्रकरणात मातोश्री समोर खास उद्धव ठाकरे यांच्यासाठी बॅटींग करणाऱ्या आणि अजून घराच्या प्रतिक्षेत असलेल्या चंद्रभागा आजी एकट्याच नाहीत.

मराठी तरुणांना शिवसेनेने वडापावच्या गाड्या लावून रोजगार दिला. आता उद्धव ठाकरे यांनी कोट्याधीश होण्याचे क्लासेस सुरू करावेत. त्यासाठी हवी तर मनोहर जोशी यांची मदत घ्यावी. अगदी नेहमीप्रमाणे घरबसल्या हे फेसबुक लाईव्ह केले तरी चालेल. आदित्यही या कामी मदत करू शकतील. उद्धव ठाकरे यांच्यात दडलेल्या उद्योजक या निमित्ताने लोकांच्या समोर येऊ शकेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version