काळू- बाळूंची कन्स्पिरसी थिअरी

विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीकडून एकत्रितपणे EVM च्या बोंब ठोकायची सुरूवात

काळू- बाळूंची कन्स्पिरसी थिअरी

२०२४ च्या लोकसभा निवडणुकी तोंडावर असताना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर नांगी टाकल्याचे चित्र आहे. विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीने एकत्रितपणे EVM च्या बोंब ठोकायची सुरूवात केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ५ ऑगस्टला ही सुरूवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, शिउबाठाने त्यांच्या सुरात आज सूर मिळवला. १ सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या बैठकीपूर्वी हा EVM हॅकचा विषय तापवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील काळू-बाळू करतायत.

चांद्रयान- ३ च्या यशामुळे सर्वसामान्य भारतीयांना प्रचंड आनंद झाला असला तरी काही जणांची पोटदुखी चाळवली आहे. एक बटण दाबून चंद्रावर चांद्रयान उतरवणे शक्य असेल तर EVM मतदारांनी कोणाला मतदान करायचे हे ठरवणे शक्य का होणार नाही? असा सवाल माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी यावर संपूर्ण अग्रलेख खरडला आहे. आव्हाडांचा तर्क त्यांच्या कुशाग्र मेंदूतून निपजला आहे, तर सामनाच्या अग्रलेखाला एका युट्युब व्हिडीओचा आधार आहे.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला धूळ चारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लखलखीतपणे लोकांसमोर आले. काँग्रेसला हा पराभव पचवता आलेला नाही. तेव्हापासून भाजपाचा विजय डागाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

EVM ची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया या सार्वजनिक उपक्रमातील कंपनीने केली. २०१४ मध्ये भाजपाला मिळालेल्या दैदीप्यमान विजयानंतर या कंपनीत काम करणाऱ्या सईद शुजा नावाच्या कर्मचाऱ्याने लंडनमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद युरोपच्या इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने आयोजित केली होती. या आयोजनामागे काँग्रेस असण्याची दाट शक्यता आहे, कारण काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती.
EVM हॅक करून भाजपाने २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकली असा दावा या शुजाने पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस पक्षाने या पत्रकार परिषदेनंतर ‘नरो वा कुंजरोवा’ अशा भूमिका घेतली. ‘आम्ही या दाव्याचे समर्थन करत नाही आणि नाकारतही नाही’, असे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी जाहीर केले.

शूजा या पत्रकार परिषदेत फक्त EVM बाबत बोलला नाही. त्याने ही कथा आणखी रंगवली. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या सुद्धा त्याने EVM हॅकशी जोडली. ‘गोपीनाथ मुंडे यांना EVM हॅकबाबत माहिती होती, हे कारस्थान ते जगाच्या समोर आणणार होते म्हणून त्यांची हत्या झाली. गौरी लंकेश हिने ही बातमी प्रसिद्ध करण्याचे मान्य केले होते म्हणून त्यांचाही काटा काढण्यात आला’, असे शूजाने सांगितले.

आपल्या शिवाय या देशावर कोणीही राज्य करू शकत नाही, हा काँग्रेसचा दंभ या पत्रकार परिषदेच्या मागे होता. आपल्या नालायक कारभारामुळे, भ्रष्टाचारामुळे मतदारांनी भाजपाला संधी दिली ही बाब मान्य करण्याचे मोठेपण काँग्रेसकडे असते तर त्यांच्यावर नष्ट होण्याची वेळ का आली असती? २०१४ देशात यूपीएची सत्ता होती. सगळा कारभार काँग्रेसच्या हाती होता. अशा परीस्थिती भाजपाचे नेते EVM चे नियंत्रण मिळवतात, यावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल काय? परंतु, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसकडून बुद्धीमत्तेची अपेक्षा करणे म्हणजे बैलाकडून दूधाची अपेक्षा करण्यासारखे होते.

काँग्रेसने पेरलेली ही लोणकढी, अध्येमध्ये मान वर काढायची. आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी २०१७ मध्ये EVM हॅक कसे होते याचे प्रात्यक्षिक दाखवून खळबळ निर्माण केली. अशा गोष्टी वेळीच ठेचल्या नाहीत तर काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही. भारद्वाज यांच्या प्रतापामुळे देशभरात EVM बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. भारद्वाज यांनी जे मशीन हॅक केले ते EVM सारखे दिसत असले तरी EVM नव्हते असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले, परंतु तरीही ओरड सुरू राहिली.

अखेर त्याच वर्षी निवडणूक आयोगाने हुकमी डाव टाकला. देशातील सगळ्या राजकीय पक्षांना EVM हॅक करण्याचे आव्हान दिले. याला म्हणतात बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. EVM हॅक होते असा दावा करणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने हे आव्हान स्वीकारले नाही. फक्त दोन पक्ष ठरल्यावेळी तिथे गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपा. तेही EVM हॅक करायला नाही तर EVM चे काम कसे चालते त्याची माहीती घ्यायला. या दोन्ही पक्षांनी प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर समाधान व्यक्त केले.

EVM हॅकचा फुगा असा जाहीरपणे फोडण्यात आला आहे. तरी शिळ्या कढीला राऊत आणण्याचे प्रयत्न काम होत असतात. म्हणे ‘मोदी-शहांना राज्यांच्या सत्तेत रस नाही, केंद्रातील सत्ता मिळवायची आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्याना टाचेखाली ठेवायचे ही भाजपा नीती आहे’. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर सामनाच्या मालकांचा मेंदूशी असलेला संपर्क तुटला आहे. एकीकडे बोलायचे की ईडीचा धाक दाखवून भाजपा राज्यांच्या सत्ता हस्तगत करते आहे, दुसरीकडे बोलायचे की मोदी-शहांना राज्यात इंटरेस्ट नाही. किती तोंडाने बोलयचे याची काही मर्यादा असतात ना?

EVM देशपातळीवर पहिला प्रयोग २००४ च्या लोकसभा निवडणुकीत झाला. तेव्हा काँग्रेसने EVM हॅक करून सत्ता मिळवली असा दावा भाजपाने केला नाही. २०१० मध्ये आंध्र प्रदेशच्या हरी प्रसाद या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने EVM हॅक करण्याचा प्रयोग केला. तेव्हा त्यालाही अटक झाली होती. हे काँग्रेसची सत्ता असताना झाले होते. त्यामुळे सामनाकारांनी संगमाला अटक झाली म्हणून गळा काढण्याची गरज नाही.

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती

पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले

भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ

जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाची घोषणा

आव्हाडांनी चांद्रयान- ३ ला थेट EVM हॅकशी जोडले आहे. स्वत:च्या नावा मागे डॉक्टर ही पदवी लावणाऱ्या आव्हाडांनी असे कोरडे तर्क करण्यापेक्षा सिद्ध करून दाखवावे. मी किंवा माझा माणूस EVM हॅक करून दाखवू शकतो असे जाहीर करावे आणि करून दाखवावे. मेघालयातील बोलोंग संगमा या तरुणाने EVM कशा प्रकारे हॅक करतात, याबाबत एक व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड केला आहे. या तरुणाला अटक केल्याबद्दल सरकारवर हल्लाबोल केला. २०२१ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीरच केले होते की EVM बाबत अफवा पसरवणाऱ्याला अटक करण्यात येईल. सामनाकारांचा यू-ट्युब व्हीडीयोवर एवढा विश्वास असेल तर यू-ट्युबवर सुशांत सिंह आणि दिशा सालियानच्या हत्येबाबत अनेक व्हिडीओ आहेत, ते पाहावे आणि त्यात जो संशयित दाखवलाय त्यावर चिखलफेक करावी.

नील आर्मस्ट्रॉग हा चंद्रावर उतरलेला पहिला मानव. ५० वर्षांपूर्वी अमेरिकेने राबवलेल्या अपोलो- ११ मिशनचे हे यश. परंतु, अपोलो प्रत्यक्षात चंद्रावर गेलेच नव्हते. एखाद्या हॉलिवूड सिनेमाप्रमाणे चित्रण करून ते लोकांच्या माथी मारण्यात आले, अशी थिअर त्यावेळी मांडण्यात आली. चंद्रावर वातारवण नाही, मग झेंडा फडकलाच कसा? सुर्य अमुक दिशेला असताना सावल्या तमुक दिशेला कशा पडल्या? अशा अनेक भाकड शंका उपस्थित करण्यात आल्या. यातल्या प्रत्येक शंकेचे चोख उत्तर देण्यात आले. तरीही काही लोकांना कॉन्स्पिरसी थिअरीज खूप आवडतात. त्या कुरवाळण्याची सवय असते. वाट्टेल तर बरळलं तरी काही लोक त्यावर विश्वास ठेवतात. हे माहीत असल्यामुळे काही विघ्नसंतोषी वारंवार खोटं बोलत असतात. १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A. आघाडीचा अजेंडा सेट झाला आहे. EVM मुळे पराभव होणार हे जाहीर करायचे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version