विरोधक टीका करण्यासाठीच असतात. परंतु जेव्हा समर्थक, ईको सिस्टीमचा अविभाज्य हिस्सा असलेले लोक टीका करायला लागतात, सवाल उपस्थित करतात तेव्हा ते संकेत असतात की परीस्थिती गंभीर आहे. काँग्रेस ही खिळखिळी झालेली इमारत आहे. एक विट हलली तरी हा डोलारा कधीही कोसळू शकतो, अशी चिंता काँग्रेसचे समर्थक व्यक्त करतात. परंतु या स्थितीला जबाबदार असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांना तिळभर दोष न देता पराभवाचे खापर कुठे पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांवर, कुठे उबाठा शिवसेनेवर फोडले जाते, तेव्हा स्पष्ट होते की पडझड थांबणारी नाही. चौकशी आधीच गुन्ह्यातील मुख्य आरोपीला निर्दोष ठरवले, तर सत्य बाहेर येण्याची, न्याय होण्याची शक्यता किती उरते? पराभव वेणूगोपाल यांच्यामुळे झाला, उद्धव ठाकरेंमुळे झाला, संजय राऊत यांच्यामुळे झाला असे निष्कर्ष काढून दिलासा
गांधी परीवाराला मिळेल, पक्षाचे भले कसे काय होणार?
ईको सिस्टीमच्या माध्यमातून काँग्रेसला कायम जीवन रस मिळत राहिला. पक्षाची वैचारिक लढाई लढण्याची कामगिरी या ईको सिस्टीमने वर्षोनुवर्षे पार पाडली. आज तिच इको सिस्टीम हरियाणा आणि महाराष्ट्राच्या पराभवाचे खापर गांधी परीवारावर फुटू नये म्हणून लढताना दिसते आहे. ‘सध्याच्या काँग्रेस पक्षाची अवस्था ही २०१४ च्या तुलनेत अधिक बिकट झाली आहे, पक्ष कधीही कोसळेल अशा स्थिती आलेला आहे.’ असा दावा पक्षाचे खंदे समर्थक राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला यांनी एका मुलाखतीत केलेला आहे.
पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या एका मुलाखतीत पूनावाला यांनी ही सडेतोड मते मांडली आहेत. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेली काँग्रेसची धुळधाण आणि पक्षाची सद्यस्थिती या विषयावर ही मुलाखत झाली.
बरखा आणि तेहसीन हे काँग्रेसच्या ईको सिस्टीमचा भाग राहिले आहेत. गांधी-वाड्रा परीवाराचे कट्टर समर्थक राहिले आहेत. यूपीएच्या कारकीर्दीत बरखा यांचा तोरा तर एखाद्या मंत्र्यापेक्षा कमी नव्हता. तेहसीन हे तर काँग्रेसच्या प्रथम परिवाराशी नाते संबंध असलेले नेते आहेत. यूपीएच्या काळात काँग्रेसचे सोनियाचे दिवस या दोघांनी पाहिले आहेत, अनुभवलेही आहेत. हे दोघे एकत्र येतात आणि अवघ्या दहा वर्षात तंबू उखडलेल्या काँग्रेसवर चर्चा करतात. परंतु कायम पक्षाच्या विजयाचे श्रेय घेणाऱ्या राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा यांना पराभवाची जबाबदारी देणे टाळतात.
हे ही वाचा:
पॅलेस्टाईनचा उल्लेख असलेली पिशवी घेऊन प्रियांका गांधी संसदेत
महाविकास आघाडीसाठी संतोष देशमुख हत्या प्रकरण ‘झणझणीत’
सोनिया गांधींनी घेतलेली नेहरूंची पत्रे परत करा
विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय सरकारचा नाही, अध्यक्षांचा
काही बाबतीत मात्र त्यांनी काँग्रेसच्या प्रचारकी युक्तिवादांना फाट्यावर मारण्याचे धाडस दाखवले आहे. काँग्रेसच्या पराभवाचा आणि ईव्हीएमचा जोडला जाणारा संबंध त्यांनी फेटाळला आहे. काँग्रेस नेत्यांच्या ईव्हीएमवर खापर फोडण्याच्या
कृतीपासून स्वत:ला वेगळे ठेवले आहे. राहुल गांधी यांचे तर्क इतके बिनबुडाचे आणि तर्कहीन असतात की त्या थापांचे समर्थन आता त्यांचे अघोषित प्रवक्तेही करताना दिसत नाहीत. हरीयाणात झालेला पराभव हा पक्षाच्या चुकीच्या रणनीतीचा पराभव असेल तर त्याचे खापर फक्त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कसे फोडता येईल? परंतु पूनावाला यांनी तसा जोरदार प्रयत्न केला. त्यांचा रोख काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांच्यावर होते. त्यांनी हरीयाणात चुकीच्या पद्धतीने तिकीट
वाटप केले असा आक्षेप अनेकांनी घेतला आहे. त्यांच्या ज्या चुका सांगितल्या जात आहेत, त्या अत्यंत नाजूक आहेत. तरीही राहुल यांनी ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली त्यांनी कायम त्यांना चुकीची माहीती दिली, हा पूनावाला यांचा बचाव लटका आहे. विजय मिळाला असता तर त्याचे श्रेय वेणूगोपाल यांना नक्कीच मिळाले नसते.
तेहसीन यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला असेल तर त्याचे माप गांधी परीवाराच्या पदरात न टाकणारे तेहसीन यांच्यासारखे समर्थक सुद्धा या पडझडीला तेवढेच जबाबदार आहेत. कारण पक्षाच्या संघटनेवर मित्रपक्षांवर
ठपका ठेवताना त्यांनी राहुल गांधी यांना दोष दिला असता तर त्यांची मते गांभीर्य़ाने घेता आली असती, परंतु तसे केले नाही. म्हणजे बाहुबली सिनेमात भल्लालदेवला दोष मुक्त करायचे आणि बाकीच्या चार जणांवर देवसेनेच्या हालअपेष्टांचा ठपका ठेवायचा, असा प्रकार पूनावाला यांनी केला आहे. हरीयाणातील पराभवानंतर तेहसीन उबाठा शिवसेनेबाबत अत्यंत जहाल शब्दात बोलले होते. ‘ठाकरेंनी पक्ष गमावला, चिन्ह गमावले, त्यांना जी मते मिळतायत ती काँग्रेसची मते आहेत’, असे सुनावले होते. काँग्रेसने मित्र पक्षांना खिजगणतीत न धरल्यामुळे हा पराभव झाला, या राऊतांच्या टीप्पणीवर पूनावाला यांनी हा जाळ काढला होता. मुलाखतीत महाराष्ट्रातील पराभवाचे विश्लेषण करताना त्यांचे शब्द अधिक जळजळीत बनले होते.
भारताचा सिरीया होऊ शकतो, अशा प्रकारची विधाने राऊत रोज सकाळी उठून करतात. अशा बडबडीमुळे त्यांनी पक्षाचे नुकसान केले. पक्षात फूट पडली. ठाकरेंनाही हे लक्षात येत नाही. हा पक्ष काँग्रेससाठी ओझे झाले आहे, असा दावा
पूनावाला यांनी केलेला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष हिंदुत्वाकडे वळण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे कारणही पूनावाला यांनी नकळत उलगडले. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मुस्लीम मतं मोठ्या प्रमाणात मिळाली होती. शंभर टक्के मतदान मविआसाठी झाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत ही मते काही प्रमाणात अजित पवार यांच्या पक्षाकडे, काही प्रमाणात अन्यत्र वळलेली दिसली. आदीत्य ठाकरे विजयी झालेल्या वरळी मतदार संघात हेच चित्र होते, असे पूनावाला सांगतात. हेच ते कारण आहे, ज्यामुळे ठाकरे हिंदुत्वाकडे वळलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेली मुस्लीम मते ही लॉटरी होती. ही लॉटरी रोज लागणार नाही, हे लक्षात आल्यामुळे लौट के बुद्धू वापस आये… असे चित्र महाराष्ट्राची जनता पाहते आहे. पूनावाला म्हणतायत ते चुक नाही, अर्धसत्य आहे. उबाठा शिवसेनेसोबत राहुल गांधींचे नेतृत्व आणि रणनीतीही महाराष्ट्रात पराभूत झाली आहे. अर्धसत्य सांगून ते काँग्रेसचे नुकसानच करतायत.
आगामी काळात काँग्रस पक्षाने जर विधानसभा निवडणुकीत यश मिळवले तरच पक्षाला काही भवितव्य उरलेले आहे. अन्यथा पक्षाची इमारत कधीही कोसळू शकते अशी परीस्थिती आहे, हे पूनावालांचे मत आहे. परंतु काँग्रेसला विजयाची
संजीवनी मिळण्याची शक्यता कमी आहे. ज्या महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला तो वर्षोनुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अत्यंत पोषक वातावरण असून सुद्धा, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तिथे मोठा विजय मिळवून सुद्धा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष धाराशाही झाला, तिथे आता काँग्रेसला विजय मिळेल असे राज्यच देशात उरलेले दिसत नाही. तेलंगणा किंवा कर्नाटकपैकी एखादे राज्य हातातून निसटण्याची शक्यता अधिक आहे. मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि हिंदूविरोधाचे राजकारण करून काँग्रेसचे भले होणार नाही अशा चार परखड गोष्टी गांधी परिवाराला तोंडावर सांगणारे लोक नाहीत, तो पर्यंत काँग्रेसचा उत्कर्ष होत नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)