विधानसभेपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपणार!

विधानसभेपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपणार!

लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता महाराष्ट्राला वेध लागलेले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे. या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आधीच स्पष्ट केलेले की आम्ही अशाच पद्धतीने या निवडणुका लढणार आहोत. तरी महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर छोट्या मोठ्या भावाची भाषा सुरू झालेली आहे. आघाडीने पत्रकार परिषद घेऊन कितीही सांगितलं असलं तरी राजकीय महत्त्वकांक्षा ही विकास आघाडीमधल्या घटक पक्षांची लपून राहिलेली नाही. अगदी ताजच उदाहरण द्यायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांची गेल्या दोन दिवसातली भाषण जर का आपण बघितली तर जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद होणार हे स्पष्ट झालेलं आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीच्या दृष्टीने सर्वात चर्चेचा कुठला लोकसभा मतदारसंघ राहिला असेल तर तो सांगली होता. सांगलीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली होती आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काका पाटील यांना त्यांनी तगड आव्हान उभं केलं आणि ते निवडणूक जिंकले सुद्धा. परंतु मतदान होईपर्यंत निकाल लागेपर्यंत सांगली लोकसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ राहिलेला होता. सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे यासाठी विश्वजीत कदम यांनी दिल्लीच्या काँग्रेस नेतृत्वापर्यंत हालचाली केलेल्या होत्या. परंतु राज्यात शिवसेनेने ही एक जागा आधीच चंद्रावर पाटील यांची उमेदवारी जाहीर करून पदरात पाडून घेतली होती. शिवसेनेने ही जागा का मागितली याचे उत्तर आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांना समजलेलं नाही. त्यामागे एक राजकारण घडलं. या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.

काँग्रेसमधल्या नेत्यांचा रोख हा जयंत पाटलांवर होता. कारण सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसला मिळू नये, याच्यासाठी जयंत पाटील यांनी प्रयत्न केले आणि चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यासाठी जयंत पाटलांनी शिवसेनेला सांगितलं, असा एक आरोप काँग्रेसच्या गोटातून करण्यात येत होता. सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका सभेत जयंत पाटील यांनी ही बाब बोलून सुद्धा दाखवलेली होती.

अगदीच दोन दिवसांपूर्वी जयंत पाटलांची एक सभा त्यांच्या विधानसभा मतदारसंघात झाली त्या सभेमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात जास्त जागा लढवेल असे एक विधान केलं. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार समारंभात विश्वजीत कदम यांनी काँग्रेस पक्ष जास्त जागा लढवणार असे विधान केलं. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये जी ठिणगी पडलेली होती आणि त्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगलीमध्ये येऊन दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना उद्देशून नौटंकी बंद करा असे एक विधान केलं होतं. ते संजय राऊत यांचे विधान हे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचंड खटकलेलं होतं. त्यामुळे परवाच्या भाषणामध्ये बोलताना विश्वजीत कदम यांनी सांगितले की सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळू नये यासाठी बऱ्याच जणांनी खडे टाकले. परंतु त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. याचा अर्थ सरळ होता की विश्वजीत कदम यांच्या निशाण्यावर जयंत पाटील आणि संजय राऊत हेच होते. कारण शेवटी स्थानिक पातळीवरती जिल्ह्याचं राजकारण ताब्यात ठेवणं जिल्हा ताब्यात ठेवणं जिल्ह्याच्या राजकारणाचं नेतृत्व करणं ही एक स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते. ही स्पर्धा सांगली जिल्ह्यात जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यामध्ये आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ हा जसा राज्यातल्या महाविकास आघाडीच्या दृष्टीने कुठेतरी वाद निर्माण करणारा ठरलेला होता तीच परिस्थिती आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठरण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातल्या दोन्ही काँग्रेसमधल्या प्रमुख नेत्यांनी आपणच जास्त जागा लढवणार असल्याची भाषा जाहीरपणाने केलेली आहे. आणि यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर नाना पटोले यांनी जाहीरपणाने सांगितलेलंच होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जास्त जागा लढवू किंवा महाविकास आघाडी मध्ये आम्ही मोठा भाऊ आहोत. ते आजही ठाम पणाला असंच म्हणत आहेत की आम्हीच मोठा भाऊ आहोत. यावर संजय राऊत म्हणाले होते की अशी भाषा जर कोण करत असेल तर तो मूर्खपणा ठरेल.

हे ही वाचा..

देशात नवे सहकार धोरण लवकरच !

वक्फ बोर्ड कायदा संपवावा, जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये बांधावीत!

धक्कादायक: सलूनमध्ये मुस्लिम न्हाव्याने ग्राहकाच्या चेहऱ्याची केली ‘थुंकीने मालिश’!

अमर्याद संपत्ती गोळा करणाऱ्या वक्फ बोर्डाला चाप लावणार कोण?

कालच महाविकास आघाडीने मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण जरी म्हटले असले की छोटा मोठा भाऊ वगैरे असा काही प्रकार महाविकास आघाडीमध्ये नाही तरी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे आजही आपणच मोठा भाऊ आहोत या मतावरती ठाम आहेत. त्याच्यामुळे जागावाटपाच्या बैठका जशा सुरू होतील तसा हा वाद निश्चितच सुरू होईल यात काही शंका नाही.

Exit mobile version