लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागांवर रोखल्यामुळे हर्षवायू झालेले काँग्रेसचे नेत्यांचे पाय महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीतील पराभवानंतर बऱ्यापैकी जमिनीवर आलेले आहेत. काँग्रेसला कोणत्याही किंमतीवर सत्ता हवी आहे. परंतु, सत्तेच्या दिशेने जाणारी पाऊलवाट त्यांच्या नजरेच्या टप्प्यातही नाही. पक्षात नवे प्राण फूंकण्यासाठी गुजरातमध्ये काँग्रेसने राष्ट्रीय अधिवेशनाचा घाट घातला होता. २०२७ मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचा संकल्प या अधिवेशनात सोडण्यात आला. भाजपाचा भाग्योदय ज्या गुजरात मॉडेलमुळे झाला त्याच राज्यात काँग्रेसने भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
डाव्या विचारवंतांनी गुजरातला भाजपाची हिंदुत्वाची प्रयोग शाळा ठरवले. पक्षात संजीवनी फुंकण्याचा प्रयोग काँग्रेसने इथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने केला. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने पराभूत होत असलेल्या काँग्रेस पक्षाला या अधिवेशनाच्या निमित्ताने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांची आठवण झालेली आहे. भाजपने हायजॅक केलेल्या पटेलांवर पुन्हा एकदा दावा ठोकण्याचा प्रयत्न या अधिवेशाच्या निमित्ताने काँग्रेसने केला आहे. ‘नेहरु-पटेलांमध्ये कोणतेही मतभेद नव्हते. भाजपाने या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ते एका नाण्याच्या दोन बाजू होते,’ असे प्रतिपादन या अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. काँग्रेस पटेलांची १५० वी जयंती देशभरात साजरी करणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. बहुधा नेहरुंच्या नावावर मत मिळत नाहीत, याची जाणीव झाल्यानंतर आता काँग्रेस ‘पटेल शरण’ झालेली आहे.
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना पटेलांच्या अत्यंयात्रेत सहभागी होऊ नका, असे आदेश देणाऱ्या नेहरुंचे पटेलांशी मतभेद नव्हते, या खरगे यांच्या दाव्यावर जनता विश्वास ठेवणे कठीण आहे. नेहरुंचे पटेलांशी केवळ मतभेद नव्हते, तर ते पटेलांचा द्वेष करायचे, हे सिद्ध करणारी खंडीभर उदाहरणे ज्येष्ठ काँग्रेस नेते आचार्य कृपलानी, के. एम. मुन्शी, पटेलांच्या कन्या मणिबेन पटेल, गांधींचे नातू राजमोहन गांधी यांच्या आणि अशा अनेक समकालिन लेखकांच्या पुस्तकातून मिळू शकतील. परंतु, थापा मारण्याच्या निमित्ताने का होईना, काँग्रेसच्या नेत्यांना नेहरु-गांधी घराण्या पलिकडे काँग्रेसमध्ये एखादा नेता होता, याची आठवण झाली हे ही नसे थोडके.
पक्षाचे अध्यक्ष खरगे असले तरी पक्षाला दिशा देण्याचा अधिकार केवळ सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याकडेच असतो. अधिवेशनात राहुल गांधींचे भाषण झाले. त्यांच्या भाषणात आरक्षण, अग्निवीर योजना, आर्थिक विषमता, धार्मिक भेदभाव, अगडे- पिछडे या पलिकडे मुद्देच नसतात. त्यात देशाच्या भल्याचा विचार कमी राजकारण जास्त असते. सत्तेवर असताना जे करता आले नाही, केले नाही, अशा मागण्या विद्यमान केंद्र सरकारकडे करायच्या, त्यांच्या नावाने बोटे मोडायची, हे नित्याचे असल्यामुळे जनता यावर फार विश्वास ठेवताना दिसत नाही. ट्रम्प यांचे टेरिफ धोरण, बांगलादेशचा तोंडाळ नेता मोहमद यूनस याची बडबड या मुद्द्यांवरून राहुल गांधी यांनी सरकारवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी यांनी जे मुद्दे या अधिवेशनात उपस्थित केले, त्यात नवीन काय होते? गेली अनेक वर्षे ते या मुद्द्यांवर बोलतायत. जनतेचा प्रतिसाद नाही, तरीही ते तेच तेच बोलत राहतात. जनतेला काँग्रेसची नीती माहिती आहे. जनतेचे प्रश्न चिन्ह नीतीवर आहे आणि गांधी परिवाराच्या नियतवरही आहे. जातीपातीचा विचार न करता ६४ कोटी हिंदू यंदा कुंभमेळ्यात सहभागी झाले. हे परिवर्तन त्यांच्या लक्षात येत नाही. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात निर्माण झालेली श्रद्धा-भक्तीची सुप्त लाट त्यांच्या लक्षात येत नाही. देश एका वेगळ्या वळणावर उभा आहे, याचेही त्यांना भान नाही. ते अजून तोच अगडे-पिछडे, सेक्युलरीझम, गंगा- जमनी तहजीबचा जुना माल जनतेच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतायत. राहुल गांधींची गाडी अजूनही जातीवर अडकली आहे. ‘मी अपघाताने हिंदू आहे’, हे नेहरुंचे विधान प्रसिद्ध आहे. राहुल गांधी तसेच ‘अपघाताने भारतीय’ आहेत. त्यांना भारतीय जनमानस कळलेले नाही. त्यांना हिंदू समाजाचे अंतरंग कळलेले नाही आणि म्हणूनच पक्षाची सूत्र जोपर्यंत त्यांच्या हाती आहेत, तो पर्यंत ते पक्षाचे काहीही भले करू शकत नाहीत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नियुक्त केलेल्या ए. के. एण्टोनी समितीने नेमका हाच निष्कर्ष काढला होता. पक्षाची भूमिका हिंदू विरोधी आणि मुस्लीम धार्जिणी असल्याचे जनतेचे मत झाल्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचा निर्वाळा या अहवालात दिला होता. काँग्रेसने हा निष्कर्ष मनावर घेतला नाही. हीच खरी समस्या होती, ज्याच्यावर उपाययोजना करण्याची गरज होती, परंतु ते घडले नाही. काँग्रेसचा तुष्टीकरणाचा आजार जात्या दिवसागणिक बळावत गेला. आता तो बरा होण्याच्या पलिकडे गेला आहे म्हणूनच आज काँग्रेसच्या युवराजांना हमखास विजयासाठी मुस्लीमांची २८.६५ टक्के लोकसंख्या असलेल्या वायनाडमधून लढावे लागत आहे. ज्या मुस्लीमांच्या मतावर राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष तरलेला आहे, त्यांच्याशीही ते प्रामाणिक नाहीत. वायनाडवर पूराची आपत्ती आली तेव्हा खासदार राहुल गांधी तिथे फिरकलेही नाहीत. लोकसभेत वक्फ विधेयकावर झालेल्या मतदानात वायनाडच्या विद्यमान खासदार प्रियांका गांधी यांनी सहभागच घेतला नाही. तिथले माजी खासदार राहुल गांधी यांनी तोंड उघडले नाही.
२०२७ मध्ये गुजरात जिंकण्याचा संकल्प काँग्रेसने ज्या अधिवेशनात सोडला, त्या अधिवेशनात प्रियांका वाड्रा फिरकल्याच नाहीत. त्यांना म्हणे पूर्वनियोजित वैयक्तिक कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यांनी अधिवेशनात गैरहजर राहण्यासाठी अध्यक्षांची परवानगी घेतली होती. त्यांना नाही म्हणण्याचे धाडस खरगे कसे काय दाखवू शकतील? पक्षात राहुल गांधी यांच्या नंतर ज्यांचे स्थान आहे, त्या प्रियांका वाड्रा यांनी अधिवेशनाला वैयक्तिक कारणांसाठी दांडी मारावी यावरून गांधी परीवार काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाबाबत किती गंभीर आहे, याचा अंदाज येऊ शकतो. इंदिरा गांधी यांच्या सारखे नाक आहे, केवळ एवढ्या भांडवलावर राजकारणात यश मिळू शकत नाही.
हे ही वाचा :
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दल भारतातील इस्रायलचे राजदूत काय म्हणाले?
गृहमंत्री शाह रायगड दौऱ्यावर, सुनील तटकरेंच्या निवासस्थानी करणार भोजन!
चारधाम यात्रा ३० एप्रिलपासून सुरू होणार
“रात्रभर झोपच लागली नाही…” काय घडलं रजत चौहानसोबत?
काँग्रेसला सत्तेवर येण्यासाठी भाजपाचा पराभव करावा लागेल. त्यासाठी भाजपाच्या नेत्यांइतका घाम गाळावा लागेल. केवळ भाजपाला शिव्या घालून हे शक्य होणार नाही. वक्फ विधेयकावर संसदेच्या दोन्ही सदनात पहाटेपर्यंत चर्चा झाली. या दोन्ही चर्चांच्या वेळी भाजपाचे तमाम नेत्यांसह केंद्रीय गृहमंत्री पूर्णवेळ उपस्थित होते. प्रत्येक भाषण ते लक्ष देऊन ऐकत होते. सगळ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची नोंद घेत होते. आपल्या भाषणात त्यांनी प्रत्येक सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सविस्तर उत्तर दिले. वक्फ विधेयकावर राज्यसभेत पहाटे अडीचपर्यंत चर्चा झाली, त्यानंतर मतदान झाले. हे आटोपून दुसऱ्या दिवशी सकाळी छत्तीसगढमध्ये एका कार्यक्रमासाठी अमित शाह यांनी हजेरी लावली. त्यांना जेमतेम तासभर विश्रांती मिळाली असेल, कदाचित तेवढीही नाही. ज्या भाजपाशी राहुल गांधी यांना मुकाबला करायचा आहे, त्या पक्षाचे नेते वर्षांचे बाराही महिने इतकी मेहनत करत असतात. राहुल-प्रियांका त्यांच्या तुलनेत कुठे आहेत? तात्पर्य असे आहे, जो पर्यंत हिंदू समाजाबाबत काँग्रेसची नियत जोपर्यंत साफ नाही, काँग्रेसचे नेतृत्व देशहिताच्या मुद्दयावर राजकारण करणे बंद करत नाही, जोपर्यंत त्यांची दृष्टी विकासाभिमुख आहे, असे जनतेला वाटत नाही, जोपर्यंत काँग्रेस नेते पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी मेहनत करत नाहीत, तोपर्यंत ही अधिवेशने म्हणजे टाईमपास ठरणार यात शंका नाही. जे स्वतः गंभीर नाहीत, देश त्यांना गंभीरपणे का घेईल?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)