हम तो डुबेंगे सनम… काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

पराभव झाल्यानंतर आत्मचिंतन करण्याची पद्धत ना काँग्रेस पक्षात आहे, ना त्यांच्या मित्र पक्षात

हम तो डुबेंगे सनम… काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

देशातील विरोधी पक्षांनी इंडी आघाडी नावाची जी सर्कस बनवली आहे, त्यातील अनेक नेत्यांचे वागणे विदूषकापेक्षा कमी नाही. फरक एवढाच की हे विदुषक गुदगुल्या करणारे विनोद करतो, हे रक्तपाताची भाषा करतायत. लोकशाहीसाठी लढण्याचा दावा करणारे हे लोक २०२४ च्या निवडणुकीचा निकाल येईपर्यंत थांबायलाही तयार नाहीत. महाविकास आघाडीला ३८ ते ४० जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची घोषणा काँग्रेसच्या माजी मंत्र्याने केली आहे. सत्ता मिळाली नाही तर देशात अराजक माजवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांनी पूर्ण तयारी केलेली असून निवडणूक आय़ुक्तांच्या खूनाचे निधान त्याची एक झलक आहे.

देशात निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले असून सहावा टप्पा २५ मे रोजी म्हणजे उद्या पार पडणार आहे. सातवा टप्पा १ जून रोजी संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रालोआतील नेते देशात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन होणार याबाबत आश्वस्त आहेत. विरोधकांनी मात्र आतापासून ईव्हीएमचे रडगाणे सुरू केलेले आहे. ‘देशात ईव्हीएम घोटाळा झाला नाही, निवडणुका व्यवस्थित पार पडल्यात तर भाजपाला १८० पेक्षा जागा मिळणार नाहीत’, असे भाकीत काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा यांनी केलेले आहे.

‘ईडी, सीबीआय आणि ईव्हीएम घोटाळ्याची साथ नसेल तर नरेंद्र मोदी या निवडणुका जिंकू शकत नाहीत’, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. इंडी आघाडीचे तमाम नेते आता त्यांची री ओढतायत. पराभवाची खात्री झाल्यामुळे ईव्हीएमच्या नावाने गळा काढण्याची स्पर्धा लागलेली दिसते. परंतु विषय इथे संपत नाही. नरेंद्र मोदी यांचा पराभव दूर दूर पर्यंत दृष्टी पथात नाही, तेव्हा पराभव पत्करावा लागला तर देशात अराजक सदृश्य परीस्थिती निर्माण करायची अशी योजना विरोधकांनी तयार ठेवली आहे. मोदी सत्तेवर आली तर त्यांची डाळ शिजू देणार नाही, हा भाग वेगळा परंतु विरोधांकाची तयारी मात्र त्या दिशेने जाताना दिसते.

सुबोध सावजी हे महाराष्ट्रातील वरीष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री आहेत. राज्यात महाविकास आघाडीला ३८ ते ४० जागा मिळतील असे बहुधा त्यांना स्वप्न पडले आहे. त्यांनी राज्याचे निवडणूक आयुक्तांना पत्र लिहीले आहे. राज्यात मविआच्या ३८ ते ४० जागा येणारच, परंतु आपण ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असे झाल्यास मी आपला गळा घोटल्या शिवाय राहणार नाही. आपण जर मतदारांच्या अधिकाराचा मुडदा पाडणार असाल तर मी आपला खून केल्याशिवाय राहणार नाही, असे सावजी या पत्रात म्हणतात.

सावजींनी जे काही लिहीले आहे, ते भयंकर आहे. त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हायला हवी इतके गंभीर आहे. मविआच्या नेत्यांनी सुरूवात निवडणूक आय़ोगाला शिव्या घालून केली. आता त्यांची मजल निवडणूक आय़ुक्तांचा खून करण्यापर्यंत गेली आहे. सावजी म्हणतायत, मविआला राज्यात ३८ ते ४० जागा मिळणार. त्यांना कर्ण पिशाच्छ वश झाले आहे की स्वर्गीय इंदीरा गांधी स्वप्नात येऊन सांगून गेल्या? त्यांचा अंदाज खरा ठरला नाही, तर ते निवडणूक आय़ुक्तांचा खून करणार? हा काय प्रकार आहे? सावजींच्या दमदाटीमुळे आम जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.

सावजींचे वय ८० पेक्षा जास्त आहे, म्हणजे त्यांना म्हातार चळ लागले आहे, असा अर्थ काढायचा का? परंतु शरद पवारांचे वय त्यांच्या पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या वयात काँग्रेस नेत्यांचे डोकं ठिकाणावर राहात नाही, असा ठाम निष्कर्ष काढता येत नाही. जर डोकं ठिकाणावर असून अशा धमक्या ते देत असतील तर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ गजाआड करायला हवे. सावजींनी एक प्रकार मविआचा अजेंडा स्पष्ट केला आहे. इंडी आघाडीच्या प्रचाराची पातळी, त्यांच्या सर्व नेत्यांची भ्रष्टाचाराने काळी झालेली थोबाडं, प्रत्येक राज्यात त्यांनी खाल्लेले शेण या सगळ्या मुद्यांची गोळाबेरीज केली तर ४ जून रोजी त्यांच्या तोंडात माती जाणार हे उघडच आहे. महाराष्ट्र त्याला अपवाद कसा असेल? महाराष्ट्रात मविआ नावाच्या दुकानाला टाळे लागणार हे निश्चित. याचा अंदाज आल्यामुळे मविआच्या नेत्यांचा तोल गेलेला दिसतो.

पराभव झाल्यानंतर आत्मचिंतन करण्याची पद्धत ना काँग्रेस पक्षात आहे, ना त्यांच्या मित्र पक्षात. जर असती तर गेली १० वर्षे अनेक निवडणुकांमध्ये सतत अपयशी ठरलेले राहुल गांधी त्यांचे नेते नसते. यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने रिंग मास्टर बदललेला नाही, त्यामुळ पराभव अटळ आहे. पराभव झाल्यानंतर काय करायचे याची योजना तयार आहे.
ईव्हीएमच्या नावाने ओरडा करायचा आणि लोकशाही संस्थांना टार्गेट करायचे. तोडफोड, दंगे करायचे आणि देशात अराजक सदृश्य स्थिती निर्माण करायची. देशात लोकशाही धोक्यात आहे, अशा प्रकारची ओरड करून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करायची ही काँग्रेसची योजना आहे. म्हणजे हम तो डुबेंगे सनम, तुम्हे भी ले डुबेंगे… असा हा मामला आहे.

हे ही वाचा:

अपघातावेळी गाडीचं स्टीयरिंग वेदांतच्या हाती!

अभिनेत्री लैला खान हत्याकांड प्रकरणी सावत्र पित्याला फाशी

छत्तीसगडमध्ये ८ नक्षलवाद्यांना टिपले, चकमक सुरू!

वेदांत अग्रवालचा आक्षेपार्ह भाषेतला व्हिडीओ व्हायरल; जामीन मिळाल्यावर म्हटलं रॅप साँग

आधी प्रियंका, राहुल, त्यांचे चेलेचपाटे हलक्या आवाजात ईव्हीएमच्या विरोधात आरोप करतायत. पराभव जस जसा स्पष्ट दिसू लागले तेव्हा हा गलका वाढत जाईल. हिंसक मार्गाने सरकारच्या विरोधात उठाव करण्याचा प्रयत्न होईल. जॉर्ज सोरोस यांच्यासारखे भारत विरोधी या उठावासाठी वाट्टेल तेवढा पैसा ओततील. त्यांना न्याय मिळेल तेव्हा तो न्याय, त्यांच्या बाजूने निकाल लागला तर निवडणुका निष्पक्ष, त्यांची सत्ता नाही आली तर देशात मुडदे पाडायचे असे हे देशबुडवे राजकारण आहे.

१९८४ च्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसची लाट होती. भाजपाचे पानिपत झाले, देशात फक्त भाजपाचे दोन खासदार विजयी झाली. इतक्या प्रचंड पराभवानंतरही भाजपाने निवडणूक आयोगाला टार्गेट केले नाही, कोणाचाही खून पाडण्याची भाषा केली नाही. प्रयत्नांची धार अधिक तीव्र केली आण टप्प्याटप्प्याने देशाची सत्ता काबीज केली. काँग्रेसवाले मात्र दोन निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर देश पेटवायला निघालेले आहेत. मुडदे पाडण्याची भाषा करतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version