राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच. शेवटी भूमिका घेऊन लोकांपुढे जायचे असते. लोक ठरवतात त्यांना ती भूमिका पटली की नाही पटली. पण आता झालंय असं, लोकांनी जे ठरवलंय ते लोक बोलून दाखवत असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार टी. जीवन रेड्डी यांनी चक्क एक वृद्ध महिलेच्या कानशिलात लगावली आहे. का ही कानशिलात लगावली तर तिने त्यांना तोंडावर सांगितले की आपण भारतीय जनता पक्षाला मत देणार आहोत. म्हणजे काँग्रेस पक्षाची काय मानसिकता आहे. आतापर्यंत अशाच पद्धतीने काँग्रेस पक्षाने राजकारण केले ते या एका घटनेवरून स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे.
तेलंगणा राज्यात निझामाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते टी. जीवन रेड्डी हे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांना प्रचारादरम्यान एक वृध्द महिला भेटली. आपल्याला असलेल्या अडचणी काय आहेत या त्या महिलेने त्यांना सांगितल्या. यावर तुम्हाला सर्वकाही मिळेल असे रेड्डी म्हणाले पण तुम्ही कुणाला मत देणार म्हटल्यावर त्या महिलेने त्यांना सांगितले की मी फुलाला मत देणार म्हणजेच कमळ चिन्हाला मत देणार. असं तिने स्पष्टपणे त्यांना तोंडावर सांगितले. हे ऐकताच तळ पायाची आग मस्तकाला गेलेल्या रेड्डी यांनी मागेपुढे पहिले नाही सरळ त्या वृद्ध महिलेच्या कानाखाली आवाज काढला. या घटनेचा एक व्हीडीओ सध्या समाज मध्यमामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. म्हणजे आपल्याला कोण मत देणार नसेल तर त्याला मारायचे, धाक दाखवायचा, दहशत माजवायची असाच हा प्रकार आहे. एकाला सरळ केले की बाकीचे सगळे रांगेत उभे राहतात हा त्यामागचा तर्क या रेड्डी महाशयांचा असावा. मात्र, हा व्हिडीओ जसा समाज माध्यमावर व्हायरल व्हायला लागला तशी या टी. जीवन रेड्डी यांची फ्या फ्या उडायला सुरुवात झाली आहे. रेड्डी यांच्या या कृत्याचा आज केवळ तेलंगणाच नाही तर संपूर्ण देशभरात निषेध होऊ लागला आहे.
कितीही साळसूदपणाचा आव आणला तरी कधी ना कधी आपला जो मुळ स्वभाव आहे, आपली मूळ प्रवृत्ती असते ती बाहेर उफाळून येते. असाच प्रकार या रेड्डी यांचा झालेला आहे आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाची संस्कृती काय आहे ती पण आज जगासमोर आली आहे. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे. आज तेलंगणा मध्ये तसं बघायला गेल तर काही महिन्यांपुर्वी काँग्रेसची सत्ता आली आहे. आधीच्या बीआरएस पक्षाची सत्ता तिथून गेल्याने आज तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसला आहे. तरीपण या राज्यातील सर्वसामान्य जनतेला भारतीय जनता पक्षाला मतदान करायचे आहे, हे त्या वृद्ध महिलेच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले. पण या सरमजाही वृत्तीला त्या वृद्ध महिलेचे बोलणे इतके झोंबले की त्यांनी तत्काळ आपला हात उचलला.
हात उचलण्यापूर्वी त्यांनी त्या महिलेचे वय तरी बघायला हवे होते. पण त्यासाठी संस्कार असावे लागतात. आणि संस्कार आणि यांचा दूरदूर पर्यंत संबंध नसल्यामुळे वृद्ध महिलेच्या कानशिलात लावण्याचे धाडस आज रेड्डी सारख्यांनी केले आहे. आणि एका बाजूला काँग्रेसचे युवराज महिला सन्मानाची भाषा आज देशभरात करत असलेल्या प्रचार सभांमधून करत आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी गरीब महिलांच्या नावावर खटाखट, खटाखट एक लाख रुपये जमा करणार असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे उमेदवार हे महिलांच्या बाबतीत आणि त्यात वृद्ध महिलेला मारहाण करतात यावर खर तर आज विचार करण्याची वेळ आली आहे.
हे ही वाचा:
गुजरातमधून अटक केलेला मौलवी ओवेसीचा अनुयायी, इंडोनेशिया-कझाकस्तानमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात
“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!
गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!
काय सांगत होती ती महिला ? जेव्हा रेड्डी प्रचार करत होते तेव्हा त्या महिलेने आपल्याला घर नाही आणि कोणतीही पेन्शन मिळत नाही त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती. सर्वकाही मिळेल तुम्ही मत कुणाला देणार असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा तिने आपण भाजपला मतदान करणार असल्याचे सांगतले. त्यावर हा सगळा तमाशा घडला. त्यानंतर रेड्डी यांच्यावर देशभरात टीकेची झोड उठायला लागली आहे. खर तर लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील लोक सुरक्षित कसे राहतील त्यातल्या त्यात महिला सुरक्षित कशा राहतील याकडे लक्ष द्यायचे असते आणि आज जे लोकसभेत जाण्यासाठी उमेदवार म्हणून लोकांच्यात जात आहेत ते निवडून येण्याआधीच महिलांना मारहाण करू लागले आहेत. अशा प्रवृत्तीच्या उमेदवाराना सर्वसामन्य लोक निवडून देणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण या सगळ्या प्रकारातून काय स्पष्ट होते तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार आज आपल्याला लोक स्वीकारायला तयार नाहीत म्हणून इतके हातघाईवर आले आहेत.