दिशा सालियन प्रकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर आलेला असताना एक खळबळजनक तपशील बाहेर आलेला आहे. दिशाच्या कथित अपघाती मृत्यूप्रकरणात चार वर्षांपूर्वी मालवणी पोलिसांनी केलेलं क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे. दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कशाप्रकारे झाला होता, याची झलक या रिपोर्टमधून समोर आली आहे.
या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच दोषी ठरवलेले आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची तयारी ठाकरे सरकारने चालवली होती, असा या रिपोर्टचा अर्थ आहे. सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणी आधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सुशांत सिंह प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट येतो. मालवणी पोलिसांनी ४ जून २०२१ रोजी दाखल केलेला क्लोजर रिपोर्टर येतो. दोन्ही अहवालात सुशांत आणि दिशाने आत्महत्या केल्याचे दाखवले जाते हा निश्चितपणे योगायोग नाही. पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. संजय राऊत यांनी याप्रकरणी ‘राजकारण करू नका’, असा इशारा सतीश सालियन यांना दिलेला आहे. थोडक्यात पुन्हा एकदा सतीश सालियन यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका अशा माणसाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो आहे, जो गमावलेल्या आपल्या मुलीसाठी न्याय मागतो आहे.
हे ही वाचा:
म्यानमार आणि बँकॉकला भूकंपाचा धक्का, भारताकडून मदतीचे आश्वासन!
लंडनमध्ये भाषण देणाऱ्या ममता बॅनर्जींना डाव्या संघटनांनी घेरले!
न्यायव्यवस्थेचे ब्रीद बदलल्याचा खोटा प्रचार करणाऱ्या निरंजन टकलेवर गुन्हा दाखल!
सलमान खानच्या घडाळ्यात राम मंदिर…मौलाना शहाबुद्दीन रजवी संतापले
मालवणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी तपास केला होता. या तपासात काय निष्पन्न झाले हे आजवर झाकून ठेवण्यात आले होते. तब्बल चार वर्षांनी हे सगळं समोर येते आहे. मालवणी पोलिसांनी जो निष्कर्ष काढलेला आहे, तो निव्वळ धक्कादायक आहे.
दिशाच्या वडीलांचे अफेअर होते. तिचे वडील सतीश सालियन सतत तिच्याकडून पैसे मागत असत. याबाबत तिने तिचा जवळचा मित्र आणि भावी पती रोहन राय यालाही सांगितले होते. वडिलांकडून सतत होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे ती अस्वस्थ होती. त्यातून तिने आत्महत्या केली. ४ जून २०२१ रोजी मालवणी पोलिसांनी हा क्लोजर रिपोर्ट सादर केला. दिशाने आत्महत्या केली होती, हा पोलिसांचा निष्कर्ष होता. तो दिशाच्या आईवडीलांनीही मान्य केला होता, असे पोलिसांचे म्हणणे होते. हे वृत्त इंडिया टूडे मध्ये आलेल्या सविस्तर प्रसिद्ध झाले होते.
पोलिसांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, आपल्या छळवणुकीमुळे दिशाने आत्महत्या केली हा अहवाल सतीश सालियन यांनी मान्य केला होता. अनेक प्रश्न निर्माण करणारा हा क्लोजर रिपोर्ट आहे. दिशाच्या मृत्यूला तिचे वडील कारणीभूत होते, तर पोलिसांनी त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक का केली नाही? ही माहिती त्यावेळी जनतेच्या समोर का आणली नाही? दिशा तिच्या वडिलांकडून होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे त्रस्त होती, असा जबाब दिशाचा होणारा पती रोहन राय याने पोलिसांना दिला होता. त्याच आधारावर पोलिसांनी तिच्या आत्महत्येचा निष्कर्ष काढला. त्याच रोहन रायने दिशाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत, असे म्हटले आहे की, ‘दिशाच्या मृत्यूनंतर मी तिच्या आईवडिलांची काळजी घेईन. ते माझेही पालक आहेत. त्यांनी मुलासारखी माझी काळजी घेतलेली आहे.’
सतीश सालियन यांच्यामुळे दिशाने आत्महत्या केली, ही माहिती रोहन राय यानेचे पोलिसांकडे उघड केली होती. सतीश सालियन या व्यक्तिमुळे रोहन रायचे वैयक्तिक आय़ुष्य, त्याचे करीयर उद्ध्वस्त झाले. कारण तो दिशाशी विवाह करणार होता. दिशाच्या मृत्यूनंतर त्याच्या करीयरची पुढील दोन वर्ष एकांतवासात गेली. तो रोहन राय, त्यांची काळजी घेण्याची भाषा करतो, हे आश्चर्यकारक नाही? एवढंच नाही दिशाच्या मृत्यूनंतर तिचे आई-वडील तीन महिने रोहन रायच्या वडिलांच्या घरी गांधीधाम येथे मुक्कामी होते. सतीश सालियन जर याप्रकरणी दोषी असते तर रोहनने छातीठोकपणे हा मामला मीडियासमोर आणला असता. त्याला पळ काढण्याची काहीच गरज नव्हती. कारण सतीश सालियन हे पक्षप्रमुखही नव्हते आणि मुख्यमंत्रीही नव्हते.
दिशाच्या वडिलांनी त्यांच्या ताज्या तक्रारीत रोहन राय याचाही उल्लेख केला आहे. ‘रोहनने आम्हाला जे सांगितले, त्याच्यावर आम्ही त्यावेळी विश्वास ठेवला होता.’ अर्थात रोहन रायने आपल्याला खोटे सांगितल्याचे सतीश सालियन यांनी स्पष्ट केले आहे. दिशा प्रकरणात जी काही मिटवामिटवी झाली, त्यामागे पोलिसांसोबत रोहन राय सुद्धा होता, असे त्यांनी अधोरेखित केलेले आहे. सतीश सालियन जर दिशा प्रकरणातील खलनायक आहेत, तर पोलिसांना ही बाब गुलदस्त्यात ठेवण्याचे काही कारणच नव्हते. त्याचवेळी त्यांनी हा रिपोर्ट उघड का केला नाही? रोहन रायला या काळात धमक्या कोण देत होते? तो गायब का झाला होता? दिशाच्या मालाड पश्चिम येथील इमारतीत आगंतुकांच्या नोंदवहीची पाने कोणी फाडली?, सीसीटीव्ही फूटेज कोणी गायब केली? आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणी आरोप होत असताना पोलिस गप्प का राहिले? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.
हा क्लोजर रिपोर्ट आल्यानंतरच पहिल्या महायुती सरकारने याप्रकरणी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने अद्यापि तपासच सुरू केलेला नसला, तरी मालवणी पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट अमान्य असल्यामुळेच या एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांचा खरा चेहरा या क्लोजर रिपोर्टमुळे समोर आलेला आहे. दिशा सालियन प्रकरणात कोणाला तरी बळीचा बकरा बनवण्याची गरज होती. त्यासाठी सतीश सालियन यांची निवड करण्यात आली होती. रोहन राय म्हणाल्या प्रमाणे त्या दिवशी त्याने दिशासोबत भरपूर दारू प्यायली होती. त्यामुळे नशेच्या अवस्थेत दिशा बाल्कनीतून खाली पडली, असा दावा करता आला असता. जसा दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर करण्यात आला होता. परंतु मालवणी पोलिसांनी तसा दावा केला नाही.
दिशाने आत्महत्या केली असे म्हणायला तसे काहीच तात्कालिक कारण त्यावेळी घडले नव्हते. ना भांडण, ना तंटा. त्यामुळे आत्महत्या केली म्हणून विषय संपणार नव्हता. आत्महत्या का केली त्याचे कारण पोलिसांना द्यावे लागणार होते. याप्रकरणात कोणाला तरी खलनायक बनवल्याशिवाय खऱ्या आरोपीची सुटका शक्य नव्हती. त्यामुळे सतीश सालियन यांना बकरा बनवण्याची पूर्ण तयारी झाली होती. परंतु सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येनंतर वातावरण बदलले. दोन्ही संशयास्पद मृत्यूबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आले. पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याचे आरोप होऊ लागले. दिशाच्या पालकांबाबत जनमानसात हळहळ व्यक्त होत होती, अशा काळात सतीश सालियन यांच्यावर चिखलफेक झाली असती तर लोकांनी जोडे फेकले असते. त्यामुळे हा क्लोजर रिपोर्ट गुलदस्त्यात ठेवण्यात आला.
सतीश सालियन यांनी आता गमावलेल्या लेकीसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे आता उबाठा शिवसेनेचे नेते त्यांना लक्ष्य करणार, त्यांच्याविरोधात अचकट विचकट विधाने करणार ही बाब उघड आहे. संजय राऊत यांनी त्याची सुरूवात केलेली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)