वडेट्टीवारांची कसाबला क्लीनचीट, निकम मात्र देशद्रोही

वडेट्टीवारांची कसाबला क्लीनचीट, निकम मात्र देशद्रोही

पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केल्यामुळे काँग्रेस नेते खूपच चेकाळले आहेत. या त्यांच्या मनस्थितीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खतरनाक पाकिस्तानी दहशदवादी अजमल कसाब याला क्लीनचीट दिली असून २६/११ चा खटला ताकदीने लढवणारे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना देशद्रोही ठरवले आहे. आश्चर्य म्हणजे ही सगळी बकवास त्यांनी एका व्हाट्सअप मेसेजच्या आधारावर केली आहे.

काँग्रेस पक्ष ही एक देशद्रोही जमात बनलेली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत एखाद्या पक्षाच्या विरोधात केलेली विधाने देशाच्या विरोधात तर जाणार नाही ना? हे समजण्याइतके तारतम्यही या पक्षाच्या नेत्यांना उरलेले नाही. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाब याला निर्दोष प्रमाणपत्र बहाल केलेले आहे.

भाजपाने उत्तर-पश्चिम मुंबईतून जेष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते विरोधकांच्या रडारवर आलेले आहेत. सुरूवात एका दीड दमडीच्या बेरोजगार नटाने केली. गेल्या काही दिवसात त्यांच्याविरोधात एक मेसेज फिरतोय. व्हाट्सअपवर दिवसभरात असे खंडीभर मेसेज येतात. रिकामटेकड्यांचे मनोरंजन होते. परंतु, या मेसेजवर विश्वास ठेवून राज्याचा विरोधी पक्षनेता एखाद्या व्यक्तिच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर ही गंभीर बाब आहे. हा नेता आहे की दिवस-रात्र घेता, असा प्रश्न निर्माण करणारा आहे. कारण डोक्यावर पडलेला माणूसच अशा प्रकारचा आरोप करू शकतो.

२६/११ च्या हल्ल्यानंतर राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक एस. एम. मुश्रीफ यांनी एक विनोदी पुस्तक लिहिले होते. शीर्षक होते हू किल्ड करकरे. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान आहे. एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या संघाने घडवून आणली, अशी बकवास या पुस्तकात करण्यात आली होती. २६/११ च्या हल्ल्यात जर अजमल कसाब नावाचा राक्षस जिवंत पोलिसांच्या हाती लागला नसता तर हा हल्ला संघाने घडवला असा ढोल पिटत संघावर वरवंटा चालवण्याची पूर्ण तयारी काँग्रसने केली होती. हिंदू दहशतवादाची चर्चा चिदंबरम, शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि दिग्विजय सिंह वेगवेगळ्या व्यासपीठावरून करत होते. दहशतवाद फक्त मुस्लीम पसरवत नसून हिंदूही दहशतवादी आहेत, हे या थिअरीचे सूत्र होते. अटक करण्यात आल्यानंतर कसाबच्या मनगटावर हिंदू बांधतात तसा कलावा आढळला होता. आपण ज्याला रक्षा म्हणतो. हे पुरेसे बोलके आहे.

व्हॉट्सअपवर फिरणारा मेसेज मुश्रीफांच्या थिअरीचे एक्सटेंशन आहे. हेमंत करकरे यांच्या शरीरात ज्या गोळ्या सापडल्या त्या कसाबच्या किंवा दुसरा दहशतवादी अबू इस्माईल खान याने झाडलेल्या नव्हत्या. मानेपासून पोटापर्यंत करकरे यांच्या शरीरात पाच गोळ्या मारण्यात आल्या होत्या. त्या गोळ्या रिव्हॉल्व्हरने मारण्यात आल्या होत्या. त्या संघाशी संबंधित असलेले पोलिस अधिकारी संजय गोविलकर याने झाडल्या होत्या, असे त्या मेसेजमध्ये म्हटलेले होते. तेच वडेट्टीवार यांनी जसेच्या तसे पत्रकारांना सांगितले आहे. उच्च पदस्थ राजकीय नेते चाणाक्ष असतात, त्यांचा मेंदू तल्लख असतो असा जनतेचा समज आहे, तो समज वडेट्टीवारांनी पार धुळीस मिळवला. काही राजकीय नेते खुळचट आणि डोक्यावर पडलेलेही असतात.
पी.चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री असताना हिंदू दहशतवादाची थिअरी देशावर लादण्याया प्रयत्न झाला. ही थिअरी मजबूत करण्यासाठी काँग्रेसची इको सिस्टीम राबत होती. मुश्रीफ यांचे पुस्तक त्याचा भाग होते. या पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले होते. यावरून ही बाब पुरेशी स्पष्ट व्हावी.

वड्डेट्टीवारांचे विधान आणि त्या विधानाचा आधार असलेला तो व्हाट्सअप मेसेज पूर्णपणे खोटारडा आहे. वस्तूस्थिती अशी आहे की अजमल कसाब याने एकत्र जीपने जाणाऱ्या एटीएस प्रमुख हेमंत करकरे, त्यांच्यासोबत असलेले एसीपी अशोक कामटे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्या दिशेने एके ४७ ने गोळ्या झाडल्या. पाच गोळ्यांनी करकरे यांच्या मानेचा वेध घेतला. चार गोळ्या आरपार गेल्या. एक गोळी हाडाला आदळली आणि त्यांच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये राहिली. करकरे, कामटे आणि साळसकर यांना जखमी अवस्थेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तिघांचा मृत्यू झाला. साळसकर यांचा सहकारी अरुण जाधव त्याच जीपमध्ये होता. तो मात्र बचावला. त्याला पाच गोळ्या लागल्या होत्या. तो या घटनाक्रमाचा प्रत्यक्षदर्शी आहे. त्याने ऑन कॅमेरा सांगितले आहे की दोन दहशतवाद्यांनी अटोमॅटीक रायफलने आमच्या क्वालीसवर अंदाधुंद फायरींग केले. विरोधी पक्ष नेत्याला यातले काहीच माहिती असू नये, ही शरमेची बाब आहे.

करकरे, कामटे, साळसकरांवर गोळीबार केल्यानंतर कसाबला जिवंत पकडताना कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी जीवाची बाजी लावली. ते हुतात्मा झाले. या झटापटीत गोविलकर यांच्या कमरेलाही गोळी लागली होती. ते आठ दिवस हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांचाच वडेट्टीवार संघाशी संबंधित अधिकारी असा करतायत. संजय गोविलकर यांना या कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक मिळाले. त्याच्या पुढील वर्षी पराक्रम पदकही मिळाले. राज्यात त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचे सरकार होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ज्याच्या सूत्रधार होत्या. हिंदू दहशतवादाची थिअरी मांडणाऱ्या नेत्यांचे सरकार. त्यांनीच संजय गोविलकर यांचा गौरव केला. त्यामुळे वडेट्टीवार यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना दोष द्यायला हवा.

हे ही वाचा:

कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंना धक्का; उपजिल्हाप्रमुखांसह माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना दिलासा; निर्यातीवरील बंदी हटवली

ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!

कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक

करकरे, कामटे यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या कसाब आणि अबू इस्माईल या दहशतवाद्यांनी झाडलेल्या असल्याची साक्ष ग्रँड मेडिकल कॉलेजचे डॉ. भालचंद्र चिंचलकर यांनी विशेष सत्र न्यायलयात दिलेली आहे. कसाबने न्यायालयासमोर आपण निर्दोष आहोत हे सांगितले. आपण करकरे, कामटेंवर गोळ्या झाडल्याच नाहीत असा कांगावा केला. परंतु, सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा कांगावा टिकला नाही. सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशी कायम ठेवल्यानंतर, कसाबने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. राष्ट्रपती हे कोणत्या पक्षाचे नसतात. परंतु, प्रणब मुखर्जी हे अनेक दशके काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस पक्षाचे नेते होते, त्यांनी हा दयेचा अर्ज फेटाळला. त्यामुळे वडेट्टीवार यांनी त्यांचा संबंध संघाशी होता का? हे एकदा तपासून पाहावे.

उज्ज्वल निकम यांना दोष देताना आणि देशद्रोही ठरवताना आपण कसाबला क्लीनचीट देतोय याचे भान वडेट्टीवारांना नसावे हे दुर्दैव आहे. काँग्रेस पक्ष मुस्लीम मतांसाठी कोणालाही खांद्यावर घेऊ शकतो आणि कोणालाही देशद्रोही ठरवू शकतो. काँग्रेस हे देशावर एक ओझे बनला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version