चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चिनी चापट…

जे जगाला कळले ते राहुल गांधी यांना कळण्याची शक्यता नाही.

चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चिनी चापट…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेला काही काळ देशात चीनचे एकमेव प्रवक्ते म्हणून वावरत होते. देशाची लोकसभा असो, परदेशातील कोणताही मंच असो, राहुलबाबा सातत्याने चीनचे गुणगान करताना दिसले. फक्त चीनची भलामण नाही, भारताच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर टीकास्त्र सोडणे हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम झाला होता. चीनची चाटूगिरी करणाऱ्या राहुल गांधी यांना चीननेच दणका दिला आहे.

 

गालावर बसलेली ही चिनी चापट निश्चितपणे झणझणणारी आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाशी भारतातील काँग्रेस पक्षाने एक गोपनीय करार केला होता. या करारात काय कलमे आहेत, हे भारतीयांना आजतागायत कळलेले नाही. परंतु या करारानंतर यूपीए सरकारची भूमिका अधिकाधिक चीन धर्जिणी झाली. राहुल गांधी चीनच्या आरत्या ओवाळू लागले. गेल्या काही काळातील राहुल गांधी यांची विधाने पाहा. चीनने भारतात बसवले आहे, कारण मेक इन इंडिया मोहीम अपयशी झालेली आहे. त्यांनी मेक इन इंडियाची पोकळ घोषणा दिलेली आहे, परंतु भारतात सगळीकडे मेड इन चायना वस्तू दिसतात. बॅटरीज, रोबोटीक्स, वाहन, आदी क्षेत्रात चीनने आघाडी घेतली असून अंतराळ क्षेत्रात चीन भारतापेक्षा किमान दहा वर्षाने पुढे आहे.

 

राहुल गांधी यांची ही टीका केवळ चीनचे कौतुक करणारी नाही. भारताला कमी लेखणारी आहे. काँग्रेसचे चीनबाबतचे धोरण कायम बोटचेपे आणि पळ काढू राहिले. चीन सीमेवर चांगले रस्ते निर्माण केले, तर चीनी सैन्याला भारतात घुसणे सोपे होईल, असे विधान यूपीएच्या काळातील संरक्षण मंत्री ए.के.अण्टनी यांनी केले होते. लष्कराच्या वारंवार विनंतीनंतरही दौलतबेग ओल्डी ही हवाई पट्टी सक्रीय करण्यास यूपीए सरकार टाळाटाळ करीत होते. त्यातुलनेत मोदींच्या नेतृत्वाखाली भारत चीनला योग्य प्रकारे हाताळताना दिसतो आहे. चीनच्या आक्रमकतेला डोळ्यात डोळे घालून उत्तर देताना दिसतो आहे. परंतु तरीही राहुल गांधी चीनची टीमकी वाजवत असतात. त्यांना भारतात काहीच चांगले होताना दिसत नाही.

हे ही वाचा:

…आणि अनंत अंबानींनी कोंबड्याच दुप्पट किमतीने विकत घेतल्या!

‘राज्याचे नाट्यगृहधोरण दोन महिन्यात येणार’

‘रस्ते वाहतुकीसाठी आहेत, प्रार्थनेसाठी नाहीत’, हिंदूंकडून शिस्त शिका!

वक्फ विधेयक सादर करण्यास राहिले अवघे काही तास!

 

राहुल यांच्या या चिनी चाटुकारीतेबाबत भाजपाच्या नेत्यांनी कायम त्यांना धारेवर धरले. परंतु जवळच्या माणसांनी हजामत करण्याची बातच काही और असते. ज्या राहुल गांधी यांना मोदी सरकारच्या काळातले काहीच चांगले दिसत नाही, त्यांचे दात घशात घातले भारतातील चीन राजदूत झू फेह़ाँग यांनी अलिकडेच एक्सवर एक पोस्ट केली होती. २०१५ ते २०२५ याकाळात भारताचा जीडीपी २.१ ट्रीलियनवरून ४.३ ट्रीलियन झाला असल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे. फेहाँग यांनी दिलेली आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आहे.

भारताच्या जीडीपीची गेल्या दहा वर्षांतील वाढ १०५ टक्के आहे. जागतिक महासत्तांच्या तुलनेतही ही वाढ अव्वल आहे. भारताच्या पाठोपाठ चीनचा जीडीपी ७६ टक्के वाढला आहे, अमेरिकेचा जीडीपी ६६ टक्के वाढला आहे. युरोपिय राष्ट्रांची जीडीपी वाढ अगदीच कमी आहे. जर्मनी ४४ टक्के, यूके २८ टक्के, फ्रान्स ३८ टक्के, इटाली ३९ टक्के अशी जीडीपीमध्ये गेल्या दहा वर्षात वाढ झालेली आहे. कधी काळी आशियातील महासत्ता असेलेल्या जपानचा जीडीपी दहा वर्षात वाढलेलाच नाही. फेहाँग यांच्या या पोस्टचे अनेक अर्थ आहेत. त्यांनी भारताचे कौतुक करून मोदींना वाकून सलामी दिलेली आहे.

 

आंतरराष्ट्रीय राजकारणात वावरणारे मुत्सद्दी शब्द कायम तोलून मापून वापरत असतात. एकेका शब्दाला महत्व असते. एकेका वाक्यात सखोल अर्थ दडलेला असतो. तुमच्या देशात काम करणारा एखाद्या देशाचा राजदूत जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या तोंडून त्या देशाची भूमिका व्यक्त होत असते. फेहाँग यांची प्रशंसा सांगते आहे, की चीनला मोदी सरकारशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. यातून चीनचे इरादे बदलले आहेत, असा अर्थ काढण्याची गरज नाही. चीन हा धोकादायक आहे, परंतु मोदी भारताचे नेतृत्व करतायत, तोपर्यंत काड्या करता येणार नाही, याची जाणीव चीनलाही झालेली आहे. फेहाँग तीच भावना व्यक्त करतायत.

 

फेहाँग यांच्या वक्तव्याचा दुसराही अर्थ आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या तोंडात मारलेली आहे. त्यांना एक प्रकारे लायकी दाखवून दिलेली आहे. चाटुकारिता करून जगभरात कोणाला आदर मिळत नाही. चीनची चाटुकारिता करून राहुल गांधी यांना कोणताही फायदा झालेला दिसत नाही. उलट देशाच्या शत्रूची भलामण करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा झालेली आहे. चाटुकारिता करून लोकप्रियता मिळत नाही. नाही तर मणिशंकर अय्यर पाकिस्तानात सर्वाधिक लोकप्रिय असलेले भारतीय नेते बनले असते. तिथे सर्वात लोकप्रिय मोदीच आहेत.

 

जग बहुध्रुवीय झाले आहे. एका बाजूला रशिया मळभ झटकून पुन्हा उभा राहताना दिसतो आहे. पुतीन या देशाचे नेतृत्व करतायत. अमेरीकेचे नेतृत्त्व डोनाल्ड ट्रम्प करतायत. हे दोन्ही नेते कायम मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना दिसतात. युरोपमध्ये सुद्धा इमॅन्यूअल मॅक्रॉन, जॉर्जिया मेलोनी हे नेते मोदींचे चाहते आहेत. जग तुमच्या चेहऱ्यावर भाळत नाही, ना तुमच्या आदर्शावर, तुमच्या मनगटात बळ किती हाच मुद्दा महत्वाचा असतो. मोदींच्या कार्यकाळात भारताच्या मनगटातील बळ वाढलेले आहे. फक्त जीडीपीचे आकडे वधारले नाहीत, भारताचे परराष्ट्र धोरणही खणखणीत झालेले आहे. शस्त्रनिर्मिती, शस्त्रनिर्यातीत भारत दमदार कामगिरी करतो आहे. त्यामुळे जे जगाने मान्य केले तेच चीनचे राजदून फेहाँग मान्य करताना दिसतायत.

 

मोदींचे किंवा भारताचे कौतुक करून ते काही भारतावर उपकार करत नाहीत. आम्ही मोदींच्या गुडबुकमध्ये राहू इच्छितो, एवढाच त्यांच्या विधानाचा अर्थ. जे जगाला कळले ते राहुल गांधी यांना कळण्याची शक्यता नाही. त्यांच्यात तेवढी समज नाही. विचार करण्याची क्षमता नाही. दुसऱ्याने लिहिलेले वाचायचे या पलिकडे त्यांची कुवत नाही. ज्यांची ते सतत टिमकी वाजवत होते, त्या चीननेही त्यांचा बाजार उठवलेला आहे. यामुळे राहुल गांधी तिरमिरतील हे नक्की. कदाचित अंगात गर्मी निर्माण करण्यासाठी ते तपश्चर्येसाठी बँकॉकही गाठतील.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version