‘सनातन धर्माला नष्ट केले पाहीजे’, अशी भूमिका डीएमकेचे नेते आणि मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी अलिकडेच जाहीरपणे मांडली. अशी उघड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ घेऊ शकत नाहीत. कारण त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात आपली राजकीय कबर खोदायची नाही. परंतु त्यांची मानसिकता स्टॅलिनपेक्षा वेगळी नाही. कधी माता सरस्वती तर कधी अथर्वशीर्षाला विरोध करून भुजबळ ही बाब सिद्ध करत असतात. नाशिकमध्ये सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण पूर्ती निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यात अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या हजारो महिलांच्या नावाने बोटं मोडायची स्वत: मात्र मात्र ठिकठिकाणी गणेशोत्सवांना भेटी द्यायच्या असा हा सोयीचा मामला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नाशिकमध्ये या सत्यशोधन समाजाने राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात भुजबळ यांनी पुण्यातील अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाला लक्ष्य केले. दगडूशेठ गणपती समोरच्या रस्त्यावर हजारो महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष म्हटले जाची भुजबळांना भयंकर पोटदुखी झाली.
ओबीसी समाज आजही कर्मकांडामध्ये गुंतलेला आहे. हजारो महिला एकाच वेळी देवासमोर नतमस्तक होतायत. परंतु त्या रस्त्याच्या पलिकडे असलेल्या भिडेवाड्यात मात्र या महिलांना जावेसे वाटत नाही. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचा मात्र त्यांना विसर पडला आहे, असे वक्तव्य भुजबळांनी या कार्यक्रमात केले. गणपतीची आराधना केली म्हणजे सावित्रीबाईंचा विसर पडतो हे कसले लॉजिक? हे म्हणजे एखाद दिवशी मी फक्त भाकरी खाल्ली म्हणजे माझा भाताला किंवा पोळीला विरोध असा अर्थ काढण्यासारखे आहे.
ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे दुर्दैव असे की भुजबळांसारख्या पलटीमार नेत्यांच्या खांद्यावर या संस्थेची भिस्त राहिली. जे भुजबळ कधी काळी नथुराम गोडसे यांचे भक्त होते, त्यांनीच ज्योतिबा फुलेंचे नाव घेऊन समता परिषदेची स्थापना केली. ओबीसी नेता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. परंतु ज्योतिबांचा वारसा सांगण्याची खरोखरच भुजबळांची किंवा ज्यांनी त्यांना या मार्गावर आणले त्या शरद पवारांची योग्यता आहे का?
हे ही वाचा:
वहिदा रहमान यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी
केशवजी नाईक चाळ गणेशोत्सवाला नड्डा यांची भेट!
राम मंदिराबाबत काँग्रेसने पुन्हा गरळ ओकली
काश्मीरवरील पाकच्या अतिक्रमणाबाबत जीनिव्हामध्ये निदर्शने !
घरी गणेशोत्सवानिमित्त घरी गणपती बसवणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबाच्या घरी भुजबळांनी गणेशोत्सवाच्या काळात भेट दिली. त्यांच्या या कृतीमुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य कसे मजबूत होत आहे, अशी जोरदार भलामण केली. हिंदू महीलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण केल्यामुळे गुदमरायला लागलेला ज्योतिबा फुलेंचा विचार एका मुस्लीम कुटुंबाच्या गणेशभक्तीमुळे मजबूत कसा होतो, हे कोडेच आहे.
ज्योतिबा फुले यांचा कर्मकांडाला, मूर्तिपूजेला विरोध होता. परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या शरद पवारांना हा विचार मान्य आहे का? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना नास्तिक म्हटल्यानंतर आपण नास्तिक नाही परंतु आस्थेचे प्रदर्शन करायला आपल्याला आवडत नाही, असे पवार म्हणाले. त्यानंतर ते आपली आस्तिकता सिद्ध करण्यासाठी दगडू शेठ मंदीरात गणेश दर्शनही करायला गेले होते. ही तर निव्वळ ज्योतिबा फुले यांच्या विचाराशी प्रतारणा आहे. पुरोगाम्यांच्या समोर बोलताना नास्तिक आणि सोयीप्रमाणे आस्तिक अशी ही पवार नीती आहे. छगन भुजबळही तेच करताना दिसतायत.
अथर्वशीर्षाला नाकं मुरडणारे छगन भुजबळ गणेशोत्सवानिमित्त ठिक ठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांना भेटी देतायत. तिथे त्यांनी आपल्याला मूर्तिपूजा मान्य नाही, मी देव मानत नाही, असे सांगायला हवे. नंतर फुलेंचा वारसा सांगायला हवा. आणि जर ते तिथे हे सांगू शकत नसतील तर अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या महीलांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी मनात श्रद्धाभाव नसताना गणेश मंडपांची सैर करू शकता, मग ज्यांच्या मनात भक्तीभाव आहे, त्यांनी अथर्वशीर्ष म्हटले तर तुम्हाला त्रास का होतोय?
घरात गणेशमूर्ति स्थापित करून तिची पूजा करणाऱ्या मुस्लीमाचे कौतूक करायचे आणि महीलांनी अथर्वशीर्ष म्हटल्यावर पाटणकर काढा प्यायल्या सारखे तोंड करायचे हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. हा दुटप्पीपणा भुजबळ-पवारांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. राजकारण करताना सोयीच्या भूमिका घेत राहायच्या. कधी नथूराम भक्ती तर कधी ज्योतिबा भक्ती. कधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब देव तर कधी शरद पवार हे दैवत. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरवायची. तुम्हाला जे जमते ते सर्वसामान्यांना जमण्याची शक्यता नाही.
ओबीसी समाज कर्मकांडातून बाहेर पडत नाही, अशी खंत भुजबळ व्यक्त करतात. भुजबळांची कर्म आणि कांड दोन्हीही महाराष्ट्राने पाहिलेली आहेत. त्यांनी ओबीसी समाजाचे नेते बनण्याचा प्रयत्न जरुर करावा, परंतु आपण ओबीसींचे मसिहा आहोत हा दावा करण्याचे कारण नाही. अंगावर साप गेल्यामुळे आपण मुख्यमंत्री झालो, अशी ज्यांची ठाम धारणा आहे, असे त्यांचे पुरोगामी गुरू शरद पवार यांचे आधी भुजबळांनी प्रबोधन करावे आणि त्यानंतर ओबीसी समाजाला साद घालावी.
कोणी मराठा, धनगर, माळी, कुणबी, भंडारी, कोळी या जातीच्या नावाने उभा राहिला आपले हक्क मागितले, आंदोलने केली की भुजबळांचा उर भरून येतो. परंतु जाती-जातींची हीच मंडळी जेव्हा हिंदू म्हणून एकत्र येतात. सनातन धर्माचा शंख फुंकतात तेव्हा मात्र भुजबळ अस्वस्थ होतात. सनातन धर्माची ही ध्वजा एखादे मुस्लीम कुटुंब अभिमानाने मिरवते तेव्हा धार्मिक सलोखा निर्माण होतो आहे, हे पाहून भुजबळांना आनंदाचे भरते येते. पण जेव्हा हिंदू समाजातील महिला या हजारोच्या संख्येने एकत्र येऊन अथर्वशीर्ष म्हणतात, ही धर्म ध्वजा आनंदाने फडकवतात, तेव्हा मात्र भुजबळांना मळमळ होते. हे दुसरे तिसरे काहीही नसून भुजबळांच्या मेंदूमध्ये झालेला केमिकल लोच्या आहे.
याला भुजबळांचा डीएमके पॅटर्न अशासाठी म्हणायचे की सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करायची, परंतु मंदिरात जमा होणाऱ्या सोन्यावर लक्ष ठेवायचे हा पॅटर्न द्रमुक पक्ष तामिळनाडूमध्ये राबवतो आहे. भुजबळांची मानसिकता वेगळी नाही. श्रद्धा नसली तरी चालेल, परंतु त्या श्रद्धेतून होणाऱ्या लाभावर मात्र डोळा ठेवायचा, ही भुजबळ-पवार नीती आहे. अशाच संधीसाधू पुरोगाम्यांनी फुलेंचा विचार बुडवला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)