24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयशिवसेनेचा गांधीवादी समाजवाद

शिवसेनेचा गांधीवादी समाजवाद

Google News Follow

Related

केंद्रात काँग्रेसेतर सरकार आणण्यासाठी भारतीय जनसंघाने केलेला जनता पार्टीचा प्रयोग फसला. जुना डाव मोडून १९८० साली भाजपाची स्थापना करण्यात आली. पक्षाची विचारधारा म्हणून गांधीवादी समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. खरे तर हा वडाची साल पिंपळाला चिटकवण्याचा प्रकार होता. रा. स्व. संघाच्या मुशीतून निघालेल्या या पक्षाने गांधीवाद आणि समाजवादाचे अजब मिश्रण पक्षाची विचारधारा म्हणून कार्यकर्त्यांच्या माथी मारली आणि पक्षाचे मातेरं करून घेतलं. ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींची दुर्देवी हत्या झाली. त्यानंतर, झालेल्या निवडणुकांमध्ये सहानुभूतीच्या लाटेत भाजपाचे पानिपत झाले हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे.

याच दरम्यान महाराष्ट्रात १९८७-८८ ला झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रमेश प्रभू यांचा विलेपार्ले येथून विजय झाला. या निवडणुकीत पार्ल्यातील भिंती ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणांनी रंगल्या होत्या. निवडणुकीत धर्माचा वापर केल्याचा ठपका ठेवत कोर्टाने ही निवडणूक रदबादल ठरवली. सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. अवघ्या देशात या निकालाचे पडसाद उमटले.

महाराष्ट्रात हे घडत असताना भाजपात बदलाचे वारे वाहू लागले होते. गांधीवादी समाजवाद आचके देत होता. भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी गांधीवादी समाजवादाला सोडचिठ्ठी दिली. राम मंदिराचा मुद्दा घेऊन देशभरात रथयात्रा काढली. हिंदुत्वाचा झेंडा घेऊन देशाचे राजकारण ढवळून काढले. पक्षाने मरगळ झटकत पुन्हा बाळसे धरले. कार्यकर्ते उत्साहात आले. राम आणि हिंदुत्व या दोन शब्दांनी कमाल केली.

हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना आणि भाजपाची युती झाली नसती तरच नवल होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावर होणाऱ्या प्रत्येक सभेत हिंदुत्व हा आमचा श्वास असल्याची गर्जना करत होते. शिवसेना-भाजपा युतीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट करीत असत. हिंदुत्वाच्या धाग्याने बांधलेली ही २५ वर्षे जुनी युती २०१४ मध्ये संपली.

शिवसेनेने २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवबंधन बांधले. भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी या दोन पक्षांसोबत सत्तेवर आल्यानंतर १९८० मध्ये भाजपाने केलेली चूक आता शिवसेना करते आहे. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारले आहे. हा बदल सूक्ष्म नाही, अगदी ठसठशीत दिसणारा आहे. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मिरवलेले ‘हिंदुहृदयसम्राट’ हे बिरुद बाजूला सारून ‘वंदनीय शिवसेनाप्रमुख’ अशा उल्लेखाने हा कायापालट सुरू झाला. दक्षिण मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अजान स्पर्धा, वडाळ्यात प्रसिद्ध करण्यात आलेले उर्दू कॅलेंडर, त्यात शिवसेनाप्रमुखांचा जनाब बाळासाहेब असा उल्लेख शिवसेना कात टाकत असल्याचे संकेत होते. भाईंदरमध्ये टीपू सुलतान जयंतीचे बॅनर आणि त्यावर बाळासाहेबांचा हिरव्या शालीतला फोटो म्हणजे या सर्वांवर कडी.

भाजपाने टीका केली की, आम्हाला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं काही तर बोलायचं आणि विषय झटकून टाकायचा.

शिवसेनेचे नेतृत्व आणि मुखपत्र राहुल गांधीवर स्तुतीसुमनांची करीत असलेली उधळण पाहिली की त्यांनी राहुल गांधीवाद अगदी मनापासून स्वीकारल्याचे लक्षात येते.

हा बदल शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत होऊ शकला नसता. पक्षाने घेतलेला हा वैचारीक यु-टर्न नेमका मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या की युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रभावाखाली घेतलाय याची उकल अद्यापि झालेली नाही. परकाया प्रवेश करण्याची शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची क्षमता अफाट आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत ते त्यांच्यासारखे लिहीत, बोलत. आता ते उद्धवजींसारखे लिहितात, बोलतात.

पक्षवाढीसाठी जुन्या भूमिकेचा त्याग करून नवी भूमिका घेणे यात काहीच गैर नाही. मनसेने अलिकडे बदललेला पक्षाचा झेंडा हे त्याचे ताजे उदाहरण. १९८९ मध्ये गांधीवादी समाजवादाचे मळभ झटकून टाकत भाजपाने पुन्हा एकदा ज्वलंत हिंदुत्वाचा स्वीकार केला. चूक सुधारली. शिवसेना मात्र आज हिंदुत्वाचा त्याग करून राहुल गांधीवादाचा स्वीकार करत आहे. हा निर्णय किती फळेल हे येणारा काळच सांगेल. तूर्तास ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना जयंतीदिनी आमचे त्रिवार अभिवादन!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा