23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरसंपादकीयआंध्रमध्ये चंद्राबाबूंचे गोविंदा गोविंदा!

आंध्रमध्ये चंद्राबाबूंचे गोविंदा गोविंदा!

Google News Follow

Related

भारतातील सर्वात श्रीमंत देवालय म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान ओळखले जाते. अस्सल देशी तुपातला बुंदीच्या लाडूचा प्रसाद इथून लौकीकास प्राप्त झाला. पुढे त्याचा प्रवास शिर्डी, गणपतीपुळे ते सिद्धिविनायक असा झालेला दिसतो. या लाडवांवरून आंध्र प्रदेशचे राजकारण प्रचंड तापलेले आहे. लाडवांमध्ये जनावरांच्या चर्बीचा वापर झाला, असा खळबळजनक आरोप आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेला आहे. जितक्या त्वेषाने नायडू हा आरोप करीत आहेत, तितक्याच त्वेषाने वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी तो फेटाळला आहे. दक्षिणेतील राज्यातील दोन प्रादेशिक पक्षांचे नेते, त्यापैकी एक धर्मांतरित. परंतु हे दोघेही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर समोरासमोर उभे ठाकलेले दिसतात. दक्षिणेतील भूमी हिंदुत्वासाठी किती पोषक बनली आहे, त्याची ही निव्वळ झलक आहे.

तेलगू देसम पक्षाचे नेते आणि वायएसआयचे जगनमोहन रेड्डी यांच्यात हाडवैर आहे. मुख्यमंत्री असताना जगन यांनी नायडू यांना तुरुंगात टाकले होते, तिथून या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तव जात नाही. सत्तेवर आल्यानंतर हिशोब चुकते करण्यासाठी चंद्राबाबू उत्सुक आहेत. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे गुंटुर ताडेपल्ली येथील कार्यालय चंद्राबाबूंनी तोडून टाकले. जगन यांच्या राहत्या घरावरही हातोडा चालवला. जगनना ते एका पाठोपाठ दणके देत सुटले आहेत. आता लाडवात चरबी युक्त तूप मिसळल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.

हा फक्त भेसळीचा आरोप नाही. तो हिंदूंच्या श्रद्धांशी खेळल्याचा, त्या श्रद्धांचा अवमान केल्याचा आरोप आहे. तिरुमला तिरुपती हे फक्त दक्षिण भारतातील देवालय नसून जगभरातील हिंदूंचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. लाखो भक्त दरवर्षी कोट्यवधीची संपत्ती इथे ईश्वरचरणी समर्पित करतात. इथे जे केस दान केले जातात, त्यातूनच देवस्थानाला कोट्यवधींचा लाभ होतो. हिंदूंच्या या श्रद्धा जगन यांनी पायदळी तुडवल्याचा आरोप नायडू करीत आहेत. हा आरोप यांच्यावर चिकटू शकतो हे नायडूंना पक्के ठाऊक आहे. कारण जगन हे धर्मांतरीत आहेत. देशभरातील धर्मांतरीत झालेले लाखो ख्रिस्ती जसे सोयीसाठी हिंदू नावे वापरतात जगन त्यातलेच आहेत, अशी चर्चा आहे. राहुल गांधी हे जसे कॅथोलिक आहेत, परंतु निवडणुकांच्या काळात मंदिर मंदिरात फिरत असतात तसे जगन हे फक्त नावापुरते हिंदु आहेत, असा आरोप त्यांचे विरोधक वारंवार करत असतात.

हे ही वाचा:

हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक आणि ईदच्या मिरवणुकींवेळी भाईचारा

अश्विनचे ऐतिहासिक शतक, भारताला सावरले

पाकिस्तान म्हणतो, ३७० कलमाबाबत आम्ही काँग्रेससोबत

दगडफेक करणाऱ्या जम्मू- काश्मीरच्या लोकांच्या हातात आता पुस्तकं, पेन दिसतायत

सत्तेवर आल्यानंतर तिरुमला तिरुपती बस प्रवासाच्या तिकीटावर चलो जेरुसलेम, अशी जाहीरात छापण्यात आली होती. त्या विरुद्ध भाजपाचे तत्कालीन सह प्रभारी सुनील देवधर यांनी सोशल मीडियावर जगन यांच्या सरकारवर टीकेची राळ उठवली होती. जगन सरकारच्या आणखी एक मंत्र्याने भगवान तिरुपती यांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरात नाताळच्या शुभेच्छा दिल्याचे प्रकरणही त्यांनी जोरदार तापवले होते. याचा परिणाम असा झाला की, धर्मांने ख्रिस्ती असलेले जगन हे तिरुपती देवस्थानाच्या मुद्द्यावरून हिंदू श्रद्धांशी छेडछाड करीत असल्याचे चित्र निर्माण झाले. जगन यांच्या काळात आंध्रमध्ये चर्च प्रचंड सक्रीय झाले असून धर्मांतरणाची लाट आल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून होऊ लागला.

हीच ती पार्श्वभूमी आहे ज्यामुळे प्रसादाच्या लाडूसाठी जे तूप वापरण्यात येते ते शुद्ध नसून त्यात जनावराची चरबी मिसळली जाते, असा आरोप नायडू करू शकले. नायडू जेवढ्या आक्रमकपणे हा आरोप करीत आहेत, तेवढ्याच आक्रमकपणे वायएसआरचे नेते हा आरोप फेटाळत आहेत. वायबी सुब्बाराव रेड्डी यांनी चरबी मिसळल्याचा आरोप करून नायडू हेच हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम करीत असल्याचा दावा केलेला आहे.

हिंदू मुखवटा असलेला ख्रिस्ती मुख्यमंत्री ही प्रतिमा आपल्याला शेकणार याचा अंदाज असल्याने जगन कायम हिंदू मंदीर, हिंदू संतांच्या गाठीभेटी, गंगास्नानाचे फोटो कायम त्यांच्या किंवा समर्थकांच्या सोशल मिडियावरून व्हायरल करत असतात. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी दलित वस्त्यांमध्ये धर्मांतर होत असल्याच्या आरोपाची हवा काढण्यासाठी तिरुपती देवस्थानाच्या माध्यमातून दलित वस्त्यांमध्ये मंदीर उभारण्याची योजना जाहीर केली. त्याचे काम एका हिंदुत्ववादी संघटनेला दिले.

या संपूर्ण घटनाक्रमाचा अर्थ असा आहे की, हिंदू श्रद्धांचा मुद्दा बनवून तेलगू देशमचे सर्वोच्च नेते, आंध्रचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील रालोआ सरकारचे एक महत्वाचे घटक चंद्राबाबू नायडू हे माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांचे हिशोब चुकते करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या आरोपांचे उत्तर देताना जगन यांचे समर्थकही आम्ही हिंदू श्रद्धांचे विरोधक नाही, असे ठामपणे सांगत आहेत. प्रत्यक्षात नायडूंच्या आरोपात कितपत तथ्य आहे किंवा नाही ही बाब समोर येईलच, परंतु या निमित्ताने हिंदू मंदिरांचे, हिंदू श्रद्धास्थानांवरील सरकारचे नियंत्रण संपवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झालेली आहे. मंदिरांची, मठांची सूत्र पूर्णपणे हिंदूंच्या धार्मिक संघटनांच्या हाती असावी, हिंदू धर्मावर ज्यांची श्रद्धा आहे, अशाच लोकांना मंदीराच्या कारभाराचे दायित्व सोपवले जावे. असे झाले तरच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे पावित्र्य जपले जाईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा