30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरसंपादकीयपवारसाहेब, राजकारणाचा केंद्रबिंदू बदलला आहे!

पवारसाहेब, राजकारणाचा केंद्रबिंदू बदलला आहे!

पवारांची सत्ता असताना सत्तासनाच्या खाली बॉम्ब फोडण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Google News Follow

Related

महाराष्ट्रात काहीही झाले तरी एकाच माणसाचे नाव येते, किल्लारीचा भूकंप झाला होता, तेव्हाही काही लोकांनी माझ्याकडे बोट दाखवले होते, असे मिश्किल विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. निवृत्तीला आलेला माणूस इतिहासात फार रमतो. पवारांचेही तेच झालेले आहे. ते मान्य करणार नाहीत परंतु गेल्या काही वर्षात राज्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू बदलला आहे.

काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीच्या सस्पेन्सवरून देवेंद्र फडणवीस यांनी पडदा उठवला होता. तेव्हा पवार प्रचंड अस्वस्थ झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत माणसाला असे असत्य बोलणे शोभत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. पवार एखाद्या विषयावर अलिकडे तत्काळ व्यक्त होत नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर ते लगेच बोलून मोकळे झाले.

आता त्याच विषयावर बोलून पवारांनी एकप्रकारे फडणवीसांनी जे सांगितले त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते असे पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी भाजपाला पद्धतशीरपणे गंडवले यावर पवारांनी शिक्कामोर्तब केले आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठायला मदत झाली हे यापूर्वी पवारांचे विश्वासू जयंत पाटील यांनीही सांगितले आहे.

पहाटेच्या शपथविधीचा आता सस्पेन्स उरलेला नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यावरून बऱ्यापैकी पडदा उठवला आहे. त्यामुळे पवार बोलले किंवा बोलले नाही तरी लोकांना जे काही कळायचे ते कळले आहे. पण पवार ज्या दुसऱ्या मुद्यावर बोलले त्या मुद्यावर बोलणे गरजेचे आहे. राज्यात काहीही झाले तरी लोक पवारांकडे बोट दाखवतात. ही बाब एकेकाळी सत्य होती.

पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू होते. राज्यात आलेले पुलोदचे सरकार हा त्यांचा यशस्वी राजकीय प्रयोग होता. त्यानंतर दोन निवडणुका हरल्यावर ते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आले. त्यानंतर राजीव गांधींच्या आवताणावरून काँग्रेस प्रवेश, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, त्याच वर्षी काँग्रेसशी हातमिळवणी करून सलग १५ वर्षे राज्यात स्थापन केलेली काँग्रेस आघाडीची सत्ता या सगळ्या घटनाक्रमाचे केंद्रबिंदू पवारच होते.

२०१४ नंतर राज्याचे चित्र बदलले. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून हे केंद्र बदलण्याची सुरू झाली.
पाच वर्षात पवारांनी टाकलेले सगळे पेच, निर्माण केलेला प्रत्येक गुंता सोडवत फडणवीसांनी कुशलतेने पाच वर्ष राज्याचा गाडा हाकला. फक्त या दरम्यान शिवसेनेला पवारांनी मांडीवर घ्यायला सुरूवात केली आहे, ही बाब मात्र त्यांच्या नजरेतून निसटली किंवा उद्धव ठाकरे राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही, याबाबत ठाम असल्यामुळे ते बेसावध राहिले. त्यातून २०१९ नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले.

हे सरकार आणण्यासाठी पहाटेच्या शपथविधीचा वापर झाला. राष्ट्रपती शासन हटवण्यासाठी टाकलेले ते एक पाऊल होते. या गंडवण्याच्या प्रक्रियेत अजित पवार सामील नव्हते हे त्यांच्या मौनावरून सिद्ध झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही राज्याचा केंद्र बिंदू देवेंद्र हेच होते. त्यांनीच राज्यात अडीच वर्षांच्या काळात बरेच भूकंप घडवले. शरद पवारही त्यामुळे हैराण होते. फडणवीसांना अटक करण्याचे कारस्थान त्यातूनच शिजले.

आधी गिरीश महाजनांची सेटींग लागली होती. त्यांना खंडणीप्रकरणी अटक करण्याची पूर्ण तयारी झाली होती. परंतु हा कट शिजवणाऱे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा गेम झाला. त्यांच्या कारस्थानाच्या व्हीडीयो रेकॉर्डींगचा पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेच्या उपसभापतींना सादर केला. संपूर्ण कारस्थानाचा पर्दाफाश केला. महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी हा कारनामा केला होता. सत्ताधारी तोंडात बोट घालून राहिले. सरकारी वकीलाच्या कार्यालयात त्याने रचलेल्या कटाचे रेकॉर्डींग करणे सोपे नव्हते. ते कोणी केले ही बाब अद्यापि अज्ञात आहे.

हे ही वाचा:

मतांसाठी जितेंद्र आव्हाडांचे मुस्लिमांसमोर लोटांगण

विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात न्यायालय कसे हस्तक्षेप करू शकेल?

नवाब मलिकांचा मुक्काम वाढला

केबल चॅनेल बंद ? लोक वैतागले

दुसरा बदल्यांचा घोटाळ्याचा पेन ड्राईव्ह अजूनच खळबळजनक ठरला. सरकार नसले तरी अनेक सरकारी अधिकारी देवेंद्र यांना मदत करत होते, यावर या पेन ड्राईव्हने शिक्कामोर्तब केले. या पेन ड्राईव्हमध्ये पवारांचे रेकॉर्डींग असल्याची चर्चा होती. आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीची वक्रदृष्टी वळण्याचे कारण हेच. पवारांची सत्ता असताना सत्तासनाच्या खाली बॉम्ब फोडण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी दाखवून दिले की राज्याच्या राजकारणाचे केंद्र मीच आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाजूला होणार आहेत, याची कुणकुण पवारांना होती, असे अजित पवार म्हणाले आहेत. परंतु त्यात फारसे तथ्य वाटत नाही. एकनाथ शिंदे असा प्रयत्न करीत आहेत, हे पवारांना समजले तरी ते त्यांना शक्य होणार नाही, असे त्यांना वाटले असण्याची शक्यता जास्त आहे.. नाही तर एकनाथ शिंदे फुटेपर्यंत ते बघ्याची भूमिका घेऊन बसले नसते. त्यांनी सरकार वाचवण्यासाठी ताकद पणाला लावली असती.

पवारांनी त्यांच्या कारकीर्दीत बरेच चमत्कार केले. परंतु आता चमत्कार करण्याची त्यांची क्षमता संपली आहे. अशी माणसे नेहमी इतिहासातील घटनांचे उदाहरण देऊन आपला प्रभाव कायम आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु हे दाखवण्याची वेळ येणे हाच त्यांचा फॉर्म संपल्याचा पुरावा असतो. केंद्र बिंदू दोन असू शकत नाहीत. महाराष्ट्रात काही घडलेच तर त्याचा केंद्रबिंदू फडणवीसच असतील. पवारांच्या चाली उलथलून लावण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे.
शब्दांचे बुडबुडे उडवून प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न पवारांनी करूही नये, कारण त्यातून उद्धव ठाकरे होण्याचा धोका असतो.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा