शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर काल बुधवारी ED ने केलेल्या छापेमारीत श्रद्धा लँडमार्क आणि अवनी इंन्फ्रा या बांधकाम कंपन्यांवर छापेमारी केली. अवनीमध्ये तर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी या संचालक आहेत. परंतु श्रद्धा लँड मार्कशी संजय राऊत यांचा कागदोपत्री तरी काही संबंध नाही. परंतु, राऊत वापरत असलेल्या दोन महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर या कंपनी मालकीच्या असल्याचे उघड झाले आहे.
या कंपनीचा पसारा मोठा आहे. ठाणे, मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीत मिळून या कंपनीचे किमान १२ बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. यातील बहुतेक प्रकल्प विक्रोळीत सुरू असून त्यात बऱ्याचशा उत्तुंग टॉवरचा समावेश आहे. ही गुंतवणूक काहीशे कोटींची आहे.
म्हाडाचे अनेक पुनर्विकास प्रकल्पही या कंपनीच्या हाती आहेत. गेल्या काही वर्षांत प्रचंड मोठी गुंतवणूक करणाऱ्या या कंपनीकडे असलेला पैसा संजय राऊतांचा आहे का? पत्राचाळ प्रकरणात मिळालेला पैसा राऊत यांनी इथे वळवला आहे का? याचा तपास ED चे अधिकारी करीत आहेत. बुधवारी श्रद्धाच्या तीन कार्यालयामध्ये मारलेल्या धाडींमध्ये ED ने बरीच कागदपत्र आणि अन्य पुरावे ताब्यात घेतलेले आहेत.
सातत्याने मराठी माणूस, मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता या मुद्यांवरून प्रवचने देणारे नेते मराठी माणसाचा वापर फक्त भाषणात तोंडी लावण्यापुरता करतात हा मुद्दा पुन्हा स्पष्ट होतो आहे. पैशाच्या बाबतीत हे नेते गुजराती किंवा मारवाडी व्यावसायिकांवर अवलंबून असतात. आदित्य ठाकरे यांना वरळीतून लढताना केम छो वरळीचा नारा द्यावा लागतो, त्यामागेही गुजराती प्रेम कमी आणि अशी धंदेवाईक समीकरणे जास्त असण्याची शक्यता आहे.
मोठा पैसा गुंतवण्यासाठी मोठा उद्योग हवा. बांधकाम उद्योग हा असा उद्योग आहे की ज्यात काळा पैसा सहज मुरवला जाऊ शकतो. किती मराठी माणसं या उद्योगात आहेत? रुणवाल, ओबेरॉय, गुंडेचा, ओमकार, लोढा, आशापुरा, हिरानंदानी, शापुरजी, गोदरेज अशाच नावांची गर्दी आहे. गेली २५ वर्षे शिवसेनेची मुंबईत सत्ता आहे, ठाणेही त्यांच्याचकडे आहे. या अडीच दशकांच्या काळात एकही मोठा मराठी बिल्डर किंवा कंत्राटदार उभा राहिला नाही. शिर्के यांच्यासारखे नाव म्हणजे केवळ अपवाद.
हे ही वाचा:
रंगीत पणत्यातून साकारला ५० फुटी बाप्पा
या बनावट चॅनेलवर मोदी सरकारचा आसूड
बोरिवलीतील दांपत्याच्या मृत्युस पालिकेतील शिवसेनेचे नेतृत्व जबाबदार
‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच म्हणायचे आमचा गड’
काळा पैसा सांभाळणे, तो वाढवणे, स्वच्छ करणे आणि मागितल्यावर परत देणे हे काम सोपे नाही. हे कौशल्य मराठी माणसाकडे नाही, यावर शिवसेना नेत्यांचा गाढ विश्वास असावा. त्यामुळे काळा पैसा ठेवण्यासाठी शिवसेना नेत्यांनाही कायम एखादा गुजराती, मारवाडी लागतो. ठाकरे कुंटुंबियांच्या कंपन्यांमध्ये सुद्धा तिथे मराठी माणूस चालत नाही. शेल कंपन्या, हवाला या विषयात पारंगत असलेला एखादा नंदकिशोर चतुर्वेदी लागतो.
मराठी तरुणांना फक्त वडापावच्या गाड्या चालवता येतात यावर शिवसेनेचा ठाम विश्वास आहे. मराठी तरुण जर उद्योजक बनले तर रस्त्यावर उतरून राडे कोण करणार हा प्रश्न असल्यामुळे, त्यातल्या त्यात वडापावच्या गाड्या बऱ्या असा विचार या मागे असावा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)