देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडगोळीचे युग अवतरल्यापासून विरोधकांसाठी इनकमिंग फ्री अशी रणनीती राबवण्यात आली. अनेकदा भाजपाच्या पठडीत न बसणाऱ्या परंतु, पाठीशी जनमत असलेल्या नेत्यांची भाजपामध्ये खोगीर भरती करण्यात आली. अनेकदा भाजपाच्या समर्थकांना पचनी पडणार नाही, असे निर्णय घेण्यात आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपामध्ये प्रवेश देणे हा याच मालिकेतील ताजा निर्णय. भाजपाच्या रणनीतीचा उलगडा ना समर्थकांना होतोय, ना विरोधकांनाही होताना दिसत नाही.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज रितसर भाजपामध्ये प्रवेश केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करीष्म्यामुळे प्रभावित होऊन आपण भाजपामध्ये दाखल झालो’, असे चव्हाण म्हणाले आहेत. कधी काळी याच चव्हाणांवर आदर्श घोटाळ्याचा ठपका असल्यामुळे भाजपाने ओरड केली होती. त्यांना भाजपाने प्रवेश कसा दिला? अशी ओरड आता मविआचे नेते करत आहेत. भाजपाच्या समर्थकांनाही हा प्रश्न आहे. भाजपाकडे वॉशिंग मशीन असल्याचा विरोधकांचा आरोप जुना झाला आहे.
मुळात महाराष्ट्रात जे होते आहे ते नवे नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्रिपुरामध्ये सलग पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या माणिक सरकार यांना पराजीत केले. त्यानंतर माकपाचे, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपामध्ये दाखल झाले होते. वास्तविक भाजपाचा दणदणीत विजय झाला होता. उपऱ्यांना पक्षात घेण्याची गरज नव्हती. परंतु, भाजपाच्या वरीष्ठ नेतृत्वाने जाणीवपूर्वक हा निर्णय रेटला. भाजपा नेते अमित शहा यांची ही रणनीती आहे. जी देशभरात राबवली गेली. तुमचे सर्व विरोधक तुमच्या बाजूला वळवा. ते समोर उभे राहून तुम्हाला आव्हान देण्यापेक्षा तुमच्या सोबत उभे राहतील. याचे दोन फायदे. त्यांच्याशी लढण्यात जो वेळ, ऊर्जा वाया जात नाही. ते ज्या पक्षातून आले तो पक्ष कमजोर होतो. इतर पक्षातील नेते आयात करताना फक्त एक अट असते. नेत्याकडे भक्कम जनाधार हवा.
अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भाष्य केले आहे. हे उपरे भाजपाच्या मानगुटीवर बसतील आणि एक दिवस आयात केलेला काँग्रेस नेता भाजपाचा अध्यक्ष बनेल. उद्धव ठाकरे यांना भाजपाचा इतिहास बहुधा माहित नाही. जनसंघाची स्थापना ज्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली, ते पूर्वी हिंदू महासभेचे मोठे नेते होते. भाजपाचे नेतृत्व करणारा कोणत्याही पक्षातून येऊ दे तो सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारधारेशी ठाम असणार हे निश्चित. बाकी जे अन्य नेते येतात, त्या प्रत्येकाबाबत भाजपाची गणिते वेगळी असतात.
हिमंता बिस्वसर्मा हे काँग्रेसमधून आले होते ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. जनता पार्टीमधून भाजपामध्ये आलेले ना. स. फरांदे पुढे महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार स्थान देणे ही भाजपाची कार्यपद्धती आहे. भाजपाने गेले दशकभर वापरलेल्या या रणनीतीचा परिणाम भाजपाच्या मजबूतीत किती झाला ते आज सांगणे कठीण, परंतु विरोधकांची परिस्थिती मात्र खंगल्यासारखी झाली हे निर्विवाद. त्यातही जी मंडळी भाजपाच्या वैचारीक साच्यात फिट्ट बसली त्यांनी तर कमाल केली आहे. हिमंता बिस्व शर्मा यांचे उदाहरण देता येईल. त्यांनी वेळोवेळी फक्त राहुल गांधी यांचे वस्त्रहरण केलेले नाही, तर हिंदुत्वाबाबतही ते जोरकसपणे बोलतात.
महाराष्ट्रात भाजपाने ही रणनीती वापरली, त्याचे परिणामही समोर आहेत. महाराष्ट्रातील मविआतील तीन पक्षांचे दुकान आजही सुरू असले तरी त्यांचा माल संपलेला आहे. गेल्या दशक भरात भाजपाने आपला प्रभाव देशभरात वाढवला. त्यासाठी पक्षवाढीसाठी थेट जनतेपर्यंत जाण्याचा कार्यक्रम राबवला. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांतील महत्वाचे नेते आपल्या बाजूला वळवून त्यांची कंबर ढीली केली. याचा परिणाम असा झाला की निवडणुकांमध्ये भाजपाच्या यशाची टक्केवारी वाढत गेली. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या यशातलं सातत्य पाहा. मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या यशाचे सातत्य पाहा. एकेकाळी मध्यप्रदेशात भाजपा आणि काँग्रेसची तुल्यबळ ताकद होती. भाजपाने इथे ज्योतिरादीत्य सिंदीया यांना आपल्या बाजूला वळवल्यामुळे ज्योतिरादीत्य यांच्या कार्यक्षमतेलाही वाव मिळाला. भाजपाला बळ मिळाले. विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयामुळे राज्यसभेत भाजपाचे बळ सातत्याने वाढते आहे. तिसऱ्या टर्ममध्ये कदाचित भाजपा बहुमतापर्यंत पोहोचेल.
हे ही वाचा:
शेतकरी आंदोलनात दिसला खलिस्तानी ध्वज!
पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करू!
इंदूरमध्ये भिकाऱ्याने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख रुपये!
सत्तेवर येऊन भाजपाला काय करायचे आहे याबाबत नेतृत्वाच्या मनात कधीच अस्पष्टता नव्हती. राम मंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७०, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, आत्मनिर्भरता, खमके अर्थकारण हेच वर्षोनुवर्षे हेच मुद्दे लोकांसमोर ठेवून भाजपाने निवडणुका लढवल्या. सत्तेवर आल्यावर दिलेली वचने पूर्ण केली. भाजपाने सत्तेसाठी सर्व पक्षातील लोकांसाठी दारे खुली केली. लोकांना पक्षात घेण्यासाठी आपल्या वैचारीक निष्ठा पातळ केल्या नाहीत. विचारधारेचा पिळ मोदी-शहा यांच्या राजवटीत अधिक घट्टच झालेला आहे.
तुम्हाला तुमची विचारधारा, तुमचे कार्यक्रम अधिकाधिक घट्ट रुजवण्यासाठीही सत्ता लागते. सत्ता हाती घेण्यासाठी भाजपाने वापरलेले तंत्र कित्येकदा वादग्रस्त ठरले आहे. परंतु सत्ता हाती आल्यानंतर त्याचा वापर पक्षाची ‘देश प्रथम’ हे धोरण राबवण्यासाठीच झाला याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. मोदी-शहा यांच्यामुळे राम मंदीर साकार झाले, कलम ३७० कलम झाले, सीएएसारख्या कायदा शक्य झाला, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या क्षेत्रात सुरक्षा दलांची होणारी उपेक्षा संपली, देश आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहण्याच्या स्थितीत आला. हे करण्यासाठी भाजपाने कितीही खालच्या पातळीचे राजकारण केले. कोणालाही पक्षात घेतले, कुठेही ठेवले तरी ते माफ आहे. मोदी-शहा यांचा तरीका कोणताही असो जोपर्यंत त्याचा नतीजा देशहिताचा आहे, तोपर्यंत त्यांच्या प्रत्येक खेळीच समर्थन करायला हरकत नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)