पवारांनी मुंडेंची लायकी काढली, स्वत:ची दाखवली…

पवारांनी मुंडेंची लायकी काढली, स्वत:ची दाखवली…

निवडणुकांचा खेळ कायमच अनिश्चित असतो. त्यामुळे येत्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामती संस्थान खालसा होईल का? त्यांच्या पक्षाचा सूपडा साफ होईल का? या प्रश्नांची उत्तरे ४ जूननंतरच मिळतील. परंतु, त्यांच्या पुरोगामी प्रतिमेचे धुके मात्र पार ओसरलेले आहे. धनंजय मुंडे हे लहान कुटुंबातून आणि लहान समाजातून आलेले असल्याचे वक्तव्य करून पवारांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा पुरोगामी मुखवटा ओरबाडला आहे.

एका वाहीनीवर झालेल्या शरद पवारांच्या मुलाखतीत त्यांना धनंजय मुंडे यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवार प्रचंड भडकले. धनंजय मुंडे यांची लायकी नाही, असे विधान त्यांनी केले. पुढे ते जे काही म्हणाले त्याला सरंजामी मानसिकतेचा वास आहे. शरद पवारांचा हा चेहरा जातवादाने बरबटलेला आहे. पुरोगाम्यांचा हा वठलेला आधारवड अत्यंत बुरसटलेल्या मानसिकतेचा आहे, हे उघड करणारे आहे.

धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले, ज्यांचे नाव तुम्ही घेता, त्यांच्याबाबत मी बोलावे इतकी त्यांची लायकी नाही. त्यांना कशा कशातून बाहेर काढले, याची यादी दिली तर एकंदर त्यांनी केलेले उद्योग याबाबत मी बोलू इच्छित नाही. लहान कुटुंबातला, लहान समाजातला उदयोन्मुख तरुण म्हणून त्यांना मी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. लोकांमध्ये नाराजी होती, असे असताना ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करत आहेत.

पवार यांनी जे काही सांगितले, त्यावरून पवार हे सेटलमेंट बादशहा आहेत, यावर शिक्कामोर्तब होते. जो पर्यंत एखादी व्यक्ती आपल्या पक्षात आहे, तोपर्यंत त्यांनी केलेल्या भानगडी निस्तरण्याचे काम पवारांनी सातत्याने केलेले आहे. माफिया दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या नवाब मलिक यांची सुद्धा पवारांनी अशीच ठामपणे बाजू घेतली होती. मविआच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध त्यांच्या दुसऱ्या की तिसऱ्या पत्नीने म्हणजे करुणा मुंडे यांनी आरोप केले होते. करुणा मुंडे यांच्या भगिनीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हा हेच पवार त्यांच्या पाठीशी एखाद्या पहाडासारखे उभे होते. त्यावेळी आरोप करणाऱ्या महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.

पवार ज्या उद्योगांचा उल्लेख करतायत, ते हेच उद्योग असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या महिला धोरणाचे करतेकरविते म्हणून स्वतःचा उदोउदो करणाऱ्या पवारांना लायकी नसलेल्या धनंजय मुंडेना सत्तेचे कवच प्रदान केले होते. तक्रार करणाऱ्या महिलेची पोलिसांनी याच सत्तेच्या दबावामुळे तासनतास चौकशी केली होती. करुणा मुंडे यांच्या काळात मविआच्या कार्यकाळात हल्ला झाला. त्यांच्या वाहनात पिस्तूल सापडले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हे कोणाच्या आशीर्वादाने घडले, याचा खुलासाही पवारांनी करावा आणि मग मुंडेंची लायकी काढावी. आपला असेल तोपर्यंत बाब्या, अजित पवारांचा झाल्यावर कार्टा ही पवारांची रित आहे.

हे झाले त्यांच्या महिला धोरणाचे पोतेरे कसे झाले आहे, त्याबाबत. आता त्यांच्या पुरोगामी चेहऱ्याबाबत बोलू. पवार यांनी धनंजय मुंडे यांची लायकी काढली ती ते लहान समाजाचे आहे म्हणून की महत्त्वाचे पदे देऊनही मुंडे त्यांच्यावर हल्ले करतायत म्हणून. कोणता समाज लहान आणि कोणता समाज मोठा हे ठरवणारे पवार कोण? मनात असलेल्या जातीच्या माजामुळे पवारांच्या तोंडून हे विधान अनावधानाने निघाले. ही जातवादी मानसिकता फक्त पवारांमध्ये नाही. असे बरेच आहेत.

पवार सध्या ८३ वर्षाचे आहेत. या वयात अवयवांवर नियंत्रण राहत नाही, पवारांचे मेंदू आणि तोंडावर नियंत्रण सुटले असेल असे समजायला वाव आहे. परंतु, त्यामुळेच पवारांच्या मनातले सत्य बाहेर आले. मुखाने कायम शाहु, फुले आणि आंबेडकरांचा घोषा करणारा हा नेता किती जातवादी आहे, ही बाब पुन्हा एकदा जनतेसमोर आली. पवारांच्या मनात ब्राह्मणांबाबत प्रचंड द्वेष आहे. हे देवेंद्र फडणवीसांच्या निमित्ताने वारंवार समोर आलेले आहे. ते फक्त ब्राह्मणांबाबत द्वेष बाळगत नाहीत, तर हिच भावना त्यांना इतर जातींबाबतही आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानातील सिंधी समाज करणार ‘राम लल्लाचा जयघोष’

कोट्यवधींच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आणि…

मोदी म्हणतात, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले, ही बाळासाहेबांना श्रद्धांजली

‘हिंदूंवर जिझिया कर’

मुंडे हे वंजारी समाजाचे. त्यांच्या समाजाला ते लहान समाजा समजतात. अर्थात हीन लेखतात ही बाबही स्पष्ट झालेली आहे. मी मोठा आणि माझी जात मोठी ही पवारांची मानसिकता आहे. अशा टुच्च्या मानसिकतेच्या नेत्या महाराष्ट्राने गेली काही वर्षे पुरोगामी नेता म्हणून डोक्यावर मिरवले. धनंजय मुंडेंना शरद पवारांनी मोठे केले ते लहान समाजाचा उदयोन्मुख तरुण आहे, म्हणून नाही. त्यांना गोपिनाथ मुंडे यांचे घर फोडायचे होते, त्यांचे खच्चीकरण करायचे होते. त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांना गाजर दाखवले आणि आपल्या बाजूला वळवले. शरद पवारांनी निव्वळ राजकारण केले होते. मुंडे यांचे घर फोडल्यानंतर पवारांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. आता मात्र त्यांना धनंजय मुंडे यांची जात आठवते आहे. धनंजय मुंडे यांच्यावर उपकार केल्याचा आव ते आणतायत. त्यावेळी पवारांच्या सोबत येणे ही जेवढी धनंजय मुंडे यांची गरज होती, तेवढीच ती पवारांची गरज होती. कोणी कोणावर उपकार करत नव्हते.

धनंजय मुंडे जेव्हा पवारांच्या सोबत होते, तेव्हा ते त्यांच्या पापावर पांघरूण घायलाया सुद्धा तयार होते. आज ते अजित पवारांच्या सोबत गेले तर पवारांना त्यांची जात आणि लायकी एकाच वेळी आठवली. ते लहान समाजाचे आहेत, हेही आठवले. पवारांनी जे मुंडे यांच्या घरात केले तेच आज त्यांच्या घरात होते आहे, त्यामुळे पवार बिथरले आहेत. जे काही घडते आहे, ते पवारांचे कर्म आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version