भाजपाला केंद्रातील सत्तेवरून हटवण्यासाठी देशातील अनेक राजकीय पक्षांनी देव पाण्यात घातले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर नको, या मुद्द्यावर सर्व पक्षांचे एकमत आहे. तरीही केंद्र सरकारच्या मजबुतीत तीळमात्र फरक पडताना दिसत नाही. हे शक्य होत नाही कारण भाजपाला विरोध करणारे पक्ष आतल्या आत एकमेकांशी हाणामारी करण्यात गुंतले आहेत. तेलंगणामध्ये ईडीच्या कारवाईमुळे त्रस्त असलेले दोन पक्षांचे नेते मोदींना बाजूला ठेवून एकमेकांकडे बोट दाखवतायत, हल्लाबोल करतायत. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविथा कलवाकुंथल यांनी काँग्रेस हीच भाजपा बी-टीम असल्याचा आरोप केला आहे.
मविआच्या नेत्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत केले होते. मविआ नेत्यांच्या आदरातिथ्यामुळे चंद्रशेखर राव प्रचंड भारावले. त्यांनी हे भारावलेपण बोलूनही दाखवले. परंतु वर्षभराच्या काळात हे पक्ष एकमेकांना भाजपाची बी टीम म्हणून हिणवायला लागले आहेत.
राव यांच्या कन्या कविथा कलवाकुंथला यांनी तर जाहीरपणे सांगितले आहे की, ‘भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपाने जाणीवपूर्वक नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी थंड्या बस्त्यात टाकली आहे’. याचा अर्थ स्पष्ट आहे. तुमच्या शत्रू एक असला, समस्यासारख्या असल्या तरी जोपर्यंत तुमचे स्वार्थ एक होत नाही तो पर्यंत तुम्ही एकत्र नांदू शकत नाही.
चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविथा कलवाकुंथला यांची दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात सज्जड पुरावे आहेत. जसे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या प्रदीर्घ काळ गजाआड आहेत, तीच परिस्थिती उद्या कविथा यांच्यावर येऊ शकते. या चौकशीमुळे बाप-बेटी अस्वस्थ आहेत. खरे तर अशा परिस्थितीत या दोघांनी भाजपावर प्रहार करायला हवेत. तसे प्रहार केलेही जात आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला कविथा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलेला आहे.
‘नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या चौकशीचे प्रकरण पुढे सरकताना का दिसत नाही? तपासावर न्यायालयाने कोणतीही बंदी आणलेली नसताना सोनिया आणि राहुल यांना ईडीच्या अधिकाऱ्यांकडून प्रश्न का विचारले जात नाहीत? या दोन्ही पक्षांमध्ये निश्चितपणे मांडवली झाली आहे. त्यामुळेच भाजपाने ज्याचा वारंवार ५ हजार कोटीचा नॅशनल हेराल्ड घोटाळा असा उल्लेख करतायत, त्या प्रकरणात गांधी परिवारासह या प्रकरणात सहभाग असलेल्या एकाही वरीष्ठ काँग्रेस नेत्याची चौकशी होत नाही, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएस हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत. स्वत: ईडीचे आरोपी असलेले राहुल गांधी तेलंगणामध्ये मात्र कविथा यांना दारु घोटाळाप्रकरणी ईडीच्या कारवाईवरून घेरण्याचा प्रय़त्न करतायत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरू आहे. बीआरएस ही भाजपाची बी टीम आहे, असा आरोप केला जातो आहे, प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे कविथा यांचे म्हणणे आहे.
कविथा यांच्या पक्षाच्या भूमिकेत केवळ एका वर्षाच्या काळात आमूलाग्र बदल झालेला आहे. वर्षभरापूर्वी कविथा यांचे पिताश्री चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आले होते. वर्षा निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही ते भेटले होते. या तिन्ही नेत्यांनी तेव्हा गळ्यात गळे घातले. सूरात सुर मिसळले होते.
तेव्हा राव यांचे रागरंग औरच होते. ‘देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आम्ही याचा निषेध करतो. केंद्राला याचे परिणाम भोगावे लागतील.’ असा इशारा राव यांनी दिला होता. ‘देशात अन्य काही लोक आहेत जे आमच्याप्रमाणे विचार करतात. काही दिवसातच हैदराबाद इथे पुन्हा चर्चा होईल. मग पुढचा रस्ता स्पष्ट होईल.’ असे ते म्हणाले होते. भावी वाटचाल एकत्र होईल याचे संकेत दिले होते. त्यानंतर युवराज आदित्य ठाकरे यांनीही हैदराबादचा दौरा करून राव यांच्या आदरातिथ्याचा लाभ घेतला होता. परंतु तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएस एकमेकांच्या उरावर बसल्यामुळे महाराष्ट्रातही नूर पालटला.
हे ही वाचा:
लष्कराचे सामर्थ्य वाढणार; ४५ हजार कोटींची स्वदेशी उपकरणे खरेदीला मंजुरी
बारामुल्लामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा
बीआरएसचा महाराष्ट्रात शिरकाव होऊ शकतो याची जाणीव झाल्यामुळे चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात चंचूप्रवेश करायला सुरूवात केली. राव यांचे भले मोठे कटआऊट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले. या हालचालींमुळे मविआचे धाबे दणाणले. शिउबाठाचे प्रवक्ते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अचानक बीआरएसला भाजपाची बी टीम म्हणू लागले.
बीआरएसच्या नेत्यांनीही याची दखल घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस हीच भाजपाची बी-टीम आहे, असा थेट आरोप तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी केला. मविआला सणसणीत उत्तर दिले. परंतु आता कविथा यांनी दिलेला दणका मोठा आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिउबाठाच्या मालकाचीच कॉलर धरली आहे. हा संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत. राव यांचा पक्ष त्याचे उट्टे महाराष्ट्रात काढण्याची शक्यता आहे.
एकीकडे तेलंगणात ही परिस्थिती असताना प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने इंडी आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांना लोकसभेची एकेक जागा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तेलंगणा असो वा प.बंगाल काँग्रेसचा प्रादेशिक पक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कोता आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षही जेव्हा संधी मिळते तेव्हा काँग्रेसला औकात दाखवत असतात. मोदींचा पराभव म्हणूनच त्यांच्यासाठी स्वप्नरंजन ठरते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)