चाय-बिस्कुटांनो आता तरी विश्वास ठेवाल?

चाय-बिस्कुट हुकूमशाहीच्या विरोधात, हिटलरच्या नावाने पोस्टी टाकून आपला कंड शमवत आहेत

चाय-बिस्कुटांनो आता तरी विश्वास ठेवाल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मवर अखेर गोऱ्या चमडीचा शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. भारतातील तथाकथित विचारवंतांसाठी हा शिक्का अत्यंत महत्वाचा असतो. युरेशिया ग्रुपचे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक अध्यक्ष इयान ब्रेमर यांनी भारतात पुन्हा मोदी सरकार येणार हे ठामपणे सांगितलेले आहे.

एनडीटीव्ही प्रॉफीट या चॅनेलला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत ब्रेमर यांनी ही माहिती उघड केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा आकडा २०१९ च्या तुलनेत दहाने कमी किंवा दहाने जास्त असू शकतो. परंतु मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार हे निश्चित असे ते म्हणाले. ब्रेमर हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक, तज्ज्ञ आहेत. त्यांची या विषयाला वाहिलेली ११ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातली अनेक बेस्ट सेलर आहेत. इस्त्रायल हमास युद्ध, रशिया-युक्रेन युद्ध, चीनचे अर्थकारण-राजकारण अशा अनेक विषयांबाबत त्यांची भाकीतं जगभरात गांभीर्याने ऐकली जातात.

ब्रेमर यांनी जे काही सांगितले आहे ते महत्वाचे अशासाठी की त्यांनी भारतातील चाय-बिस्कुट जमातीचा पर्दाफाश केला आहे. भारतात मतदानाचा पाचवा टप्पा पार पडला तरी काँग्रेसचे पाळीव आणि महाराष्ट्रातील चाय-बिस्कुट पत्रकारांची भाकीतं पाहा. भाजपा बॅकफूटवर, भाजपाच्या जागा कमी होणार, बहुमताचा आकडाही कठीण, अमुक तमुक टप्प्यानंतर हवेची दिशा पालटली… अशा प्रकारचे मथळे सजवले जात आहेत. तटस्थ पत्रकारितेच्या नावाखाली पालख्या उचलण्याचे काम सुरू आहे. भाजपासह देशातील अनेक राजकीय पक्षांना सत्तेचा मार्ग दाखवणारे प्रशांत किशोर गेले अनेक महिने मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार असे सांगत आहेत. त्याची ठोस कारणे देत आहेत. राजदीप सरदेसाई, करण थापर यांच्यासारखे पत्रकार वेगळीच धून वाजवताना दिसतात. शब्दांचे खेळ करताना दिसतात. त्यात माहिती आणि विश्लेषण कमी आणि अजेंडा रावबण्याचा भाग जास्त असतो.

हे ही वाचा:

आरोपी विशाल अग्रवाल म्हणतो, मुलाला गाडी देऊन चूक केली!

सीतारामन म्हणतात, एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर येणार!

‘युट्यूबर’ बनविण्याचे आश्वासन देऊन हिंदू मुलीला अडकवले जाळ्यात!

भारताने केलेल्या चाबहार बंदराच्या करारावर तालिबान खुश; पाकिस्तानला पाजणार पाणी

२०२४ च्या निवडणुकीत सत्तेची किल्ली मुस्लिमांच्या हाती नसून महिलांच्या हाती आहे. रोजगाराची समस्या सोडवण्यात मोदी सरकारला यश मिळाले नाही, तरी रेशनमुळे ते पुन्हा सत्तेवर येतील. काही राज्यात भाजपा फटका बसेल, ४०० पार… प्रत्यक्षात येणार नाही, परंतु ते जेमतेम सत्तेत येतील असे राजदीप सरदेसाई सांगतायत. सरदेसाई यांच्या सौभाग्यवतींना अलिकडेच तृणमूल काँग्रेसची खासदारकी मिळाल्यामुळे मोदी सत्तेवर येतील असे त्यांनी थेट सांगितले तर बायको अडचणीत, नाही सांगितले तर नोकरी अडचणीत असा सगळा प्रकार आहे. त्यामुळे यात समतोल साधताना त्यांना धाप लागत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातील चाय-बिस्कुट हुकूमशाहीच्या विरोधात, हिटलरच्या नावाने पोस्टी टाकून आपला कंड शमवताना दिसतायत. विचारी संयमी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निष्ठा व्यक्त करताना दिसतात. लोकशाहीचा विजय होईल, अशा आशा व्यक्त करताना दिसतात. विरोधात विचार व्यक्त केला म्हणून लोकांच्या घरात जाऊन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावून सत्कार करणारा उद्धव ठाकरेंसारखा आक्रस्ताळा नेता चाय-बिस्कुट मंडळींच्या दृष्टीने लोकशाहीवादी विचारांचे शिखर आहे. उच्च न्यायालयाचा आदेश नाकारणाऱ्या ममता बॅनर्जी लोकशाहीसाठी लढणाऱ्या लढवय्या आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाचे भीष्माचार्य शरद पवार हे आदर्श पुरोगामी राजकारणी आहेत. आता डोळ्यावर इतकी कातडी ओढल्यावर सत्य दिसावे तरी कसे?

याच प्रकारामुळे द वायर च्या एका मुलाखतीत करण थापर यांना प्रशांत किशोर यांनी यथेच्छ तुडवले. प्रशांत किशोर जेव्हा त्यांना मोदी तिसऱ्यांदा पुन्हा येणार असे सांगत होते तेव्हा थापर यांनी नाक खुपसले. तुमची हिमाचलबद्दलची २०२२ ची भविष्यवाणी चुकली, असे त्यांनी प्रशांत किशोर यांना सांगितले. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये जुंपली. मी असे म्हणालो नव्हतो, वर्तमान पत्राच्या कात्रणावरून मला प्रश्न विचारु नका, मी तसे म्हणाल्याचा व्हीडीयो दाखवा. मी संन्यास घेतो. मी मागे हटणारा नाही, तुमच्यासारख्या चौघांना भिडू शकतो, असे प्रशांत किशोर म्हणाले. करण थापर यांना व्हीडीयो दाखवता आला नाही, त्यामुळे त्यांना मुलाखत तशीच रेटावी लागली.

माझ्या विश्लेषणावर तुम्हाला विश्वास नाही, तर मला बोलावता कशाला, असा थेट सवाल करून प्रशांत किशोर यांनी थापर यांना त्यांची लायकी दाखवली. याचा अर्थ स्पष्ट आहे, साळसूद तटस्थ मुखवटा दाखवून आपला अजेंडा राबवणाऱ्या पत्रकारांची लायकी आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे, त्यामुळे कोणी यांचे ऐकून घेत नाही, बकवास विधाने केली तर थेट तुडवायला लागतात. इयान ब्रेमर यांच्यासारखे विदेशी तज्ज्ञ जेव्हा या विषयांवर व्यक्त होतात. आपले मत मांडतात तेव्हा त्या मागे ठोस माहिती असते. शिवाय त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्नही असतो. त्यामुळे बिनबुडाची विधाने करणे ते टाळतात.

चीन हा भारताचा शत्रू आहे. ग्लोबल टाईम्स हे चायनीज कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र आहे. मुखपत्र असल्यामुळे ते भारताच्या विरोधात बेताल विधाने करीत असते. परंतु त्यांनीही मान्य केले आहे की अब की बार मोदी सरकार. भारतात काँग्रेसचे पाळीव मात्र हे मान्य करायला तयार नाहीत. राजदीप यांच्यासारखे आडून आडून सुचवतात की मोदी सरकार येणार. परंतु भाजपाच्या जागा कमी होणार, जेमतेम बहुमत मिळेल, असे सांगायला विसरत नाहीत. करण थापर यांच्यासारखे पुराने चावल, मोदी सरकार येणार म्हणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात आणि स्वत:चे तोंड फोडून घेतात.

कोणी काहीही म्हणो, मोदींच्या विरोधात किंवा समर्थनार्थ वाद घालून सत्य काही बदलत नाही. ते मतपेटीत बंद होत चालले आहे. २५ मे आणि १ जून रोजी होणाऱ्या मतदानाच्या दोन टप्प्यांनंतर ते ४ जूनला सत्य लखलखत्या सूर्यासारखे समोर येणारच. परंत तेवढ्यातही चाय-बिस्कुट जमात तटस्थतेचा बुरखा पांघरत जमेल तेवढी चाकरी करून घेत आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version