25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयब्रँड मोदी मोदींची गॅरेंटी...

ब्रँड मोदी मोदींची गॅरेंटी…

Google News Follow

Related

देशातील एक मोठा वर्ग पाच राज्यात झालेल्या निवडणुकांकडे बारकाईने लक्ष ठेवून होता. या निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल निश्चितपणे नव्हत्या. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकांमधून जनतेचा कल लक्षात येणार असल्यामुळे त्यांना निश्चितपणे महत्त्व होते. निवडणुकीचे निकाल भाजपासाठी अपेक्षेपेक्षा उजवे लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर या विजयाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाची गॅरेंटी म्हटले आहे, लोकसभेतील हॅट्रीकची गॅरेंटी म्हटले आहे. निवडणुकीच्या निकालाने ब्रँड मोदीला नवी झळाळी मिळाली आहे.

जागतिक अर्थकारणाच्या क्रमवारीत २०१४ मध्ये १० व्या स्थानावर असलेल्या भारताने आज पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. २०१४ मध्ये भारताचा विकासदर ४.५ होता तो आज ७.५ आहे. इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध, रशिया-युक्रेन युद्ध, २०२० त २०२२ मध्ये आलेले कोरोनाचे संकट यामुळे जगात अनेक देशांची दाणादाण उडाली असताना भारत आज जगाला आशेचा किरण वाटतो आहे. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे. यशाच्या याच मनोऱ्यावर ब्रँड मोदी आज दिमाखाने उभा आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर या ब्रँडबाबत चर्चा करण्याचे खास कारण आहे.

देशात गेल्या नऊ वर्षांत जी आर्थिक धोरणे राबवण्यात आली. त्याची मधुर फळे आता कुठे दिसू लागली आहेत. जर २०२४ मध्ये भाजपाचे, मोदींचे पुनरागमन झाले नाही तर आर्थिक धोरणांचे पुन्हा पोतेरे होईल, अशी भीती अनेकांच्या मनात होती. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या राज्यात भाजपाचा झेंडा फडकल्यामुळे ही भीती आता समुळ नष्ट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत हॅट्रीक आणि ब्रँड मोदीच्या वापसीची दणदणीत गर्जना स्वत: मोदींनीच केली आहे.

भाजपाच्या यशात नरेंद्र मोदी ब्रँडचा वाटा मोठा आहे. हा ब्रँड एका दिवसात निर्माण झालेला नाही. सोशल मीडियावर रिल्स आणि व्हीडीयोचा मारा करून हा ब्रँड बनलेला नाही. राजकारणात एखादा मोठा ब्रँड निर्माण करणे सोपे नाही. चुरस मोठी आहे. हे ब्रँड एका दिवसात निर्माण होत नाहीत. कोणताही ब्रँड मोठा होतो तो त्याच्या वैशिष्ट्यामुळे. पॅकेजिंग, मार्केटींग शिवाय जर तुम्हाला ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यात अफाट खासियत असावी लागते. एखादा असा हटके गुण की ज्याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. कौतुक असते. मोदींचा ब्रँड असाच निर्माण झाला. कुटुंबाचा गोतावळा नसलेला देशाचा पहीला पंतप्रधान. माता आणि मातृभूमीबाबत अपरंपार श्रद्धा असलेला नेता. मालमत्तेचा संचय न करणारा, पूर्णपणे पारदर्शक कारभार करणारा, दिवसातील १८ तास काम करणारा, गेल्या २१ वर्षात एकही दिवस सुटी न घेणारा नेता लोकांसाठी नवा होता.

परदेश दौऱ्यात हा नेता विमानातच विश्रांती घेतो. विदेशातील भूमीवर एकेक मिनिट बैठका, चर्चा, जनसंपर्कासाठी कारणी लावतो. नवरात्रीच्या काळात कडकडीत उपवास करतो, फक्त पाण्यावर राहातो. असा माणूस लोकांना सुपर ह्युमन वाटला तर त्यात नवल ते काय?

या सगळ्या वैशिष्ट्यांसोबत देश आणि देशवासियांसाठी तळमळ आहे. ही तळमळ यथार्थ शब्दात लोकांच्या समोर ठेवण्याची क्षमता आहे. मोदींच्या क्षमतेला, चौकटीबाहेरच्या त्यांच्या कार्य पद्धतीला पुढे अचूक टॅग लाईन, सोशल मीडिया मार्केटींगची जोड मिळाली. परंतु तुमचे उत्पादन जर टुकार असेल तर मार्केटींगचा उपयोग होत नाही. राहुल गांधींचे मोठे उदाहरण आहे.

मोदींकडे असलेली शब्द संपदा त्यांचा ब्रँड लार्जर दॅन लाइफ करण्यासाठी हात भार लावते. पाच राज्यात विजयी झाल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांसमोर मोदींनी जे भाषण केले त्यातली एकेक ओळ ऐका. जनतेशी ते थेट संवाद साधतात, जनतेला उद्देशून म्हणतात. तुमची स्वप्न हेच माझे संकल्प आहेत. तीच साधना, तीच तपस्या. सब का साथ सबका विकास, विकसित भारताची संकल्पनेचा हा विजय आहे. इमानदारी, पारदर्शिता, सुशासनाचा विजय आहे. प्रत्येक गोष्टीचा भारताच्या भल्यासाठी वापर हे ब्रँडचे वैशिष्ट्य. जनतेचे आभार मानताना. दुसऱ्या बाजूला ते जागतिक समुहालाही हाक देतात. हा विजय भारताच्या विकासाच्या विश्वासाला मजबूती देणारा आहे, जगभरातील गुंतणुकदारांना विश्वास देणारा, विकसित भारताच्या संकल्पाला जनतेचा विश्वास आहे हे स्पष्ट करणारा हा विजय आहे. या ब्रॅंडबद्दल लोकांच्या मनात विश्वास आहे. विरोधकांच्या उरात धडकी भरवणारा हा ब्रँड आहे. विरोधकांची बलस्थाने आणि मर्म जाणारा नेता म्हणजे मोदी. जनतेला स्वार्थ आणि राष्ट्रहीतातील फरक कळतो. जिंकण्यासाठी दिलेल्या भूलथापांवर जनतेने विश्वास ठेवलेला नाही. भ्रष्टाचार, तुष्टीकरण, परीवारवादाबाबत जनतेचा झिरो टॉलरन्स या निकालातून स्पष्ट झालेला आहे. कॅमेरा आणि बूमसमोर शिव्या घालणे, निराशा आणि नकारात्मकता पसरवणे यामुळे प्रसिद्धी मिळू शकते जनतेचे मत नाही. विकासाच्या मार्गात आडवे येणाऱ्यांना हा धडा आहे. सुधरा नाही तर जनता साफ करेल, हा इशारा आहे. मोदींचे हे तीर फक्त राहुल गांधी यांच्यासाठी नाहीत, ते शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंसाठीही आहेत.

भव्य दिव्य विजयानंतर अनेकांना बेहोशी येते, लोक बेसावध होतात. परंतु, सावधानता हे ब्रँड मोदींचे वैशिष्ट्य पुढे काय घडू शकेल याचा अचूक अंदाज त्यांना आहे. ते कार्यकर्त्यांना सावध करतात. विरोधकांनाही इशारा देतात. कृपा करून असे राजकारण करू नका, ज्यामुळे देशविरोध्यांना बळ मिळेल. देश तोडणाऱ्यांना, देश कमजोर करणाऱ्यांना बळ मिळेल, असे आवाहन ते विरोधकांनाही करतात.

हे ही वाचा:

भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विक्रम रचला!

तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू!

२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!

या विजयामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी नकारात्मक शक्ती एकत्र येण्याचा प्रयत्न करतील. देशाला तोडण्याचा प्रयत्न करणारे आणि ताकद लावतील, समाजात तेढ निर्माण करणारे संधीची वाट पाहतील, हे त्यांना अचूक ठाऊक आहे. शेतकरी आंदोलन, शाहीनबाग, पुरस्कार वापसी, दिल्ली दंगल यापैकी ते काहीही विसरलेले नाहीत. सावधपणा म्हणजे विजयाची निम्मी गॅरण्टी. मोदी सावध आहेत. ते कार्यकर्त्यांनाही सावध करतात. फेक नरेटीव्हला चोख उत्तर द्यायला प्रेरीत करतात.

देशात १० कोटी लोकांनी डीमॅट खाती उघडलेली आहे. भाजपाच्या कालच्या विजयामुळे शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली आहे. निफ्टी ३०० पेक्षा अधिक अंकाने तर शेअर निर्देशांक हजारावर अंकाने उसळला. निवडणुकीतील विजयामुळे ब्रँड मोदीला आलेली झळाळी. हाच ब्रँड लोकसभेत हॅट्रीक करणार हा विश्वास शेअर बाजारात प्रतिबिंबीत झाला आहे. देशातील गोरगरीबांनी मतपेटीतून आणि सधन वर्गाने शेअर बाजारातील तेजीतून ब्रँड मोदीला सलामी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा