23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरसंपादकीयभाजपाचे मिशन मुसलमान २०२४...

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४…

मुस्लीम समाजातील उदारमतवाद्यांशी संवाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे.

Google News Follow

Related

एकगठ्ठा मुस्लीम मतं हा काँग्रेसच्या सत्तेच्या राजकारणातील हुकमी एक्का. याच बळावर काँग्रेसने अनेकदा देशाची सत्ता काबीज केली. वेळप्रसंगी हिंदू मतदारांकडे दुर्लक्ष करून त्यांना दुय्यम महत्व देऊन काँग्रेसने हे मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण रेटले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतंही मिळू नयेत, अशी खेळी खेळून भाजपा विरोधकांच्या हाती कटोरा देण्याच्या तयारीत आहे.

मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मतं न मिळवता राज्यात आणि देशात सत्तेवर येणे शक्य आहे, हे भाजपाने सिद्ध केले आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकामध्ये भाजपाने मुस्लीम मतपेढीचे दुकान बंद केले. हिंदु मतपेढी निर्माण केली. २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांना मिळणारी मुस्लीम मतंही आपल्या पारड्यात फिरवण्यासाठी भाजपाचे चाणक्य सोंगट्या टाकतायत.

उत्तर प्रदेशमध्ये मात्र योगींसारखा कडवट हिंदुत्ववादी चेहरा असूनही २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने ४१.२८ टक्के मत मिळवत ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आले. भाजपाला मिळालेल्या मतांपैकी १२ टक्के मतं मुस्लिमांची असावीत असा भाजपाच्या मुस्लिम थिंक टँकचा अंदाज आहे. ट्रीपल तलाक बंदी सारख्या कायद्यांमुळे मुस्लिम महीला भाजपासोबत जोडल्या जात आहेत.

तुष्टीकरणाचे राजकारण न करता भाजपाने हे यश मिळवले. या योगी पॅटर्नची अवघ्या देशात पुनरावृत्ती घडवण्याची भाजपाची योजना आहे. देशातील ६० लोकसभा जागांवर मुस्लीम मतदारांचा प्रभाव आहे. या मतदार संघात पाच हजार मुस्लीम सदस्य बनवण्याचे लक्ष भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाने ठेवले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान किंवा छत्तीसगढ येथे अल्पसंख्यांक मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी जाहीर केली आहे.

अलिकडेच हैदराबादेत भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली. “एखादा समाज घटक भाजपाला मत देतोय की नाही, याचा विचार न करता, भाजपाच्या कार्यकर्त्याने देशातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकारिणीत केले होते.

हे ही वाचा:

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

राष्ट्रीय बालिका दिन; मुलींच्या कर्तृत्वाला समर्पित दिवस

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता शिखरावर आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ मध्ये देशात गगनचुंबी राममंदीर उभे राहील अशी घोषणा केली आहे. काशी कॉरीडोअर, उजैन कॉरीडोअर उभे करून भाजपाने हिंदू मतदारांसोबत ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे.

याच यशाकडे बोट दाखवत मुस्लिम समाजाला पेटवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार ही बाब उघड आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका फार दूर नाहीत. या निवडणुकांमध्ये विरोधकांकडून पुन्हा अल्पसंख्यांक कार्ड खेळले जाण्याची शक्यता आहे. भाजपा विरोधक सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी मुस्लीम मतपेढी भक्कम करण्यावर जोर देताना दिसतायत. भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संघ-भाजपाच्या हिंदुत्वाला लक्ष्य बनवत अल्पसंख्यकांना चुचकारण्याचा वारंवार प्रयत्न केला.

“गेल्या ९ वर्षात भाजपाने देश तोडण्याचा प्रयत्न केला”, असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप ताजा आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाजपाचे हिंदुत्व हे थोतांड असल्याचा दावा करत मुस्लिमांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीची सत्ता हाती आल्यापासून उर्दू कॅलेंडर, टीपू जयंती, अजान स्पर्धा, उर्दू भवन असे उपक्रम ठाकरेंच्या शिवसेनेने राबवायला सुरूवात केली. हिंदुत्व खुंटीला टांगून मुस्लीम मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.   प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्ष हेच राजकारण करतायत. भाजपासाठी काँग्रेस पेक्षा मोठे आव्हान प्रादेशिक पक्षांचे आहे. विरोधकांच्या या खेळीला शह देण्यासाठी येत्या निवडणुकीत मुस्लीम समाजातील उदारमतवाद्यांचा गट आपल्यासोबत मजबुतीने उभा राहील यासाठी भाजपाच्या गोटातून प्रयत्न केले जात आहेत. हे प्रय़त्न अचानक सुरू झालेले नाहीत.

ऑगस्ट २०२२ मध्ये रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी दिल्लीच्या अब्दुल नबी मशीदीत काही मुस्लीम विचारवंतांशी चर्चा केली. यामुळे मुस्लीम नेतृत्वाचा पोटशूळ उठला. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या भेटीवर कडाडून टीका केली होती. त्यामुळे संघाचा तीर अगदी निशाण्यावर लागला असे म्हणायला वाव आहे. २०१९ मध्ये काही मुस्लीम विचारवंतांनी संघ कार्यालयात सरसंघचालकांची भेट घेतली होती. मुस्लीम समाजातील उदारमतवाद्यांशी संवाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे.

भाजपाने पक्ष प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध केलेली कारवाई अनेक भाजपा समर्थकांना खटकली. कर्नाटक मध्ये प्रेषित महमदाबाबत विधान केल्याबद्दल राजासिंह या कडवट हिंदुत्ववादी आमदाराला पक्षातून काढून टाकण्यात आले. शाहरुख खानचा सिनेमा पठाण प्रदर्शित होत असताना सिनेमाच्या विरोधात विधाने बंद करण्यासाठी मोदींनी पक्षनेत्यांना दिलेली तंबी, त्याच पठडीतील आहे. या घटनांकडे डोळसपणे पाहिले तर मुस्लीम समाज दुखावला जाणार नाही याची काळजी भाजपा नेतृत्व घेताना दिसते आहे.

मुस्लिमांच्या एकूण लोकसंख्येत ८० टक्क्यांपेक्षा जास्त टक्का मागासांचा आहे. याला पसमांदा मुस्लीम म्हणून ओळखले जाते. या समाजाला जवळ करण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. पंतप्रधान पदाची सूत्र हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सब का साथ, सब का विकास ही घोषणा दिली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात गोरगरीबांसाठी जे काही विकास उपक्रम राबवले त्याचा फायदा निश्चितपणे मुस्लीमांनाही झाला. पाकिस्तानात पीठासाठी सुरू असलेली हाणामारी आपल्या देशातील मुस्लीम समाजही निश्चितपणे पाहात असणार. भाजपाला त्याचा निश्चितपणे याचा लाभ मिळणार आहे. अशात आता भाजपाने मुस्लीम मतदारांशी संवाद सुरू केला आहे. एकूणच २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांच्या हाती भिकेचा कटोरा देण्याची ही योजना आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा