जनतेची स्मरणशक्ती खूपच कमजोर असते असे म्हणतात. काही भाजपा नेत्यांचे तर कार्यकर्त्यांच्या स्मरण शक्तीबाबतही तसेच मत दिसते. फार दूर नाही, काल परवाच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सूड ssss सूड, अशी गर्जना केली. भाजपाबद्दल, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल असलेली जळजळ मळमळ ठाकरेंनी कधी लपवून ठेवलेली नाही. तरीही भाजपामध्ये नगण्य संख्येने असलेला एक गट त्यांच्याशी युती करण्यासाठी डोळे लावून बसलेला असतो. एका खूप मोठ्या नेत्याला तर उबाठा शिवसेनेच्या नावाने कायम उचक्या लागलेल्या असतात. भाजपा हा कमाल पक्ष आहे. जनता पार्टीत विसर्जित केलेला हा पक्ष जनता पार्टी बुडीत गेल्यानंतर नव्या ताकदीने उभा राहिला. भाजपाच्या रुपाने या पक्षाने कात टाकली. १९८४ मध्ये फक्त २ जागा मिळाल्या असताना पक्षाच्या नेत्यांनी उमेद हरली नाही. आधी १९९८ ते २००४ केंद्रातील सत्तेपर्यंत मुसंडी मारली. २०१४ मध्ये स्वबळावर केंद्रातील सत्ता काबीज केली. आजतागायत भाजपाला सत्तेवरून
कोणी हरवू शकलेला नाही.
असा लखलखीत इतिहास असताना सत्तेसाठी हिंदुत्व विकणाऱ्या ठाकरेंच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी काही जण प्रचंड उतावीळ झालेले दिसतात. महाराष्ट्र भाजपामध्ये एक खूप मोठे नेते आहेत. चाणक्याची कूटनीती ज्याच्या समोर क्षुद्र वाटेल असे भारी राजकारण आपण करू शकतो, असे त्यांना सतत वाटत असते. समस्या अशी आहे की, असे फक्त त्यांनाच वाटते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना लाज येईल अशी विधाने हे महाशय वारंवार करत असतात. ठाकरेंच्या पक्षाशी युती होईल तो सुवर्णक्षण असे त्यांचे ताजे उद्गार आहेत. एका विवाह सोहळ्यात हे घडले. टीव्ही ९, या वृत्तवाहिनीने याबाबत तपशीलात वृत्त दिलेले आहे.
एका विवाहसोहळ्यात हे महाशय आणि उबाठाचे पक्षप्रमुख ठाकरे, अनेक वर्ष त्यांचे स्वीय सचिव राहिलेले, अलिकडेच आमदार झालेले मिलिंद नार्वेकर यांची भेट झाली. युती होणार काय? असे त्यांनी मिश्किलपणे विचारले. चाणक्य महाशय तुरंत उत्तरले तो सुवर्णक्षण असेल. ही अपवादात्मक घटना नाही. या बातमीवर संशय घ्यावा, असा या महाशयांचा इतिहास नाही. उलट या बातमीवर चटकन विश्वास बसेल असा त्यांचा लौकीक आहे. यापूर्वी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव होणार, असे निकालाआधीच गृहीत धरून हेच महाशय उबाठाचे उमेदवार अनिल परब यांचे तोंड गोड करून मोकळे झाले होते. यांना पक्षाच्या उमेदवाराचा पराभवही सेलिब्रेट करता येतो इतकी स्थितप्रज्ञता यांच्यात ठासून भरलेली आहे.
मविआच्या अडीच वर्षांच्या राजवटीत पत्रकारांवर वरवंटा फिरला, सोशल मीडियात पोस्ट केल्याबद्दल अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. सत्तेची मस्ती इतकी होती की महिलाही त्यातून सुटल्या नाहीत. माजी सैनिकांना भुरट्या गुंडांनी मारहाण करावी आणि मातोश्रीमध्ये ठाकरेंनी त्यांचे कौतुक करावे, असे दिवस होते. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना या काळात मारहाण झाली. अनंत करमुसे या युवा अभियंत्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. सत्तेची उब मिळालेले अनेक नेते हे विसरले आहेत. परंतु ज्यांनी ठाकरेंच्या सत्तेचे चटके भोगले, त्यांचे काय? भाजपाची सत्ता आल्यानंतर ज्यांनी वरवंटा चालवला, त्यांना कायद्याच्या चौकटीत कारवाई होईल असे वाटत होते. आजही अनेकांनी अपेक्षा सोडलेली नाही. परंतु काही जण ठाकरेंशी युतीच्या बाता करून त्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतायत.
हे ही वाचा:
जय भवानी, जय शिवाजी बोलून मते मिळविण्याचे दिवस गेले आता!
अक्षय कुमारकडून पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर, म्हणाला-‘सल्ला आवडला’
ट्रम्प यांनी अमेरिकेची परकीय मदत थांबवली
काँग्रेस-आप आघाडीला चकवा देत चंदीगढमध्ये बनला भाजपाचा महापौर
ठाकरेंना जवळ घेणे नाईलाज आहे, अशीही परिस्थिती नाही. ठाकरेंनी भाजपाला शिव्या घालणे बंद केले आहे, ठाकरेंनी हिरव्या राजकारणाला मूठमाती दिलेली आहे, ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धऱण्याची शपथ घेतलेली आहे, असेही नाही. त्यामुळे ठाकरेंना मिठ्या मारण्यासाठी उतावीळ होण्यासारखे कारणही दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. लग्न सोहळ्यात युतीची बोलणी हा भाबडा विचार आहे, असे म्हणत त्यांनी प्रश्नकर्त्या
पत्रकारांनाही फटकारले आणि त्या नेत्याच्या चाणक्यगिरीवर व्यवस्थितही पाणी ओतले. दुसऱ्या पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध ठेवायला, त्यांच्याशी गप्पा, विनोद करायला कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. परंतु त्या गप्पा आणि विनोद करताना आपल्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची लाज जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. ही काळजी घेतली नाही, तर दुसऱ्या पक्षाचे लोकही योग्यवेळी जागा दाखवून देतात. काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी यांचा उल्लेख शक्तिमान नेता असा
केला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात याच नेत्याची व्यवस्थित हजामत केली.
भाजपाकडे आज १३७ चा भक्कम आकडा आहे. परंतु हा आकडा येण्यासाठी अशा स्वयंघोषित चाणक्यांचे योगदान काय? राज्यात सरकार येण्यासाठी संघाला मैदानात उतरावे लागले. देवेंद्र फडणवीस यांच्या मेहनतीचे, कर्तृत्वाचे, कार्यक्षमतेचे,
निर्णय क्षमतेचे कौतूक करावे तेवढे कमी, परंतु त्यांच्या जवळपास जातील एवढ्या क्षमतेचे किती नेते भाजपामध्ये आहेत? नको तिथे नको ते बोलणाऱ्या अशा चमको नेत्यांना भाजपाने सक्तीने गप्प बसवायला हवे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)