भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!

ज्या भाऊ तोरसेकरांची किंमत मोदींना कळते ती किंमत शालीनी बाईंना कळत नाही.

भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना भाजपाच्या पदाधिकारी श्वेता शालिनी यांनी नोटीस बजावली आहे. नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है… असे म्हणतात, ही नोटीस त्याचे उत्तम उदाहरण आहे. राजकारणातील बारकावे अत्यंत परखड आणि प्रभावीपणे मांडून महाराष्ट्रातील लिब्रांडू गँगला उघडे पाडण्याचे काम भाऊ गेली अनेक वर्षे करतायत. ही ती कामगिरी आहे जी, भाजपाच्या नटमोगऱ्यांना जमली झेपली नाही, जे आय़टी सेलला पेलवले नाही. विरोधकांना ठोकणे, त्यांचे नरेटीव्ह रोखणे ज्यांना जमले नाही ते भाऊंचा नाद कुठे करतायत. ते दुकान उघडून थोडेच बसले आहेत?

गेले सुमारे दशकभर भाऊ तोरसेकर नरेंद्र मोदी या माणसासाठी किल्ला लढवतायत. त्याचे एकमेव कारण म्हणजे कोट्यवधी लोकांप्रमाणे त्यांचीही ठाम भावना आहे की मोदींची देशाला गरज आहे. पण भाऊ ना भाजपाचे पदाधिकारी आहेत, ना प्रवक्ते. पत्रकार म्हणून जिथे चुकले तिथे बोलण्याची आणि ज्याचे चुकले त्याला तुडवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तो त्यांनी वापरला, आपली सडेतोड मते मांडली, म्हणून त्यांना श्वेता शालिनी यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. ही भाजपाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार आहे.

सध्या भाजपामध्ये आयटी, सोशल मीडिया हे परवलीचे शब्द आहेत. त्यामुळे या क्षेत्रात दुकानदारी करणाऱ्यांची इथे गर्दी झालेली आहे. वर्षानुवर्षे भाजपासाठी चपला घासणारे पदाधिकारी कार्यकर्ते अडगळीत पडलेले असताना काल परवा पक्षात आलेल्या या दुकानदारांना पक्षात बरे दिवस आलेले आहेत. भाजपामध्ये गेली काही वर्षे ही गँग तेजीत आहे. ही मंडळी दिल्ली, गुडगावमधल्या कंपन्यांशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात धंदा चालवतात. यातल्या बऱ्याच जणांनी स्वत:च्या कंपन्या थाटल्या आहेत. कोणतीही यंत्रणा आणि पात्रता नसताना सर्व्हे, सोशल मीडियाची कामे मिळवायची आणि दुसऱ्या कंपन्यांना सब कॉण्ट्रॅक देऊन करून घ्यायची, असे प्रकार सर्रास चालले आहेत.

पक्षाला पैशाची कमी नाही. तो पैसा पक्षाच्या भल्यासाठी न वापरता, दुकानदारांची भर करण्याचे प्रकार सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष पदी बसलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे नेते त्यांना पदांची खिरापत वाटतात. महाराष्ट्र भाजपा म्हणजे अशा लोकांसाठी पद हमी योजना झालेली आहे. बानवकुळे यांनी पक्षात ५० वर प्रवक्त्यांची नियुक्ती करून प्रत्येकाला पद, प्रत्येकाला कार्ड अशी योजना राबवलेली आहे. इतके प्रवक्ते असताना पक्षाचे नेते बोंबाबोंब करतात की विरोध खोटा नरेटीव्ह सेट करतात, लोकांना भडकवतात. ही बोंब म्हणजे बावनकुळे यांनी पोसलेल्या या टीमची लायकी दाखवणारी आहे. या टीममध्ये मूठभरच असे लोक आहे ज्यांना पक्षाची विचारधारा माहिती आहे, विचारधारेसाठी काम कऱण्याची इच्छा आहे. बाकी लोक कार्ड छापून दुकानदारी करण्याच्या मागे आहेत. पक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल आपल्याला एखादे कंत्राट मिळते आहे का याचा शोध ही मंडळी सतत घेत असतात. विरोधकांच्या नरेटीव्हला उत्तर देण्याचे काम भाऊं सारखे लोक करतात.

आम्ही भाजपाचा ठेका घेतलेला नाही, आमची बांधिलकी संघाच्या विचारांशी. त्यामुळे तुमची दुकानदारी तुम्हाला लखलाभ या भावनेने भाऊ, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, अनय जोगळेकर, आबा माळकर यांच्यासारखी मंडळी करतायत. हे सगळे संघाचे स्वयंसेवक. विचारधारेसाठी लढण्याचे काम भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे ते काम बिनपगारी आणि फुल अधिकारी असलेले हे लोक करतात. भाजपाचे नेते मात्र विरोधकांनी पेरलेल्या खोट्या नरेटीव्हला हवा देणाऱ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांना कुरवाळण्याचे काम न चुकता करत असतात.

दुकानदारी करणाऱ्यांमुळे पक्षाची लोकसभा निवडणुकांमध्ये वाताहात झाली, ही भावना भाऊ व्यक्त करतात त्या मागे हळहळ असते, चिंता असते. याच दुकानदारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन तीन सर्व्हे केले. त्याचे अहवाल किती खोटे आणि तकालादू होते हे निकालावरून उघड झालेलेच आहे. हे सर्व्हे म्हणजे नावडत्या उमेदवाराला तिकीट नाकारण्याची सोय बनलेली आहे. गेल्या काही वर्षात भाजपामध्ये वॉर रुम नावाची एक टूम निघालेली आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केले जातात. तेही एक मोठे दुकान झाले आहे.

श्वेता शालिनी यांनी जे काही केले त्यात त्यांची चूक फारच कमी आहे. ज्यांना महाराष्ट्र माहीत नाही, ज्यांना महाराष्ट्राचे राजकारण माहीत नाही, ज्यांना मराठी माणसाची मानसिकता कळत नाही, अशा लोकांना पद देणारे, त्यांना मोठे करणारे लोक यात जास्त दोषी आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला होता. परंतु या कडेलोटाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती त्या बावनकुळे यांनी राजीनाम्यातला र काढला नाही. संघटनेचे काम करताना हार जीत होत असते. अनेकदा पक्षाचे कार्यकर्ते जीवाची बाजी लावतात, परंतु पराभव वाट्याला येतो. परंतु महाराष्ट्राचा पराभव त्यात मोडत नाही. खोट्या नरेटीव्हमुळे भाजपाचा पराभव झाला असे सावरासावर भाजपाचे नेते करीत आहेत. याचा अर्थ पराभव ज्यांच्यावर या नरेटीव्हशी लढण्याची जबाबदारी होती त्यांच्या नाकर्तेपणामुळे झालेला आहे. त्यामुळे अशा नाकर्त्यांना ज्यांनी पदे वाटली, पक्षासाठी लढणाऱ्या सच्चा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बाजूला सारले त्यांच्यावर या पराभवाची जबाबदारी आहे.

हे ही वाचा:

भाजपा आमदार मंगेश चव्हाणना धमकी देणाऱ्या जोर्वेकरांविरोधात आंदोलन!

नीट परीक्षा घोटाळा लातूर कनेक्शन, चौघांना अटक!

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये निर्माण होणार ‘संविधान मंदिर’

धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्सची विक्री?

मोदींच्या नावावर दगड-धोंडे जिंकून येतात. त्यामुळे काहीही केले तर पचून जाते. काही केले तरी खपून जाते, या भावनेतून ज्यांनी दुकानदारी केली, त्या दुकानदारीकडे ज्यांनी दुर्लक्ष केले, जबाबदारी त्यांची आहे. पक्षावर होणाऱ्या वैचारिक आघातांना उत्तर देणे तर दूर भाजपा नेत्यांची विरोधक जी खिल्ली उडवतात, त्याचे उत्तर देण्याची क्षमताही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी गमावलेली दिसते. प्रणीती शिंदे सोलापूरमधून विजयी झालेल्या प्रणीती शिंदे मंत्री महोदय चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा करतात. त्यालाही उत्तर द्यायला पक्षातून एक माणूस पुढे येत नाही. प्रत्येकाला आपले संबंध जपायचे आहेत, प्रत्येकाला आपले दुकान चालवायचे आहे.

भाऊंना नोटीस पाठवून आपल्याला राजकारणातील ए,बी,सीही कळत नाही, हे श्वेता शालिनी यांनी सिद्ध केलेले आहे. पत्रकारितेतील ज्या भीष्माचार्याला पंतप्रधान कार्यालयातून रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले. ज्याची किंमत मोदींना कळते त्यांची किंमत शालीनी बाईंना कळत नाही. भाजपाच्या संबंधित नेत्यांना थोडी तरी लाज असेल तर बाईंना नारळ देऊन घरी बसवा. अर्थात दुकानदारीच्या कैफात असलेले असे काही करतील याची शक्यता कमीच.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version