अजित पवार निर्मित ‘बिनपैशाचा तमाशा’ सिझन-२

अजित पवार निर्मित ‘बिनपैशाचा तमाशा’ सिझन-२

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये केलेल्या बिन पैशाच्या तमाशाचा प्रयोग त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा जनतेसमोर आणला आहे. अजित पवार हे गौप्यस्फोट असे तुकड्याने का करतायत, असा प्रश्न अनेकांना पडलाय. ओटीटीवर अलिकडे एखादे कथानक सिझन वन, सिझन २, अशा प्रकारे आणण्याचा ट्रेण्ड आहे. अजित पवार सुद्धा थोरल्या पवारांचे कारनामे असे एकेका सिझनमधून उघड करतायत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांनी घडवलेले राजीनामा नाट्य उपयोगी पडले नाही. पक्ष गमावला आता बारामतीचा बालेकिल्लाही जाणार अशी शक्यता आहे. अजित पवारांनी हे देखील आज छाती ठोकून सांगितले आहे.

पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ५ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणापासून शरद पवारांच्या वस्त्रहरणाचा कार्यक्रम सुरू झाला. कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत अजित पवारांनी शरद पवार राजीनामा नाट्यातील आणखी काही भाग उघड केला. शरद पवारांचे बिन भरवशाचे राजकारण लोकांच्या समोर पुन्हा एकदा उघड केले.

‘आम्हाला गाफील ठेवण्याची खेळी शरद पवार खेळत आले आहेत. मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो आहे, तुम्ही पुढे सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा’ असे आम्हाला सांगितले. राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना बोलावून ‘मी राजीनामा मागे घ्यावा, म्हणून तुम्ही आंदोलन करा’, असे सांगितले.

‘महायुती सरकारमध्ये मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पुन्हा आम्हाला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेटायला बोलावले. आधी मंत्र्यांना नंतर सर्व आमदारांना. त्यांचे लोक आम्हाला सांगत होते, गाडी पटरी पे आ रही है, परंतु पुढे काहीच झाले नाही. काही तरी एक भूमिका घ्यायची आणि मोकळे व्हायचे असा प्रकार शरद पवारांनी केला नाही.’ या शब्दात अजित पवारांनी पवारांची करणी लोकांसमोर मांडली.

राजकारणात पाच दशके काढलेल्या नेत्याची अशी शोभा होणे, हे किती वाईट. परंतु जे काही होते आहे, त्याला शरद पवार हेच कारणीभूत आहेत. पक्षात वरचष्मा कायम ठेवण्यासाठी शरद पवारांनी केलेल्या खेळी तर फसल्याच, परंतु अजित पवार आणि पक्षातील अनेक वरीष्ठ नेत्यांच्या मनात अढी निर्माण करण्याचे काम शरद पवारांनी केले. हे पुन्हा पुन्हा उघड होते आहे.

एखाद्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकाऱ्याला एन्काऊंटरची चटक लागावी, तशी पवारांना राजकीय खेळ्या करण्याची इतकी चटक लागली की त्यांनी पक्षातील सहकाऱ्यांना आणि आपल्या पुतण्यालाही सोडले नाही. त्याचे परिणाम आज ते भोगतायत.

राजकीय फायद्यासाठी एका जातीच्या लोकांना दुसऱ्या जातीशी झुंजवण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु नकसान झाले तरी चालेल, वेळ प्रसंगी झळ सोसून मी हे घडू देणार नाही, असेही अजितदादा म्हणाले. हा टोला नेमका कोणाच्या दिशेने आहे, हे स्पष्ट झाले नसले तरी महाराष्ट्रात एका जातीच्या लोकांना दुसऱ्या जाती विरुद्ध झुंजवणारा नेता कोण, हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.

अनिल देशमुख यांच्यासारखे नेते जे आज शरद पवारांच्या सोबत आहेत, ते का आहेत, याचा खुलासाही अजित पवारांनी केला. अनिल देशमुख सोबत यायला तयार होते. त्यांना मंत्रिपद हवे होते, ते मिळाले नाही, म्हणून त्यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांच्यासोबत जे नेते आहेत, ते केवळ नाईलाजामुळे आहेत, तेही त्यांच्यासारखे स्वत: पुरते पाहाणारे राजकारण करीत आहेत, निष्ठेच्या केवळ बाता आहेत, हे पुरेसे स्पष्ट करणारा हा किस्सा आहे.

हे ही वाचा:

९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!

दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग

समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही

लोकसभेच्या ज्या जागा ताकदीने लढवणार असे अजित पवार म्हणाले आहेत, त्यात सातारा, शिरूर, रायगडसह त्यांनी बारामतीचे नाव घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बारामतीमध्ये पुन्हा एकदा सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या तर? असा सवाल जेव्हा पत्रकारांनी केला तेव्हा, ही जागा मी लढवणार, तिथे समोर कोणाला उभे राहायचे आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. अजित पवार जे काही बोलले त्याचा अर्थ काढला तर गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले अशी शरद पवारांची परिस्थिती झाली आहे.

महाराष्ट्रातील उणेपुरे साडेतीन जिल्हे हे शरद पवारांचे प्रभाव क्षेत्र. बारामती हे त्याचे केंद्रस्थान. अलिकडे झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाला बारामतीत भरीव यश मिळाले. तेव्हा बारामतीत सुप्रिया सुळे यांचे काही खरे नाही, हे चित्र स्पष्ट झाले होते. परंतु अजित पवार यांनी ज्या छातीठोकपणे बारामती लढवणार असे सांगितले आहे, त्यावरून आता फक्त दोनच शक्यता उरलेल्या आहेत, बारामतीची गढी २०२४ मध्ये ढासळणार किंवा शरद पवार हे अजित पवारांसोबत येणार. थोरल्या पवारांच्या पुरोगामी भूमिकेचा कस पाहण्याचा, त्यांच्या राजकारणाचा वचपा काढण्याचा चंग, अजित पवारांनी बांधलाय, असे चित्र तूर्तास तरी दिसते आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version