मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची नौका भरकटायला लागली आहे, की आधी ठरलेल्या दिशेला जातेय हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या काही दिवसांत जरांगे यांनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे, त्यावरून या उपोषण नाट्यामागे बारामतीकरांच्या करामती आहेत काय असा सवाल आता लोकांना पडतोय.
मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण? राज्याच्या स्थापनेपासून अपवाद वगळता महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री झाले. तरीही राज्यात मोठ्या संख्येने मराठा समाज उपेक्षित राहीला. राज्याचे अर्थतंत्र मराठ्यांच्या हाती राहिले. शिक्षण संस्था, सूत गिरण्या, साखर कारखाने, सहकारी संस्था मराठा नेत्यांच्या हाती राहिल्या तरीही मराठा समाज उपेक्षित राहिला. शरद पवार अनेकदा अभिमानाने सांगतात मी चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो, परंतु या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांना का सोडवता आला नाही, याबाबत ते कधी तोंड उघडताना दिसत नाहीत. उपोषणाला बसलेले जरांगे शरद पवारांना याचा दोष देताना दिसत नाहीत.
शरद पवार जेव्हा पहिल्यांदा जरांगे यांच्या भेटीला आले तेव्हा लोकांनी भले दुरी, तिरी, एक्काच्या…. घोषणा दिल्या, परंतु जरांगेंना मात्र त्यांचे कोण कौतुक. पवारांच्या आगमनामुळे जरांगेंचा चेहरा कोण खुलला होता. पवारांच्या उर्जेबद्दल जरांगे त्यांनी काय कौतुक केले. हे सगळ्यांनी पाहिलेले आहे. मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, असे ज्यांना कधीही वाटले नाही, त्या पवारांबाबत जरांगेंना ममत्व वाटू शकतं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत इतका आकस का?
त्यांची काही विधानं पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठीच तर हे उपोषण सुरू नाही ना, असा संशय आल्याशिवाय राहात नाही. ‘आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतो, परंतु हा भाऊ दांडकं घेऊन आमच्याकडे येणार असेल आम्हाला सुद्धा आमच्या मर्यादा सोडाव्या लागतील. मग हे सरकार आणि दोन्ही मुख्यमंत्री त्याला जबाबदार असतील. त्यातला एक उपमुख्यमंत्री त्याला जास्त जबाबदार असेल. कारण त्याला अशा काड्या करण्याची सवय आहे.’ ‘मराठ्यांना दम निघत नाही, मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येत आहे तोपर्यंत चर्चेसाठी या.’
‘शहाणे असाल तर मराठ्यांवर गुन्हे दाखल करू नका. सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत.’
ही आहेत जरांगेंची मुक्ताफळे. मराठे तापट आहेत, त्यांचा दम निघत नाही, असा जरांगेचा दावा आहे. आम्ही म्हणतो मराठा समाज सुसंस्कृत आणि संयमी आहे. म्हणून महाराष्ट्रात लाखा लाखाचे मोर्चे शांततेत पार पडले. कुठे साधी धक्काबुक्की झाली नाही. मग बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरे जाळणारे, मालमत्तांचे नुकसान करणारे, गाड्या फोडणारे कोण? हिंसा करणारे लोक आमचे नाहीत असा दावा आधी जरांगेंनी केला होता. मग लोकांची घरे जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तेव्हा यांची फडफड का होतेय. लोकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवायचा नाही त त्यांची पूजा करायची काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काड्या करतायत असे जरांगेंनी सुचवले आहे. हा संताप त्यांना चार वेळ मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांबाबत येत नाही हे मोठ आश्चर्य, उलट पवारांचे ते खिदळत स्वागत करतात, त्यांचे कौतूक करतात. आपल्या जातीच्या माणसाने शेण खाल्ले तरी त्याचे कौतूक आणि दुसऱ्या जातीच्या माणसाने मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक मेहनत घेतली तरी त्याला शिव्या घालायचा हा निव्वळ जातीवाद आहे. जरांगे इतके तापट असतील तर त्यांनी चार शिव्या पवारांना घालून दाखवाव्यात. मराठा आरक्षणाच्या पलिकडेही राज्यात महत्वाचे प्रश्न आहेत, असे जाहीर विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. जरांगेंना या काड्या वाटत नाहीत का?
फडणवीसांना शिव्या घालून जरांगे मराठा आंदोलनाचे नुकसान करतायत. ज्यांनी कायम फाट्यावर मारले त्यांच्याविरोधात एक शब्द बोलायचा नाही, ज्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मनावर घेऊन प्रयत्न केले, त्यांच्यावर घसरायचं हा जरांगेंचा पवित्रा, समजण्या पलिकडचा आहे. मराठा आरक्षणाची लढाई रस्त्यावर लढवून जिंकता येणारी नाही. ही कायदेशीर लढाई आहे. ती सर्वोच्च न्यायालयातच लढता येईल आणि जिंकता येईल. ही लढाई लढण्याची क्षमता पवारांमध्ये नव्हतीच आणि ठाकरेंमध्ये किंचित सुद्धा नाही. मविआच्या काळात हे सिद्ध झाले आहे.
हे ही वाचा:
घर जाळणारे बिगरमराठे समाजकंटक; जीव वाचवणारे मराठा कार्यकर्ते
गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांचा पहिला गट रशियात दाखल
‘एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधून अढी दूर करा’!
मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते जरांगे यांच्याकडे आशेने पाहातायत, परंतु जरांगे मराठा आरक्षणाच्या आडून ब्राह्मण विरोधाचा कंड शमवून घेतायत. द्वेषाचा हा विकार भयंकर आहे. त्यांच्या अजाण मुलीने सरकारविरुद्ध आगपाखड केलेली आहे. घरात घुसून मारण्याची भाषा केलेली आहे. वयाने आपल्यापेक्षा मोठ्या आणि आदरणीय लोकांशी कसं बोलतात, याची शिकवण मुलांना देण्याची जबाबदारी आई वडीलांची असते. ही शिकवण बहुधा जरांगेनाच मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्या मुलीला दोष अजिबात देता येणार नाही.
जरांगेंची भाषा ऐकल्यानंतर त्यांच्याबाबत लोकांच्या मनात असलेली सहानुभूती फार काळ टिकेल असे दिसत नाही. लोकांना उर्मटपणा फार आवडत नाही. मराठा समाजातील अनेक लोक याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. बारामतीचे काका जरांगेंच्या तोंडून बोलतायत का, जरांगे हा त्यांचा पोपट आहे का? मराठा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवून फडणवीसांना ठोकणे हा जरांगेचा उद्देश आहे का ? त्यांना भाजपाची सुपारी घेतली आहे का? पवारांनी ही सुपारी दिली आहे का? असे अनेक प्रश्न जरांगे आपल्या बडबडीमुळे निर्माण करतायत. भाजपाची सुपारी वाजवून, फडणवीसांना शिव्या घालून मराठा आरक्षण मिळणार आहे का?
महिना पंधरा दिवस उपोषण करणाऱ्या जरांगेंना स्वत: ची उंची एवढी वाटू लागली आहे की ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल करू लागलेत. मोदींचे विमान उतरू देणार नाही, अशा प्रकारची भाषा करण्या इतपत त्यांची मजल गेली आहे. जरांगेची भाषा पाहून शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची आठवण होते. काही महिन्यांपूर्वी टिकैत यांचे सकाळ संध्याकाळ चॅनलवर दर्शन होत होते. आज चॅनलवाले त्यांना विसरले, कारण त्यांना नवा विषय मिळाला. चॅनलवाले हटल्याबरोबर आजूबाजूची गर्दी पांगली, नेतेही कमी झाले. स्वत:चा टिकैत होणार नाही, याची काळजी जरांगेंनी घ्यावी.
१५ दिवसांच्या आंदोलनाच्या बळावर ज्यांनी जनसेवेसाठी हयात खपवली अशा मोदींवर तोंडाळपणा करू नये. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची क्षमता पवारांमध्ये नाही हे त्यांनी सिद्ध केले आहे. न्याय मिळालाच तर तो मोदी आणि फडणवीसच देतील. त्यामुळे बारामतीच्या नवीन पोपटासारखे कटू बोल टाळण्याचा प्रयत्न करा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)