मेनस्ट्रीम मीडियामध्ये चार दशके काम केलेला माणूस, ठीक एका तपापूर्वी मीडियाच्या क्षेत्रात उतरतो. एकांगी, एकतर्फी, तटस्थतेची झूल पांघरून काँग्रेसची दलाली करणाऱ्या, पुरोगामीत्वाच्या चेहऱ्याखाली हिंदू विरोधाचा एजेंडा राबवणाऱ्या मीडियाला त्यांनी तुडवायला सुरू करतो. तेव्हा मीडियाला काही समांतर उभे राहते आहे, याचा अंदाज काही लोकांना येतो. भाऊ तोरसेकर हे त्या माणसाचे नाव. आता एका तपानतंर हा समांतर पर्याय हाच मीडियाचा मुख्यप्रवाह झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजी नगरात एनलायझरने आयोजित केलेल्या युट्यूबर्सच्या कुंभमेळ्यात याची नव्याने प्रचीती आली.
दिशा उद्याची (माध्यमाची-राजकारणाची) या कार्यक्रमाचे कार्यक्रम एनलायझर या अत्यंत लोकप्रिय यूट्युब चॅनलच्या सुशील कुलकर्णी आणि श्रीकांत उमरीकर जोडगोळीने केले होते. भाऊ तोरसेकर प्रमुख वक्ते होते, त्यांच्या व्यतिरिक्त आकार डीजी-9 चे प्रभाकर सुर्यवंशी, दिल्लीच्या ओसीएन नेटवर्कचे ओंकार चौधरी, पोस्टमनचे अक्षय बिक्कड, पुण्याचे सचिन पाटील, लक्षवेधचे आबा माळकर यांना आमंत्रण होते. या कार्यक्रमाबद्दल कोणतीही विशेष प्रसिद्धी करण्यात आली नव्हती. ना पोस्टर ना बॅनर, ना कोणी बडा फायनान्सर. संभाजीनगरातील तापाडीया सभागृहात कार्यक्रम होणार होता.
प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू झाला तेव्हा सभागृह तुडुंब भरले होते. सभागृहाच्या गॅलरीतही पाय ठेवायला जागा नव्हती. जेवढी गर्दी सभागृहात तेवढीच सभागृहा बाहेर. एखाद्या राजकीय पक्षाला गर्दी जमवायला किती सायास पडतात हे सगळ्यांना ठाऊक आहे. परतुं भाऊ तोरसेकर आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून युट्यूबवर एक नवे युग निर्माण करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना पाहण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले होते. कोणी नागपूर, कोणी अकोला, कोणी मुंबई, नवी मुंबई, मालाड, डोंबिवली, जळगाव, काही लोक तर इंदौरवरून आले होते. गर्दी इतकी होती, की कार्यक्रम एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा प्रस्थापित वृत्तसमुहाचा आहे, असा भास व्हावा. नव्वदी उलटलेले अनेक जण या कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम पूर्ण पाच तास चालला, तरी एकही माणूस हलला नाही.
गेले तीन महिने अफाट कष्ट करून सुशील कुलकर्णी आणि श्रीकांत उमरीकर एनलायझर्सनी आयोजित केलेला हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच सुपरहीट झाला. कार्यक्रमात भाऊ तोरसेकर जे काही बोलले ते एनलायझरच्या यूट्युबवर उपलब्ध आहेच. भाऊ आज सोशल मीडियाचे सुपरस्टार झाले आहेत. महेंद्र बाहुबली म्हणा हवे तर. भाऊ बोलायला उभे राहिल्यावर लोकांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. लोकांचे प्रेम पाहून अंगावर शहारा आला.
हे ही वाचा:
पॅट कमिन्सने चुकवला १८ वर्षांपूर्वीचा हिशेब
मी ग्रेट आहे कारण मी हिंदू आहे, हे ठासून सांगा!
राज्यातील साडेतीन लाख युवक-युवतींना मिळणार ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ !
महिलांनी नऊवारीत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन!
आज कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियाच्या संपादकाला नसलेली झळाळी या माणसाला लाभलेली आहे. गेले तपभर मीडियाचे झूठ लोकांसमोर ठसठशीतपणे मांडणाऱ्या गणेश वसंत उपाख्य भाऊ तोरसेकर या व्यक्तिला लोकांनी डोक्यावर घेतलेले आहे. फक्त हुकमी तर्काच्या आधारावर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हेच जिंकून येतील हे छाती ठोकून सांगणारा माणूस म्हणजे भाऊ तोरसेकर. तिथून त्यांच्या भाकीतांना सुरूवात झाली. परंतु ही भाकीतं ग्रहताऱ्यांवर आधारित नव्हती, त्याचा आधार होता फक्त भाऊंचे बिनतोड तर्क. सर्वोच्च न्यायलयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुनावणी सुरू असताना त्यांनी निकाल काय लागेल याचे भाकीत सुनावणीच्या पहिल्या टप्प्यात केले होते. जनतेची नस माहिती असणाऱ्या या माणसाच्या प्रेमात लाखो लोक पडले नसते तरच नवल होते.
त्यांच्या तर्कसंगत मांडणीची लोकांना इतकी सवय लागली आहे की लोक किमान तासभर तरी त्यांचे व्हीडीयो ऐकण्यासाठी देतात. ‘तुमको हमारी उमर लग जाय…’ या गीताच्या ओळीचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून हाच आहे. आपल्या आय़ुष्यातील रोज एखादा तास दुसऱ्याला ऐकण्यासाठी देणे. हे ऋण आहे. असं काही तरी भाऊंनाच सुचू शकते.
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुशील कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर, प्रभाकर सूर्यवंशी, अक्षय बिक्कड, आबा माळकर, न्यूज डंकाचे महेश विचारे, घनघोरचे अश्विन अघोर, अनय जोगळेकर अशी दुसरी फळी उभी राहिली. लोकांच्या पसंतीस उतरली. लोकांनी त्यांनाही भरभरून प्रेम दिलं.आपल्या दुकानाच्या बाजूला तोच माल विकणारे दुसरे दुकान उभे राहिले की पहील्या दुकानदाराचा जळफळाट होतो. अहो दुकान सोडा, एखाद्या वडापावच्या गाडीच्या बाजूला दुसरा वडापाववाला आला तरी पहिल्याची चीडचीड होते. त्यात चूक काहीच नाही. ही मानवी प्रवृत्ती आहे. परंतु भाऊंनी आपल्या पाठोपाठ उभ्या राहणाऱ्या या तरुणांना कायम आगे बढो केले. त्यांचा उत्साह वाढवला, त्यांना मार्गदर्शन केले. कारण भाऊंना दुकानदारी कधी करायचीच नव्हती. पैसा कमवणे हे त्यांचे लक्ष कधीच नव्हते. त्यांना लोकांच्या समोर फक्त जळजळीत सत्य मांडायचे होते, असत्याचा बुरखा फाडायचा होता. त्यामुळे सुशीलचा एनलायझर वाढतोय, लोक आकार डीजी-९ च्या प्रेमात पडतायत याचे त्यांना नेहमीच कौतुक वाटले.
मेनस्ट्रीम मीडियाचे आता पार पोतेरे झालेले दिसते. लोकांना सत्य ऐकायचे असेल तर ते आमचे यूट्यूब चॅनल ऐकतात. त्यावरून मत बनवतात. हे भाऊंचे यश आहे. त्यांनी गेल्या एका तपाच्या काळात काही मुठभरांचा एजेंडा लोकांच्या माथी मारणाऱ्या मीडियातील बड्या मुखंडाना चीतपट केले. लोक मला ऐकतात कारण लोकांच्या मनातल्या भावना मी बोलून दाखवतो. लोकांचे मन मला कळते, असे भाऊ संभाजीनगरातील भाषणात म्हणाले.
नव्या तंत्रज्ञानामुळे वृत्तक्षेत्रातील प्रस्थापितांचा बाजार उठून त्याची जागा सर्वसामान्य माणूस घेईल असे भाकीत थॉमस फ्रीडमनने ५ एप्रिल २००५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पुस्तकात केले होते. भाऊंनी तेच करून दाखवले आहे. हाती कोणतेही भांडवल नसताना त्यांनी भांडवलदारी मीडियाला फक्त धक्का दिला नाही, तर चारीमुंड्या चीत केले. आज कोट्यवधींची गुंतवणूक असलेला मीडिया एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाऊ तोरसेकर आणि त्यांच्या प्रभावामुळे निर्माण झालेला युट्यूबर्सचा गोतावळा याची तुलना केली तर कोण भारी पडेल, याचे उत्तर जनतेने संभाजीनगरात देऊन टाकले.
ज्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तो दिवस १९ जून २०२३ आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदासांच्या रचनांचा जागर करत या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. मी भाऊंना बरेचदा ऐकले आहे. परंतु संभाजीनगरात पाहिलेले भाऊ वेगळेच. शेकडो चाहत्यांच्या उपस्थिती सोशल मीडियाची ताकद दाखवणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन एनलायझरने केले होते. या देखण्या कार्यक्रमाचे श्रेय केवळ आणि केवळ सुशील कुलकर्णी आणि श्रीकांतजींचे. दोघांचे मन:पूर्वक आभार.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)