आधी मातोश्री-२ चा हिशोब तर द्या…

फेसबुक लाईव्हवरून लोकांना कोमट पाण्याचे प्रयोग शिकवले जात होते, तसेच आताही २५ वर्षांच्या कार्यकाळात केलेली कामे समजावून सांगावीत.

आधी मातोश्री-२ चा हिशोब तर द्या…

महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिउबाठाचे नेते आदित्य ठाकरे विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलने करण्याचा जन्मसिद्ध अधिकार विरोधकांना आहे. त्यामुळे तो शिउबाठालाही आहे. परंतु महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चे काढताना उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-२ उभारण्यासाठी पैसा कुठून आला, याचा तपशील लोकांना द्यायला हवा.

 

घरी बसून महाराष्ट्र चालवला, असे उद्धव ठाकरे वारंवार सांगत असतात. हे मुख्यमंत्री पद कुरवाळत घरी बसण्याचे आणि आपल्या घरबसल्या कर्तृत्वाचे निर्लज्ज समर्थन आहे. पण ठाकरेंच्या स्वसमर्थनामुळे प्रश्न हा निर्माण होतो की जर अडीच वर्ष त्यांनी घरी बसून सत्ता सांभाळली असेल तर मग सत्ता गेल्यावर वज्रमूठ सभा घेत बाहेर फिरण्याचे कारण काय? फुटीनंतर उरलेला पक्ष ते घरी बसून का सांभाळत नाहीत? युवराज आदित्य ठाकरेसुद्धा मविआच्या सत्ता काळात क्वचितच बाहेर पडत. तेही घरी बसून त्यांचे पर्यावरण खाते सांभाळत होते. मग त्यांना आता भ्रष्टाचाराविरुद्ध रस्त्यावर का उतरावे लागेत आहे? त्या काळात जसे फेसबुक लाईव्हवरून लोकांना कोमट पाण्याचे प्रयोग शिकवले जात होते, तसेच आताही २५ वर्षांच्या कार्यकाळात केलेली कामे समजावून सांगावीत. कामे केली नसतील तर खोके, खोके आणि गद्दार गद्दार एवढंच सांगत राहावं म्हणजे लोक मतं देतील.

 

 

महापालिकेचा कालावधी संपत असताना मार्च २०२२ मध्ये स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत साडे सहा हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आले. महापालिकेत तेव्हा एकसंध शिवसेनेची सत्ता होती. गेली २५ वर्ष टिकून असलेला मुंबई महापालिकेचा बालेकिल्ला बहुधा आता कोसळणार याची कुणकुण लागल्यामुळे जाता जाता मिळेल ते ओरपण्याचा हा प्रयत्न असावा. ७ मार्च २०२२ च्या स्थायी समिती बैठकीत २५० प्रस्ताव मंजूर झाले, सुमारे साडे सहा हजार कोटींचे प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता अर्ध्या तासात मंजूर झाले.

 

 

मुंबई महापालिका खर्च प्रचंड करते. पण पैसा जातो कुठे? मुंबईचे आरोग्यसेवेसाठी एका वर्षाचे बजेट सुमारे ६ हजार ३०० कोटी रुपये इतके आहे. परतुं गेल्या २५ वर्षांच्या काळात आरोग्य व्यवस्था गाळात चालली आहे. केइएमसारखे एकही सुसज्ज हॉस्पिटल उभारणे शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेला गेल्या २५ वर्षात शक्य झाले नाही. त्याची कडवट फळे कोविडच्या काळात जनतेने भोगली. पालिकेच्या रस्त्याची दर पावसाळ्यात चाळण होते. मुंबईच्या रस्त्यांचे तलाव होतात. मुंबईकरांचा मैला आजही थेट समुद्रात सोडला जातो, त्यामुळे समुद्राचे गटार झाले आहे, मुंबईतील समुद्राच्या पाण्याला दुर्गंधी येते.

 

 

पैसे कसे ओरबाडले जातात पाहा. उंदीर मारण्याच्या नावाखाली दरवर्षी भरपूर खर्च केला जातो. फेब्रुवारी २०२२ मध्ये पालिकेत उंदीर मारण्यासाठी २ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला. एक उंदीर मारण्यासाठी २० रुपये खर्च, दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त उंदीर मारले तर प्रति उंदीर २२ रुपये. पाच वर्षात महापालिकेने ११ लाख ५२ हजार ११५ उंदीर मारल्याचा दावा केला आहे. उंदीर मारण्यासाठी सुमारे २३ कोटी रुपये खर्च झाले, पण उंदीरांचा सुळसुळाट काही कमी होताना दिसत नाही.

 

हा कारभार ज्यांनी केला ते १ जुलैला महापालिकेवर मोर्चा काढून शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात साडे बारा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला असून याची चौकशी करण्यासाठी एसआयटीच्या स्थापना केल्याची घोषणा केली आहे. ठाकरेंच्या तिजोरात गेलेला एकेक पैसा पालिकेच्या तिजोरीत परत आणणार असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आता एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षात घमासान सुरू होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्रसंघाने ‘योग’च्या टीकाकारांना फटकारले

विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मोदींशी भेट…भारताच्या उज्ज्वल भवितव्याची दिली ग्वाही

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विधान भवनात योग दिवस केला साजरा

योग ही भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी!

 

एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची चोरी उघड करण्याची घोषणा केल्यानंतर मोर्चा काढण्याची घोषणा करून आदित्य ठाकरे यांनी सिनाजोरी केलेली आहे. आमच्या शासन काळात महापालिकेने ९२ हजार कोटींचे फिक्स डिपॉझिट केले, असा दावा आदीत्य ठाकरे यांनी केला आहे. हे सत्य असेल तर एकाही मुंबईकराला पालिकेने कोविडच्या काळात फुकट लस का पुरवली नाही? हा पैसा कोविडच्या काळात करदात्या मुंबईकराला उपयोगी का पडला नाही? याचेही त्यांनी उत्तर द्यायला हवे. प्रत्येक वेळी पैसे नाहीत, अशी रड उद्धव ठाकरे का करत होते? या ठेवींची आठवण कोविडच्या काळात का झाली नाही?

 

गेल्या २५ वर्षात महापालिकेला एकही सुसज्ज हॉस्पिटल बनवता आले नाही, हे लोकांनी पाहिले. परंतु उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-२ उभी केली हे मात्र लोकांनी पाहिले. १० हजार चौरस फूटांचे बांधकाम, ३ डयुप्लेक्स फ्लॅट, पाच बेड रुम, स्टडी रुम, होम थिएटर, स्विमिंग पूल, जिम आणि सभागृह असलेली ही सुसज्ज इमारत उभारण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुकेश अंबानी नाहीत. हा पैसा त्यांनी कुठून आणला याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यायला हवे. घरी बसून जसे ते राज्य चालवत होते, तसे ते घरी बसून उद्योगधंदेही चालवत असतील तर ते कोणते उद्योग हेही लोकांना कळायला हवे. फक्त हवाला ऑपरेटर चतुर्वेदीचा सहभाग नसलेले उद्योग त्यांनी सांगावेत आणि १ जुलैचा मोर्चा सुफळ संपूर्ण करावा.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version