सरकारला जेव्हा जाग येते…

सरकारला जेव्हा जाग येते…

उशीरा का होईना महायुती सरकारला जाग आली. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे जरा जास्तच लाड झाले, याचे भान आले. आरक्षण दिल्यानंतरही जरांगेंचे बघून घेऊ, पाहून घेऊ बंद होईना. जाळपोळ, रास्ता रोकोचे तमाशे थांबत नव्हते. जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुरगुरल्यानंतर त्यांची उलटी गिनती होणार, याची कुणकुण अनेकांना लागली होती. अखेर राज्य सरकारला रौद्र रुप दाखवले. अराजकाचे सूत्रधार शोधण्याची सुरूवात झालेली आहे. याप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा सरकारने केलेली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे प्रकरणी विधिमंडळात सविस्तर भूमिका मांडली. परखड शब्दात सांगितले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. कायदा हाती घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. गाव बंद, रस्ता बंद ही काय भाषा आहे? जरांगे माझ्याविरोधात बोलले, उपमुख्यमंत्र्यांबाबत त्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली. एकेरी भाषेत कोणी बोलत असेल तर खपवून घेणार नाही, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचे कान उपटले. हे बोलण्यासाठी थोडा उशीर झालाय खरा, पण देर आये दुरुस्त आये.

जे आधी व्हायला हवे होते ते अखेर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान घडले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सांगितले ते सूचक आहे. कोणाकडे बैठका होत होत्या, जरांगेंचे कोणासोबत फोटो आहेत, पैसा कोणाचा होता हे सर्व हळूहळू बाहेर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु न्यूज डंकाने कालच सांगितल्याप्रमाणे आधीच राज्य सरकारकडे भरपूर मसाला आहे.

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे रोहीत पवार आणि राजेश टोपे यांची नावे घेतली आहेत. जरांगेंचे सूत्रधार आता समोर येतायत. जरांगेंचे उपोषण कसं भरपेट जेवून सुरू होते हेही समोर येते आहे. चळवळीतला एखादा माणूस राज्याच्या गृहमंत्र्यांला धमकावतो ते कशाच्या जीवावर? वर्दीतल्या साध्या पोलिसाला धमकावले तर पोलिस तात़डीने कारवाई करत आरोपीचा पुठ्ठा सुजवून काढतात. इथे जरांगेंनी कोणालाही सोडले नाही. वास्तविक दोघांतला एक उपमुख्यमंत्री काड्या करतोय हे जरांगेंचे वक्तव्य आले तेव्हाच त्यांचा समज देण्याची गरज होती. परंतु राज्य सरकार डोक्यावरून पाणी जाईपर्यंत थांबले. कदाचित ही रणनीतीही असू शकेल. या काळात कोण कोणाला गुप्तपणे भेटतेय, गाठीभेटी कोणाच्या कारखान्यात, कोणत्या हॉटेलात होतायत, बैठकीत काय शिजते आहे, याचा तपशील जमा करण्याचे काम सुरू असेल.

जरांगेंचे आंदोलन तो पर्यंत यशस्वी होते जोपर्यंत त्यांचा हेतू मराठा समाजाचे भले करणे आहे, असे सर्वांना वाटत होते. हे आंदोलन जरांगेंनी केवळ मराठा समाजासाठी स्वत:च्या प्रेरणेने सुरू केले आहे, असे लोकांचा समज होता. परंतु जेव्हा त्यांच्या बोलण्यातून राजकारण डोकावू लागले, त्यांच्या डोक्यावर कोणाचा तरी वरदहस्त आहे, कोणी तरी त्यांना स्क्रीप्ट देते आहे, हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर जरांगेंचा कडेलोट होणे निश्चित होते. जरांगेंच्या सभेला जे लोक गर्दी करत होते, त्यांना मुलांचे शिक्षण हवे होते, नोकऱ्या हव्या होत्या. त्यांना ना जातीय द्वेष हवा होता, ना महाराष्ट्र पेटवायची त्यांची इच्छा होती.

मूठभर लोक या कामाला लागले होते. मराठा समाज राज्यभरात असताना रास्ता रोको तुरळक ठिकाणी झाला, त्यातही प्रत्येक ठिकाणी बोटावर मोजण्याइतके लोक होते, याचा अर्थ मराठा समाजाचे या आंदोलनाला समर्थन नव्हते. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले आता हे आंदोलन ताणण्याचे काहीच कारण नाही, असे एका मोठ्या वर्गाला वाटत होते. त्यामुळे जरांगे अस्वस्थ होते.

या आंदोलनात सुरूवातीपासून सक्रीय असलेल्या काही लोकांना जरांगेंच्या हेतूबाबत संशय निर्माण झाला. बारसकर महाराज, वानखेडे बाई, वाळेकर असे अनेक लोक जरांगेंच्या विरोधात बोलू लागले. त्यातून मराठा आंदोलनाच्या आडून जरांगेंनी चालवलेल्या राजकीय स्क्रीप्टची पोलखोल होते आहे.

हे ही वाचा:

ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना आठवे समन्स!

डाव्यांना केरळमधून कॉंग्रेसची हकालपट्टी करायची आहे

अजित पवारांकडून सभागृहात महिलांची ताकद दर्शवणारी शेरो शायरी

अनंत अंबानीचा “वनतारा”, हत्तींपासून वाघापर्यंत मिळाले अत्याधुनिक घर!

जरांगेच्या गाठीभेटी राजेश टोपे आणि रोहीत पवार यांच्यासोबत होत होत्या, हे उघड झाल्यानंतर या आंदोलनाचा सूत्रधार कोण हा सस्पेन्स उरतच नाही. आज वर कोणत्याही सामाजिक आंदोलनात न झालेली पैशाची उधळण जरांगेंवर का झाली याचा उलगडा लोकांना होतो आहे. जेसीबी, जेवणावळी आणि वाहनांच्या ताफ्यांचा वित्त पुरवठादार कोण ही बाब शोधणे काय फार कठीण नाही.

सरकारकडे बरेच पुरावे तयार आहेत. एसआयटी चौकशीतून काही गोष्टी बाहेर येतील. मराठा आंदोलन सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही भागांमध्ये दंगल सदृश स्थिती निर्माण करण्यात आली होती. महाराष्ट्रात दंगली होतील, अशी विधाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वारंवार करीत होते. या सगळ्या कड्या जोडण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात अराजक निर्माण करण्याची योजना कोणाची होती? कोण कोण यात सामील होते, याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून इतरांना शिव्या घालण्याची बुद्धी कोणामुळे येते हेही महाराष्ट्रासमोर येईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version