‘कुछ डरे हुवे लोग…’ फडणवीसांना दम देतायत!

भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांना खाली खेचण्यासाठी शरद पवारांनी दंड थोपटले आहेत

‘कुछ डरे हुवे लोग…’ फडणवीसांना दम देतायत!

‘आई-बहिणींवर लाठी हल्ला करण्याची ज्यांची नीती असेल त्यांच्या हातात सत्ता ठेवणार नाही’, अशी डरकाळी ज्येष्ठे नेते शरद पवारांनी फोडली आहे. त्यांचा रोख अर्थात भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पवारांचे वय आता ८२ झाले आहे. राजकारणात अनेकांनी निवृत्तीचा सल्ला दिल्यानंतरही पवारांना आपली सद्दी संपल्याचे भान येत नाही. कधी काळी राजकारणात राष्ट्रीय महत्वांकाक्षा बाळगणाऱ्या या नेत्यांने अस्तित्वासाठी जातीचे कार्ड काढले आहे.     एकेकाळी राजकारणाच्या सारीपाटावर पवारांनी सोंगट्या टाकाव्यात आणि डाव फिरावेत, अशी स्थिती होती. आता ते दिवस गेले. राज्यातील सत्ता पालटणे सोडा, स्वत:च्या पक्षावर पक्की मांड ठेवणेही त्यांना जमत नाही असे चित्र आहे. त्यामुळे कोणाच्या हातात सत्ता ठेवणार आणि ठेवणार नाही, याचे सुके दम त्यांनी देऊ नयेत. पक्षाला ५४ जागा मिळवून देण्यासाठी पावसात भिजावे लागते इतकी वाईट परिस्थिती पवारांवर आलेली आहे.

 

राजकारणाच्या प्रांतात अढळपद नावाचा प्रकार अस्तित्वात नसतो. कारकीर्दीच्या अखेरपर्यंत शिखरावर राहणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो. सद्दी संपते तेव्हा बाजू व्हावे, शांत बसावे हा नियम पाळतात, त्यांची किमान शोभा तरी होत नाही. अनेकजण हात धरून बाजूला केल्याशिवाय हटत नाहीत. शरद पवार अजूनही हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रस्थ आहेत, ही बाब त्यांच्या आणि त्यांच्या मूठभर समर्थकांशिवाय कोणाला फारशी मान्य होत नाही. त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना सक्तीची निवृत्ती दिलेली आहे. परंतु हे काही अचानक घडलेले नाही. राजकारणात आपले पूर्वीचे वजन राहिलेले नाही, याचे काही संकेतही मिळत असतात.

 

काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदाणी यांची भेट घेतल्याच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पवारांवर खूप चिखलफेक केली होती. काँग्रेसच्या किरकोळ नेत्या अलका लांबा यांनी शरद पवारांना टोला लगावला होता. ‘कुछ डरे हुवे लोग, अपने नीजी हितो के चलते तानाशाहा सत्ता के गुण गा रहे है…’. आता अलका लांबा यांचे वय काय? त्यांची पत काय? परंतु त्याही पवारांना बोलून गेल्या. कुणीही उठावं आणि टीका करावी इतके वाईट दिवस पवारांवर कधीच आले नव्हते.

 

पवारांना बोलल्याबद्दल या लांबा बाईंना काँग्रेसच्या एकाही ज्येष्ठ नेत्याने झापले नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पवारांची पाठराखण केली होती. तेच पवार आता फडणवीसांना घेरण्यासाठी जोरदार ताकद लावतायत. सत्ता हाती राहू देणार नाही, असे आव्हान दिले आहे. पवार मुरलेले राजकारणी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषवल्यानंतरही ज्यांना मराठा आरक्षणाची समस्या सोडवता आली नाही. सत्तेवर असताना अशा समस्या भिजत ठेवायच्या आणि विरोधी बाकावर बसल्यावर त्याच समस्यांचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वापर करायचा ही त्यांची नीती आहे.

 

अर्थात राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले राजकारण करणारच. राजकारण करताना अनेकदा वल्गना कराव्या लागतात. अमक्या तमक्याला सत्तेवरून खाली खेचू ही तर राजकारण्यांची अत्यंत आवडती वल्गना. भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांना खाली खेचण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. फडणवीसांशी त्यांची ही झटापट नवी नाही. २०१४ पासून ती सुरू आहे. परंतु प्रत्येक वेळा फडणवीसांना नामोहरम करण्यासाठी त्यांना जातीचे कार्ड खेळावे लागले ही वस्तूस्थिती आहे. कधी काळी राष्ट्रीय राजकारणाची महत्वाकांक्षा बाळगणारा, देशाच्या पंतप्रधान पदाची इच्छा बाळगणारा नेता राजकारणाच्या निसरड्या जमीनीवर घसरत घसरत जातीपर्यंत खाली आला आहे. तिथेही लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. अभद्र शब्दात त्यांचा उद्धार करतायत असे चित्र आहे. पवारांचा फडणवीसांवर राग असणे स्वाभाविक आहे. कारण फडणवीसांनी पवारांच्या प्रत्येक खेळीला नामोहरम केले. पवारांचे राजकारण उघडे पाडले, उताणे केले. पवारांचा राजकीय आलेख घसरण्यास फडणवीस निमित्त ठरले आहेत.

 

हे ही वाचा:

किशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले

एक कोटीचे इनाम जिंकल्यावर पंजाबच्या जसकरणला अमिताभनी मिठीच मारली!

कु्त्रा चावल्यानंतर त्याला पाणी, वाऱ्याची भीती वाटू लागली आणि…

इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण

पवारांनी जातीचे कार्ड इतक्या वेळा वापरले की त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख कास्टवादी असा होऊ लागला. पवार आता लाठीमाराचा मुद्दा पेटवतायत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली म्हणजे लाठीमाराचे आदेश दिल्याची कबुलीच आहे, असे पवार म्हणतायत. त्यांच्या पक्षाचे त्यांचे जवळचे नेते अनिल देशमुख यांनी तर सूत्रांचा हवाला देऊन लाठीमाराचे आदेश गृहमंत्रालयातूनच आल्याचे छातीवर हात ठेवून सांगितले आहे. अशी विधाने करताना त्यांनी शरद पवारांचा इतिहास तर आठवून पाहायचा. फार दूरची गोष्ट नाही. तीस वर्षांपूर्वी पवार मुख्यमंत्री असताना गोवारींच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला होता. चेंगराचेंगरीत ११७ लोकांचा बळी गेला होता. त्यात अनेक महिला, लहान मुलांचाही समावेश होता. मुख्यमंत्री पदावर असूनही पवार नेहमीप्रमाणे या सगळ्यातून नामानिराळे राहीले. त्यावेळी गोवारींचे हत्याकांड कोणाच्या आदेशाने झाले होते ?

११७ बळी घेणाऱ्याला जनरल डायरची उपमा अधिक शोभली असती ना. ज्यांनी बळी घेतले ते आज काय भाषा करतायत? म्हणे आई-बहिणींवर लाठीमार करणाऱ्यांना सत्तेवर ठेवणार नाही. पवार सत्तेविना इतके उद्वीग्न झाले आहेत की त्यांच्या राजकारणाला भंपकपणाचा रंग चढलाय. वाढत्या वयानुसार त्यांना विस्मरणाचा रोग जडलेला असेल तर अनिल देशमुख, उद्धव ठाकरे यांना तरी आठवण असली पाहिजे या घटनेची. उद्धव ठाकरेंचे वय अवघे ६३ आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर ते युवावस्थेतच आहेत. विरोधी बाकांवर बसल्यामुळे जर विस्मरणाचा रोग बळावत असेल तर विरोधी बाकांवर बसल्या बसल्या शंखपुष्पी, ब्राम्ही, अश्वगंधा घ्यायला सुरूवात करायला हवी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version