मला अटक करा, मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो, पण त्यांना छळू नका, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या सत्रात काढले. ही आगतिकता होती, की विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर न देता पळ काढण्याचा मार्ग. मित्र हो मुख्यमंत्री महोदय सभागृहात जे बोलले ते अघटीत आहे. 170 आमदारांचा पाठींबा घेऊन बनलेल्या सरकारचा प्रमुख इतकी आगतिक भाषा बोलतो हे खरोखरच अघटीत आहे. भाजपाने गेली दोन वर्षे ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची पोल खोलण्याचा एकमेव कार्य़क्रम राबवला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह अस्त्राने सत्ताधारी घायाळ झाले असून आता मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते आगतिकतेची भाषा बोलतायत. हा कदाचित सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो, पण यातून भाजपाची पोलखोल मोहीम यशस्वी होत असल्याची पोचपावती मिळते आहे.