29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरसंपादकीयफडणवीसांनी काढली पवारांच्या जखमेवरची खपली काढली

फडणवीसांनी काढली पवारांच्या जखमेवरची खपली काढली

एकनाथ शिंदे वसंतदादा पाटलांना पवारांनी आस्मान दाखवले तो इतिहास आणि अलिकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा खेळ खल्लास केला तो घटनाक्रम यात काही फरक आहे का?

Google News Follow

Related

‘शरद पवारांनी केले तर ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदेंनी केली तर ती बेईमानी कशी?’ हा सवाल भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय. कित्येक तटस्थ पत्रकारांनी पवारांना मुत्सद्दी नेता हे बिरुद बहाल करण्यासाठी गेली साडे चार दशके घाम गाळलाय. फडणवीसांनी त्यांच्या कष्टांवर पाणी ओतण्याचा प्रमाद केलाय. पवार या शब्दबाणांमुळे घायाळ झाले असावेत. ‘फडणवीस हे त्यावेळी शाळकरी असल्यामुळे बहुधा त्यांना इतिहास माहीत नसावा’, ‘मी बेईमानी कधी केली सांगा?’, असा सवाल पवारांनी विचारलाय.

 

 

जेष्ठ नेते शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाला एकेकाळी अशी झळाळी होती की, महाराष्ट्रातील तमाम पत्रकार त्यांच्या आरत्या ओवाळायचे. त्यातले बरेच पत्रकार आजही आहेत, परंतु ती झळाळी ओसरली आहे. या पत्रकारांनी पवारांसाठी एका स्वतंत्र शब्दकोषाची निर्मिती केली. त्यात बेईमानी, गद्दारी, खंजीर खुपसणे हे शब्दच नाहीत. एकदा का आरत्या ओवाळायच्या ठरवल्या की तोंडात शिव्या येतच नाहीत.  फक्त ओव्याच सूचतात. त्यातून वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झालेला तरुण पुरोगामी नेता असे महिमामंडन झाले.

 

शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते पश्चिम महाराष्ट्राचे, दोन्ही मराठा. दोघांच्या नावावर एकेका नेत्याचा बाजार उठवल्याचा विक्रम जमा आहे. एकनाथ शिंदे वसंतदादा पाटलांना पवारांनी आस्मान दाखवले तो इतिहास आणि अलिकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा खेळ खल्लास केला तो घटनाक्रम यात काही फरक आहे का?

 

१९७७ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस एकसंध नव्हती. काँग्रेस दुभंगल्यामुळे निर्माण झालेले ब्रह्मानंद रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते. निकालानंतर जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यांना ९९ जागा मिळाल्या. इंदिरा काँग्रेसला ६२, रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. या दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन केले. यशवंतराव चव्हाण हे रेड्डी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या आशीर्वादाने वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. शरद पवार मंत्री झाले. इंदिरा काँग्रेसचे नेते नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. ज्याच्याकडे जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र तेव्हा पहिल्यांदा अमलात आले असावे.

 

परंतु हे सरकार वर्षात कोसळले. जसे एकनाथ शिंदे शिवसेनेतून ४० आमदार घेऊन बाहेर पडले, तसे शरद पवार रेड्डी काँग्रेसमधून ४० आमदारांसह बाहेर पडले. दादांचे सरकार कुचकामी असल्याचा ठपका पवारांनी ठेवला होता. परंतु एकनाथ शिंदे गद्दारी केली आणि पवारांनी मुत्सद्देगिरी. कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना सोडली. पवारांनी मात्र महाराष्ट्रात पुरोगामी राजकारणाचा झेंडा फडकत ठेवायचा होता.

 

‘मी सर्वसमावेशक सरकार स्थापन केले, ज्यात जनसंघही होता’, असा खुलासा पवारांनी फडणवीसांच्या विधानावर केलेला आहे. जनसंघाचा जन्मच काँग्रेसच्या देशबुडव्या धोरणांना विरोध करण्यासाठी झाला. परंतु पवारांचा पिंड तर काँग्रेसी. वसंतदादा आणि ते एका पक्षात होते. दादा पवारांचे नेते होते. दादांचा त्यांच्यावर विश्वास होता. तरीही त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणायचे नाही.

 

हे ही वाचा:

शॅम्पेन उडाल्याने पबमध्ये राडा, बाऊन्सरसह सहा जणांना अटक

१०० वर्षांची वृद्ध महिला पंतप्रधान मोदींना देणार १५ एकर जमीन!

कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख

भारतावर टीका करण्यात ओबामांनी ऊर्जा घालवू नये!

 

महाराष्ट्रात खंजीर खुपसण्याच्या राजकारणाचा श्रीगणेशा करणारे नेते म्हणजे शरद पवार असे जे लोक म्हणतात, त्यांना पवारांचे मोठेपण कळणे शक्यच नाही. पवारांचे राजकारण म्हणजे यू-टर्न, धरसोड, नव्हते,  त्यांनी काळाची पावले ओळखून निर्णय घेतले. त्याला गद्दारी म्हणता येत नाही. पुलोदचा प्रयोग फसल्यानंतर १९८६ मध्ये पवार पुन्हा काँग्रेसवासी झाले. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. याला माघार म्हणता येणार नाही, याला प्रसंगावधान म्हणतात. पवार शब्द पाळण्याच्या भानगडीत कधी पडले नाहीत. सत्यवतीला दिलेला शब्द पाळण्यासाठी भीष्माचार्यांनी जे काही सोसले त्यातून महाभारत घडले, हे ठाऊक असल्यामुळे पवार गरज पडेल तेव्हा आपलेच शब्द गिळत असतात.

 

विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून सोनिया गांधी यांना केलेला विरोध म्यान करून त्यांनी १९९९ मध्ये काँग्रेसशी आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली. २००४ मध्ये विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पंतप्रधानपदाच्या आड येणार नाही, असे जाहीरपणे सांगितले. स्वत: कधी काळी बेटकुळ्या दाखवत घेतलेल्या भूमिकेच्या पूर्णपणे विरोधी भूमिका घेऊन त्याचे समर्थन करण्यासाठी प्रचंड पुरोगामीपणा लागतो. तो पवारांमध्ये ठासून भरला आहे. त्याला लोक भले वैचारिक कोलांट्या म्हणत असले तरी त्यात फारसे तथ्य नाही.

 

 

१९९९ मध्ये केंद्रात भाजपाप्रणित लोकशाही आघाडीचे सरकार होते. तेव्हा लोकसभेत दोन आकडी संख्या गाठता न आलेल्या पक्षाचे नेते असूनही पवार लोकसभेत पहिल्या रांगेत बसले. कारण पवारांचा मोठेपणा फक्त त्यांच्या पाठीशी किती खासदार आहेत, यात नाही हे प्रमोद महाजन यांनाही ठाऊक होते. याच न्यायाने फक्त साडेतीन जिल्ह्यांत प्रभाव असून पवार राष्ट्रीय नेते बनले. आयुष्यभर तिहेरी तलाकचा विरोध करणारे हमीदभाई दलवाई अखेरच्या काळात पवारांच्या घरी मुक्कामाला होते. दलवाई ज्यासाठी आयुष्यभर लढले तो तिहेरी तलाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रद्द केला तेव्हा शरद पवारांनी त्यांना कडाडून विरोध केला. उगाच वैचारिक बांधिलकी वैगेरेचा बाऊ न करता, स्वपक्षहिताय आणि मतपेढीसुखाय अशी व्यापक भूमिका ते घेत राहिले.

 

 

पुलोदचा प्रयोग करण्यात आला तेव्हा, फडणवीस शाळेत असल्यामुळे त्यांना हा इतिहास ठाऊक नसावा असा दावा पवार करतात. परंतु यात फक्त फडणवीसांचा दोष नाही. पवारांचा खरा इतिहास बाहेर येऊ नये असा प्रयत्न अनेक पाळीव पत्रकारांनीच केला. त्यामुळे लवासा,  व्होरा समितीचा अहवाल, गोवारी हत्याकांड, जलसिंचन घोटाळा हे विषय थोडक्यात चर्चा होऊन आटोपले. १३ वा बॉम्बस्फोट घडवणारे पवार किती जाणते आहेत, हे लोकांच्या समोर आलेच नाही.  पवारांचा खरा चेहरा लोकांसमोर आणणारे फक्त दोन नेते आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस. मुंडे यांच्या निधनामुळे अर्धवट राहिलेले काम फडणवीस पूर्ण करतायत. पुन्हा एकदा त्यांनी मुत्सद्दी पवारांच्या जखमेवरची खपली काढली.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा