लोकसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड कोणाच्या बाजूने?

पाकिस्तान धार्जिण्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करायचा आहे.

लोकसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड कोणाच्या बाजूने?

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील इंडी आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या पदयात्रेत इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान नावाचा इसम दिसला. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात तो सामील होता. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बराच गलका झाला. तो पदयात्रेत नव्हता, रस्त्यावर असा खुलासा उबाठा शिवसेनेने केला. परंतु या घटनेनंतर अंडरवर्ल्डची प्यादी या निवडणुकीत उतरली आहेत का, असा सवाल निर्माण झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी मुस्लीम मोठ्या संख्येने एकवटले आहेत. आयएसआय़चे स्लीपर सेल, पीएफआयचे छुपे हस्तक आणि माफीया दाऊद इब्राहीमच्या हस्तकांची हातमिळवणी झाली असल्याचे संकेच मिळत आहेत.

उबाठा शिवसेनेच्या पदयात्रेत ज्या इब्राहिम मुसा बद्दल इतका गदारोळ झाला तो नेमका कोण आहे? त्याचा १९९३ च्या बॉम्बस्फोटात त्याची भूमिका काय होती? १९९३ च्या बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्तला सजा झाली होती. त्याच्या घरी एके ४७ सह, हँडग्रेनेडही सापडले होते. हा माल त्याच्याकडे पोहोचवणारा माणूस म्हणजे इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान. त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. १५ जानेवारी १९९३ रोजी माफीया दाऊद इब्राहीमचा भाऊ अनीस याच्या सांगण्यावरून मुसानेही शस्त्र संजय दत्तकडे पोहोचवली होती. त्यावेळी त्याच्यासोबत अबू सालेम आणि सलीम कुर्ला हे दोन गँगस्टरही होते.

न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. दहा वर्षाची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा भोगून तो आता बाहेर आला आहे. मुसा उर्फ बाबा चौहान हा शिक्षा पूर्ण करून ४ वर्षांपूर्वी तुरूंगात बाहेर पडला आहे. बाबा चौहानचा भाऊ इकबाल मोटार ट्रेनिंग स्कूल चालवतो. तोच कुटुंबाचा खर्च सांभाळतो. बाबा चौहान बराच काळ एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याची पार्श्वभूमी पाहिली तर तो दाऊद टोळीत सक्रीय होता. दाऊदच्या खतरनाक गँगस्टरशी त्याचा संपर्क होता. अचानक तो अमोल कीर्तिकर यांच्या पदयात्रेत दिसला. उबाठा शिवसेनेने आता मुसा प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी हे काही अपवादात्मक प्रकरण नाही.

 

उबाठा शिवसेनेचे नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर नाशिक आडगावमध्ये गुन्हा दाखल झाला. १९९३ बॉम्बस्फोटांचा आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत बडगुजर पार्टी करत होता. त्यावेळी आढळलेल्या संशयास्पद हालचालींची दखल घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली. सलीम मीरा शेख उर्फ सलीम कुत्ता हा दाऊद टोळीचा गँगस्टर आणि कुख्यात तस्कर मोहम्मद डोसा याचा साथीदार. मुंबई बॉम्बस्फोटासाठी जी स्फोटक रायगडमधील शेखाडीच्या किनाऱ्यावर उतरली होती. ती उतरवून घेण्यात या सलीम कुत्ताचा हात होता. बडगुजर याच्या पार्टीत हा कुत्ता दिसला. पार्टीनंतर मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण झाली होती. हे प्रकरण डिसेंबर २०२३ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले. तपास यंत्रणाही आश्चर्यचकित झाल्या कारण, हा कुत्ता येरवडा तुरुंगात आहे. पेरॉलवर असताना तो बडगुजरला भेटला असे नंतर उघड झाले. हे प्रकरण भाजपा आमदार नितेश राणे यांची विधानसभेत उपस्थित केले होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

अबु आजमी यांच्या समाजवादी पक्षाने उबाठा शिवसेनेला पाठींबा दिलेला आहे. सपाचे आमदार रईस शेख यांनी भायखाळ्यातील उबाठा शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अबु आजमी हे देखील साखळी बॉम्बस्फोट खटल्याचे आरोपी होते. पुराव्या अभावी त्यांची सुटका झाली. उबाठा शिवसेनेच्या पाठीशी मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने उभा राहावा, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे नेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी मुस्लीम मतदारांना डोळा मारायला सुरूवात केलेली आहे. हे लांगुलचालन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांना रुचणार नाही याची पूर्ण जाणीव असली तरी त्यांनी मतचाटुकारीता सुरू ठेवली आहे. त्यांच्या सभेत मुस्लिमांची उपस्थिती लक्षणीय असते. अल्ला हो अकबर आणि हजरत टीपू सुलतान की जयच्या घोषणाही दिल्या जातात. आधी झालेले सर्व विसरा, असे जाहीर विधान त्यांनी शिवसेनाभवन येथे झालेल्या मुस्लीम मेळाव्यात केले आहे.

हे ही वाचा:

खळबळजनक! आई, पत्नी, मुलांची हत्या करून आरोपीची गोळ्या झाडून आत्महत्या

लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

चक्क निधी राजदान म्हणतेय इंडी आघाडीकडे व्हिजन नाही,; मोदींच्या योजना कल्याणकारी’

‘मोदींनी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही, सल्ला दिलाय’

दक्षिण मुंबईतील पाकमोडीया स्ट्रीट, डोंगरी या भागात माफीया दाऊद इब्राहीमचे, त्याचा खास हस्तक छोटा शकीलचे नातेवाईक सलीम फ्रुट, आऱीफ भुजवाला आदी वास्तव्याला आहेत. मुस्लीम मतदारांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे.
आता मुद्दा हा उपस्थित होतो की मुंबईला हादरवणाऱ्या आणि अनेक मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या आरोपींसोबत उबाठा शिवसेनेची ही चुंबाचुंबी का सुरू आहे? पाकिस्तान धार्जिण्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करायचा आहे. मोदींना हरवण्यासाठी मशीदीतून फतवे काढले जात आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी उबाठा शिवसेना आणि इंडी आघाडीतील तमाम पक्षांच्या आसपास वावरताना दिसत आहेत.

पाकिस्तानात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढलेली आहे. तिथला माजी मंत्री फवाद चौधरी यांना राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. काही काळापूर्वी खरतनाक दहशतवादी मौलाना हाफीज सईद यानेही काँग्रेसचे कौतुक करून भारतातील पाकिस्तान धार्जिण्यांना योग्य ते संकेत दिले होते. ज्यांचे पाकिस्तानात कौतुक होतेय, त्यांचे उद्धव ठाकरे कौतुक करतायत. दारुण पराभव टाळण्यासाठी ठाकरे कोणालाही मिठ्या मारायला तयार आहेत. पाकिस्तान धार्जिण्या गुन्हेगारांची वळवळ ठेचून काढण्यासाठी पोलिस दल समर्थ आहे. एकूणच म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ मात्र सोकावतोय.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version