24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरसंपादकीयआंतरराष्ट्रीय कुबेर, वागळे आणि राऊत

आंतरराष्ट्रीय कुबेर, वागळे आणि राऊत

Google News Follow

Related

पत्रकारीता तटस्थ असते या गैरसमजाचा भारतात कडेलोट होऊन जमाना झाला, विदेशातही स्थिती वेगळी नाही. मोदी भक्त आणि मोदी विरोधक अशा दोन गटात भारतातील मीडियाची विभागणी झाली आहे. जे तटस्थ असल्याचा दावा करतात ते छुपे भाजपाविरोधी किंवा डावे असतात ही बाब आता वाचकांच्याही लक्षात येऊ लागली आहे. विदेशातला मीडियाही अशा दोन तटात विभागला जावा इतकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मोठी झाल्याचे लक्षात येते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने भारतात बिझनेस करस्पॉडंण्टची नियुक्ती करताना ‘मोदीविरोध’ हा निकष लावलाय.

‘मोदी भारतात हिंदु बहुसंख्यवादावर आधारीत आत्मनिर्भरता, जोरकस राष्ट्रवादाला खतपाणी घालतायत. नेहरु आदी धुरीणांनी रचलेला भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पायाच त्यांच्यामुळे धोक्यात आलाय. देशाच्या सीमा धगधगतायत.’ अशी कारणमीमांसा देऊन मोदीविरोधी वार्ताहराची गरज अधोरेखित करण्याचा प्रयत्न न्यूयॉर्क टाइम्सने केलाय. जणू मोदींनी निर्माण केलेला हा जाळ शांत करण्याची जबाबदारी आपल्यावरच आणि पर्यायाने भारतातील आपल्या ‘बिझनेस करस्पॉडंण्ट’च्या खांद्यावर आहे, हा भ्रम या जाहीरातीमागे आहे. परंतु निव्वळ एवढेच कारण नाही.

आंतरराष्ट्रीय अर्थकरणाचा विचार केल्यास युरोपियन देशांची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात सातत्याने घसरते आहे. अर्थकारणावर असलेल्या अमेरीकेच्या दबदब्याला चीन आव्हान देतो आहे. पश्चिमेच्या अर्थकारणाला आलेल्या मरगळीचा फायदा घेऊन चीन आंतरराष्ट्रीय मीडियावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतो आहे. डळमळीत झालेल्या पाश्चात्य अर्थकारणामुळे तोळामासा झालेल्या विदेशी मीडियाला चीन डॉलर्सचा चारा टाकून आपलेसे करण्याची रणनीती राबवतोय.
नामांकीत ‘टाइम’ नियतकालिकात या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये ‘आरएसएफ’ या संस्थेचा एक अहवाल २५ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध झाला. त्यात संस्थेचा ‘ईस्ट एशिया ब्यूरो डायरेक्टर’ सेड्रीक अल्विनीने चीनच्या या खतरनाक मीडिया रणनीतीचा भांडाफोड केला. तो सांगतो, जागतिक मीडिया ताब्यात घेण्यासाठी चीनने खूपच आक्रमक रणनीती आखली आहे. चीनी प्रपोगंडा सर्वदूर पोहोचवण्यासाठी एकीकडे चीन सरकारी मीडियावर प्रचंड खर्च करतो आहे. आंतरराष्ट्रीय मीडियासाठी चीनचे वार्षिक बजेट १.३ अब्ज डॉलर्स इतके प्रचंड आहे. भरमसाठ जाहीराती देऊन आंतरराष्ट्रीय मीडियाला ताब्यात घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे. वर्षाला अडीच लाख डॉलर्स इतक्या प्रचंड रकमेच्या जाहीराती चीनने आंतरराष्ट्रीय मीडियाला दिल्या आहेत. अनेक बड्या वृत्तपत्रांची हिस्सेदारी विकत घेण्यासाठी चीन उघड वा छुप्या मार्गाने प्रयत्न करीत असून त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आले आहे. पत्रकारांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांना विविध प्रकारची आमीषे दिली जातायत. चीनची नीती उघड आहे. आपला प्रभाव वाढवणे आणि शत्रूचे खच्चीकरण करणे या दोन्ही मार्गाने चीन जगाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आशियात चीनला सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी भारत आहे. ही स्पर्धा नरेंद्र मोदी यांच्यामुळे अधिक तीव्र झाल्याची चीनला जाण आहे. त्यामुळे मोदींना रोखण्यासाठी चीन पत्रकारांना हाताशी धरण्याच्या काँग्रेस मार्गाचा अवलंब करू शकतो.

मोदींना अडचणीत आणण्यासाठी मीडियाचा वापर काँग्रेसने अनेकदा केला. परंतु प्रत्येक खेळीवर मात करत मोदी चार पावले पुढे गेले. अनेक छोटीमोठी ‘टूलकिट’ मोदींनी उधळून लावली. असहिष्णूतेच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये बिनबुडाचे लेख लिहून मोदींना काटशह देण्याचा प्रयोग यापूर्वीही झाला आहे. भारत मंगळयान सोडण्याच्या तयारीत होता तेव्हा गायीला घेऊन जाणाऱ्या ग्रामीण भारतीयाचे व्यंगचित्र काढून न्यूयॉर्क टाइम्सने भारताला मागस दाखवून खिजवण्याचा प्रयत्न केला होता.

भारताविरुद्ध असलेल्या या जळजळीत सातत्य आहे. ज्या अमेरीकेत पहील्या लाटेत मृत्यू झालेल्या कोरोना बाधितांचे मृतदेह अजून शवागारात आहेत, त्या अमेरीकेतील न्यूयॉर्क टाइम्ससह, बीबीसी, टाइम, अल जझीरा आदी मीडियात कोरोनामुळे भारतात धगधगणाऱ्या चितांचे फोटो छापले हे ताजे उदाहरण. असे छुटपुट प्रयत्न पूर्वी गनिमीकाव्याने केले जायचे, ते आता उघड आणि समोर येऊन करण्याचा प्रयत्न होतोय एवढाच फरक आहे. मोदींची बदनामी करण्याचे प्रयत्न आता अधिक सुसंघटीतपणे होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचीही तयारी असू शकते. भारतातील मोदीविरोधी मीडिया आणि आतंरराष्ट्रीय मीडियातील भारतविरोधी फळीत हातमिळवणी झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

भारतातील पत्रकारांच्या एका गटाची सत्तापिपासा आणि पैशासाठी असलेली अतोनात वखवख यातून हे घडण्याची दाट शक्यता आहे. भारतातील काही बडे पत्रकार काँग्रेसची दलाली करतात ही बाब नीरा राडीयाच्या टेपमधून पहिल्यांदाच सप्रमाण सिद्ध झाली. यूपीएच्या काळात केंद्र सरकारमध्ये बड्या पत्रकारांचा किती वावर होता, त्यांची दलालीची दुकाने किती तेजीत होती याची छोटीशी झलक राडीयाच्या टेपमुळे लोकांना मिळाली. ही भानगड उघड झाल्यानंतरही यात नावे असलेल्या पत्रकारांची दुकाने बंद झाली नाहीत की त्यांची मीडिया संस्थांतून हकालपट्टी झाली नाही. कारण अनेकजण त्या दलालीचे लाभार्थी होते.

हे ही वाचा:

इराण-अफगाणिस्तानमार्गे आलेलं ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

धर्मांतरानंतर दहशतवादी बनलेल्या मुलीसाठी आईचे केंद्राकडे साकडे

न्यूयॉर्क टाइम्सची जाहिरात: भारतात हवा मोदीविरोधी वार्ताहर

लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी?

मोदी सत्तेवर येताच ही दुकानदारी बंद झाली. त्यामुळे दलालीच्या जोरावर दिल्लीच्या ल्युटीयन्स एरीयात आलिशान महाल उभे करणाऱ्यांना पोटशूळ झाला तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. यातून दुखावलेले पत्रकार कायम मोदीविरोधी मुद्याच्या शोधात असतात. अनेकदा आंतरराष्ट्रीय मीडीयाकडून त्यांना हे खाद्य मिळत असते. एखाद्या विदेशी वर्तमानपत्रात भारतातील असहिष्णूता, जातीयवाद, घसरते अर्थकारण, राफेल भ्रष्टाचार अशा प्रकरणांवर खरे-खोटे लेख आले की त्यांची री ओढून ‘नेहरु-गांधी युगात सोने की चिडीया असलेला भारत मोदींमुळे कसा रसातळाला जातोय’, अशी हाकाटी पिटण्याचे काम पत्रकांरांचा एक गट का करतो? मोदीविरोध आणि हिंदूविरोध या व्हीटॅमिनवर जगणाऱ्या राणा अय्यूबसारख्या टुकार पत्रकारांना या वर्तमानपत्रात कॉलम चालवायला कसे मिळतात? याचा खुलासा न्यूयॉर्क टाइम्सच्या जाहीरातीतून झाला आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चाय-बिस्कूट पत्रकारांच्या हातमिळवणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थात ही हातमिळवणी ममता बॅनर्जी आणि शिवसेनेच्या हातमिळवणीसारखी आहे, ज्याचा त्या दोघांनाही काही फायदा होण्याची शक्यता नाही, केवळ मोदीविरोधाचा कंड शमवण्याचे काम त्यातून साध्य होऊ शकते.

सातत्य आणि चिकाटी दाखवूनही मोदींच्या प्रतिमाभंजनाचे काम देशपातळीवर राजदिप सरदेसाई, बरखा दत्त, रवीशकुमार करू शकले नाहीत, दररोज लेखण्या झिजवून जे राऊत, केतकर, कुबेर, वागळेना महाराष्ट्रात जमले नाही, त्यात न्यूयॉर्क टाइम्ससारख्या आणखी चार वर्तमानपत्रांच्या पत्रकारांची भर पडून काय वेगळे होणार. मोदींना मीडीयाने बनवले नाही, मुखपत्रात मॅरेथॉन मुलाखती छापून त्यांचे नेतृत्व घडले नाही, त्यामुळे मीडिया त्यांना संपवण्याचे काम करू शकत नाही. लेखण्या झिजवून काँग्रेसयुक्त पत्रकारांनी मोदींची प्रतिमा त्यांच्या समर्थकांच्या मनात बळकटच केली. सत्तेला हादरे देण्याचा दम मीडियात उरलेला नाही. नीरा राडीयासारख्या अनेकांनी या भ्रष्ट मीडीयाचे वासे पोकळ करून ठेवले आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा