राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जे आमदार भाजपासोबत आले. त्यात अमोल मिटकरी सुद्धा होते. ते अजित पवार यांच्यासोबत असले तरी शरद पवारांच्या सोबत असल्यासारखे बोलत असतात. रामा सोबत रावण सुद्धा आम्हाला वंदनीय आहे, या पुढे राज्यात रावण दहन होऊ देणार नाही, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली. लोकांना प्रश्न पडलाय कालपर्यंत ब्राह्मण म्हटल्यावर ज्यांच्या कपाळाची शीर ताठ व्हायची त्यांनी अचानक ब्राह्मणाच्या पायावर डोके कसे ठेवले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण राजकारणाला हवा देण्याचा प्रयत्न केला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या राजकारणाला जोर आला. त्यांच्या रोखाने पेशवे, श्रीमंत अशा शब्दांचे भाले फेकायला सुरूवात झाली. पुणेरी पगडीला विरोध झाला. त्या ऐवजी पवारांनी फुलेंचे पागोटे धारण केले. नेता जेव्हा असे सूक्ष्म संकेत देत असतो, कार्यकर्ते मात्र इतके प्रगल्भ नसतात. नेत्याचे संकेत लक्षात आल्यावर ते चेकाळत, आक्रमक होतात.
समर्थ रामदासांपासून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांपर्यंत सर्व महनीय व्यक्तिंच्या विरोधात महाराष्ट्रात गरळ ओकण्याचे धंदे सुरू झाले. राज्यात मविआचे सरकार असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी या मुखपत्रातून अनर्गल टीका करण्यात आली, तरीही सरकारचे सूत्रधार असलेल्या शरद पवारांनी संतापजनक मौन पाळले. मिटकरी या ब्राह्मणविरोधी कारवायांतील अग्रणी. सत्य नारायणाच्या पूजेपासून अंत्यसंस्कारापर्यंत प्रत्येक धार्मिक कर्मकांडावर कुळाचारावर तोंड उघडायचे आणि वाट्टेल ते बोलायचे असा धंदा मिटकरींनी सातत्याने केला.
या बोलभांडगिरीचा दणका अजून मिटकरींना बसलेला नाही, त्यामुळे त्यांचा तोंडाळपणा बंद झालेला नाही. परंतु मिटकरींनी यूटर्न घेतला की काय असे वाटण्यासारखे वक्तव्य त्यांनी कालपरवा केले. आम्हाला रामा प्रमाणे रावणही वंदनीय असल्याचे विधान त्यांनी केलेले आहे. काही दिवसांपूर्वी मिटकरीसारख्या लोकांना वैचारिक गांजा पुरवणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे पिवळे इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांचे नाशिक हे शूर्पणखेचे, हे वक्तव्य प्रसिद्ध आहे. मिटकरींना शूर्पणखेच्या भावावर प्रेम आलेले आहे. हे दोघेही ब्रिगेडी ब्राह्मणाच्या प्रेमात कसे? असा प्रश्न कोणाला पडू शकतो.
रावणाचे वडील विश्रवा हे ब्राह्मण ऋषी. त्यांचे आजोबा पुलत्स्य हेही ऋषी. त्यामुळे रावण हा वाममार्गाला गेलेला ब्राह्मणाचाच लेक होता. मिटकरींना अचानक ब्राह्मण वंदनीय वाटू लागले की वाममार्गाला लागलेला म्हणून ब्राह्मण वंदनीय वाटतोय.
रावण दहनाला आपला विरोध असल्याचे मिटकरी सांगतात. भारताचे मूळ मालक आदिवासी आहेत, रावण त्यांना पूजनीय आहे. असे विधान मिटकरी करतात. म्हणजे ब्राह्मण विरुद्ध मराठा अशी झुंज लावून देण्याच्या प्रयत्नानंतर आता आदिवासी विरुद्ध शहरी अशी नवी पुडी मिटकरी आणि त्यांच्या ब्रिगेडींनी सोडलेली दिसते. शहरी नक्षलवाद्यांची ही जुनी आयडिया आहे.
हे ही वाचा:
संरक्षण मंत्रालयाच्या प्रदर्शनात दिसली स्वदेशी शस्त्रांची ताकद
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन
वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह
मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?
एक थिअरी मांडायची, ती मोडीत निघाल्यावर दुसरी पोतडीतून काढायची, हे शहरी नक्षलवाद्यांचे जुने धंदे. आधी रामायण काल्पनिक आहे, असा प्रचार झाला. त्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत, मग रामाला खलनायक आणि रावण हा हिरो होता ही नवी थिअरी मांडण्याचा प्रयत्न झाला. दक्षिणेतील द्रविड राज्यकर्त्यांनी कित्येक दशके प्रयत्न करून पाहिले, परंतु तिथल्या मंदीरातील गर्दी आणि देवदेवतांवर लोकांचा विश्वास कमी होताना दिसत नाही. मिटकरी यांनी रावणाचे मंदिर बांधण्यासाठी निधीही देऊ केलाय म्हणे. परंतु मिटकरींची नवी थिअरी त्यांच्या जातीच्या मीटरमध्ये बसत नाही. एक तर रावण हा दशग्रंथी, जनेऊधारी ब्राह्मण होता. कपाळावर ठसठशीत त्रिपुंड लावायचा. ज्यांनी रामानंद सागर यांचे रामायण पाहिले, त्यात रावणाची पत्नी मंदोदरी त्यांना शंभरवेळा आर्यपुत्र म्हणते. म्हणजे तो स्वत:ला आर्य समजायचा. आदिवासी नाही. उलट राम हा क्षत्रिय. महाराष्ट्रातले ९६ कुळी मराठे कोण? तर क्षत्रियच. म्हणजे मिटकरींचा गोंधळ उडालेला दिसतो. एक तर त्यांनी चुकून माकून एका ब्राह्मणाला डोक्यावर घेतले आहे. तेही अशा ब्राह्मणाला ज्याने क्षत्रियाशी वैर केले. मिटकरी त्यांना वंदनीय म्हणतायत. त्यांचे मंदिर बांधण्यासाठी निधी देतायत. मिटकरींनी रावणाला आदिवासींशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. मग रामाची भक्ती करणाऱ्या देशात शेकडो जनजाती आहेत त्यांचे मिटकरी काय करणार आहेत?
थोडक्यात काय तर देवाने तोंड दिले म्हणून बोलायचे, हा मिटकरी सारख्या लोकांचा धंदा आहे. ते ज्या ब्रिगेडी संस्कृतीचे पाईक आहेत त्यांनी मंगळसूत्राला विरोध केला, कपाळावरच्या कुंकवाला विरोध, धार्मिक कर्मकांडाला, कुळाचाराला विरोध केला. परंतु यांचा पराभव स्वत:च्या घरातच झालेला आहे. यांचे विवाह सोहळे मंगलाष्टकांच्या उच्चारणानेच पार पडतात. अग्निच्या भोवती सात फेरे घालून ही मंडळी घरात धर्मपत्नीला आणतात. यांच्या सौभाग्यवती कपाळावर ठसठशीत कुंकूही लावतात आणि गळ्यात घसघशीत मंगळसूत्रही घालतात. परंतु मिटकरींनी या सर्वावर कडी केली आहे. थेट ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)