एमआयएमचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी आज अनेक पक्षांचे नेते धडकले. राज्यात तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी काही नेते प्रयत्नशील आहे. जलील यांच्या घरी झालेल्या गाठीभेटी त्याचाच भाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मविआमध्ये दाखल होण्याची एमआयएम इच्छा होती. परंतु त्यांना बाहेर ठेवण्यात आले. अन्य काही पक्षांनाही एण्ट्री मिळाली नाही. ते सगळे विधानसभा निवडणुकीत एकवटण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आघाडीला आणखी एक खतरनाक ट्वीस्ट मिळू शकतो, ज्याचा संबंध थेट महायुतीशी आहे.
विशाळगडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत दर्गा प्रकरणी जलील यांनी मविआच्या नेत्यांवर तोंड सुख घेतले होते. मुस्लीमांनी मविआला दोन दोन तास उन्हा उभे राहून मतदान केल्याची आठवण करून दिली होती. मुस्लीम मतांचा लोण्याचा गोळा आपल्या तोंडात न पडता मविआच्या तोंडात पडला याची खंत जलील यांना निश्चत असणार. ते स्वत: संभाजी नगरातून पडले. तिथे शिवसेनेचे सांदीपान भुमरे विजयी झाले.
विधान परिषद निवडणुकीत एकाही मुस्लीम उमेदवाराला मविआने संधी दिली नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुस्लीमांची मतं घेतली, परंतु त्यांना संधी दिली नाही, अशी जाहीर टीका त्यांनी केली होती. जलील यांना गळाला लावण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. जलील यांच्या घरी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आले. दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. शेट्टीही जलील यांच्याप्रमाणे आधाराच्या शोधात आहेत. जलील यांना भेटण्यापूर्वी ते मनोज जरांगे यांना भेटून आले होते. जरांगे यांच्यासोबत त्यांची काय चर्चा झाली हे उघड झाले नसले तरी ती काय झाली असावी याचा अंदाज बांधणे कठीण नाही. जसे जरांगेना भेटल्यानंतर शेट्टी जलील यांना भेटले तसेच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी जलील यांची भेट घेतली. अजित पवारांना अच्छा, टाटा, बाय बाय करून दुर्राणी यांनी अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गटात प्रवेश केला.
जलील यांची भेटीला आलेले हे नेते विरोधी पक्षातील होते. परंतु शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी जलील यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मविआला एकगठ्ठा मतदान करणाऱ्या मुस्लीमांच्या अपेक्षा आता चांगल्याच उंचावल्या आहेत. लोकसभेत आपल्याला प्रतिनिधीत्व मिळाले नाही. परंतु, आता विधानसभा निवडणुकीत मात्र आपल्याला संधी हवी आहे, असे अनेक नेते ठामपणे सांगतायत. काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी तर मुस्लीमांना लोकसंख्येच्या गणितानुसार किमान ३२ जागा मिळायला हव्या, अशी जाहीर मागणी केलेली आहे. जलील सुद्धा वेगळ्या शब्दात हिच भावना मांडत आहेत.
मविआच्या समोर हे सगळ्या मोठे संकट ठरण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात मुस्लीम बहुल विधानसभा मतदार संघ फार नाहीत. जिथे मुस्लीमांचा टक्का मोठा आहे तिथे मुस्लीम उमेदवारांनाच उमेदवारी मिळेल अशी खात्री नसते. अनेकदा इथून मुस्लीमांचे मसीहा उभे राहतात आणि जिंकून येतात. मुंब्र्याचे उदाहरण देता येईल. जितेंद्र आव्हाड इथून लढतात.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १० मुस्लीम उमेदवार जिंकून आले. त्यावेळी शिवसेनेचे अब्दुल सत्तार हे एकमेव मुस्लीम आमदार होते. बाकीचे नऊ काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम आणि समाजवादी पार्टीचे होते. परंतु २०२४ च्या निवडणुकीत सध्या असलेल्या आमदारांच्या तुलनेत मुस्लीमांना तिप्पट उमेदवारीची अपेक्षा आहे. ती पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण मविआतील तीन पक्षांमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच होणार हे निश्चित. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र त्या मागे आहे. तिन्ही पक्षांत आमदारकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यात शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या डाव्या पक्षांनाही उमेदवारी देण्याचे सुतोवाच केलेले आहे. त्यामुळे पक्षातील इच्छूकांना, मित्र पक्षांना शांत करणार की मुस्लीमांना उमेदवारी देणार, हा पेच मविआतील प्रत्येक पक्षासमोर उभा ठाकणार आहे. मुस्लीमांना फार फार तर आश्वासने दिली जातील. त्यामुळे मुस्लीमांच्या वाट्याला अपेक्षाभंग येण्याची शक्यता जास्त आहे.
हे ही वाचा:
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये १४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण !
मध्यप्रदेशातील मदरशांवर कारवाई सुरू, श्योपूर जिल्ह्यातील ५६ मदरशांची मान्यता रद्द !
विकृत दाऊद शेखने २०१९मध्येही यशश्रीला छळले होते…
जलील हे चांगलेच ओळखून आहेत. त्यांच्या घरी झालेल्या गाठीभेटीकडे याच दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. जलील यांना भेटलेले राजू शेट्टी हे त्यांच्यासारखेच अस्वस्थ आहेत. त्यांनाही लोकसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागलेली आहे. जरांगेही किती काळ फडणवीसांच्या डोक्यावर खापर फोडणार? मविआच्या नेत्यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत अवाक्षरही तोंडातून काढलेले नाही, हे मराठा समाज पाहातो आहे. त्यामुळे स्वत:चे अस्तित्व टीकवण्यासाठी जरांगेंनाही याबाबत काही तरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. असंतुष्टांचे हे कोंडाळे तिसऱ्या आघाडीच्या नावाने एकत्र येऊ शकते. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाची भर पडली तर ही आघाडी शक्तीशालीही होऊ शकते. कधी काळी एमआयएम आणि वंचित एकत्र होते, त्यामुळे पुन्हा एकत्र येण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. आंबेडकर त्यांच्यासोबत नाही आले तर ते स्वत: चौथी आघाडी म्हणून लढतीत उतरतील. ही जुळवाजुळव शरद पवारांच्याही नजरेत आली असणार हे उघड आहे. त्यामुळे त्यांनीच बाबा जानी दुर्राणी यांना जलील यांचा ठाव घेण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्या आघाडीत आणखी एक ट्वीस्ट शक्य आहे. अजित पवारांची महायुतीतील स्थिती अजिबातच समाधानकारक नाही. ते जर महायुतीतून बाहेर पडून तिसऱ्या आघाडीत दाखल झाले तर ते तिसरी आघाडी आणि अजित पवार या दोघांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. ही शक्यता खूप कमी असली तरी राजकारणात हे घडणारच नाही, असे ठामपणे कोण सांगू शकते?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)