अखंड भारताचे स्वप्न अधुरे…

अखंड भारताचे स्वप्न अधुरे…

आज अखंड भारत स्मरण दिवस. ७४ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरण आणि सत्तालोलुप धोरणांमुळे देशाचा एक भूभाग कट्टरतावाद्यांच्या झोळीत टाकण्यात आला. धर्माच्या नावाखाली देशाची फाळणी झाली. सीमावर्ती भागात मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. पिढ्यान पिढ्या कमावलेल्या दौलतीवर पाणी सोडून हिंदूंनी पळ काढला. वासनांध, धर्मपिसाट, जिहादींनी हजारो महिला-मुलींच्या देहाचे लचके तोडले. कित्येक मारले गेले, कित्येक राधा, रुबिना झाल्या. सीता, सलमा झाल्या. फाळणीला सातपेक्षा जास्त दशके लोटली. परंतु तुष्टीकरणाचा हा सर्प हिंदू समाजाला अजूनही डसतो आहे. गरळ ओकतो आहे. गेल्या सत्तर वर्षातील अशा घटनांची जंत्री देता येईल.

या जखमा सुकण्याचे नावच नाही, कारण रोज नव्या जखमा होतायत. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये घडलेली ताजी घटना. २३ जुलै रोजी घिसाडी समाजातील एका महिलेची ही कर्मकहाणी. भटक्या विमुक्त समाजातील ही महिला. पतीचे सात महिन्यांपूर्वी निधन झाले. पोटापाण्यासाठी विळे-खुरपे विकण्याचा व्यवसाय करत ही महिला गावोगाव हिंडत असे. घरातील सर्वात मोठी मुलगी १४ वर्षांची, तिच्या पाठी दोन लहान भावंड. एका दुपारी या कुटुंबावर दुर्दैवाने घाला घातला. घरातील कर्ती महीला बाहेर असल्याची संधी साधून या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. त्याच दिवशी गावातला सिकंदर शेख हा तरुणही गायब झाला होता. थोडा तपास केल्यानंतर हे त्याचेच पाप आहे, याचा उलगडा गावकऱ्यांना झाला. त्या मुलीवर सतत नजर ठेवून योजनाबद्धरित्या तिला पळवण्यात आले. या घटनेला आता २२ दिवस उलटले. परंतु त्या मुलीचा पत्ता नाही.

आईचे रडून रडून हाल झालेत. मुलगी जिवंत आहे, मेली की बाजारात तिची विक्री झाली याचाही मुलीच्या आईला पत्ता नाही.नगर जिल्ह्यात घडलेली ही घटना अपवादात्मक नाही. मुंबईच्या मालवणीत, डोंगरीत हीच परीस्थिती आहे. जिथे मुस्लीमांची संख्या वाढली तिथून काढता पाय घेण्याशिवाय हिंदूना पर्याय उरत नाही. तरुण मुलींना लक्ष्य केले जाते. लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढणे, पळवून नेणे हे प्रकार सुरू होतात. पालकांना कायम घोर लागलेला असतो. घरातून बाहेर गेलेली मुलगी परत येईल काय, हा विचार सतत मेंदू कुरतडत असतो.गेल्या काही दशकात मुंबईच्या काही भागांचा चेहरामोहरा आश्चर्चकारकरित्या बदलला.एके काळी कुर्ला पश्चिमेत ब्राह्मणवाडा वस्तीत फक्त ब्राह्मणांची घरे होती, आज इथे एकाही ब्राह्मणाचे घर उरलेले नाही. कुर्ला पूर्व येथे कसाईवाडा होता. आता पश्चिमेतील ब्राह्मणवाड्याचाही कसाईवाडा झाला आहे. मालवणीत मोठ्या संख्येने हिंदू पलायन करतायत. मच्छिमारीचा व्यवसाय करणाऱ्या कोळ्यांच्या मासे सुकवण्याच्या जागांवर आता अतिक्रमणे सुरू आहेत. देशातील एकही महानगर याला अपवाद नाही. देशाची राजधानी अपवाद नाही.

दिल्लीतील सीलमपूर भागात शुक्रवारचा नमाज पढताना वाल्मिकी समाजाचा त्रास होतो, त्यांना शुक्रवारी या भागात फिरकू देऊ नका, अशी तक्रारवजा विनंती मुस्लीमांनी स्थानिक पोलिसांना केली होती. इथे सातत्याने हल्ले होत असल्यामुळे वाल्मिकी समाजातील अनेक लोकांनी इथून काढता पाय घ्यायला सुरूवात केली आहे.तामिळनाडूमध्ये पेरांबलुर जिल्ह्यातील कथलूर गावाची कथा तर भुवया उंचावायला लावणारी आहे. ‘आमच्या धर्मात मूर्तीपूजा मान्य नसल्यामुळे देवीच्या उत्सव आणि मिरवणुकीवर बंदी घालावी’, अशी याचिका येथील अल्पसंख्यांक समुदायाने मद्रास उच्च न्यायालयात केली. सुदैवाने न्या.एन.किरुबाकरन यांनी ही याचिका फेटाळून लावली. हिंदू आपल्याच देशात उपरा झाला आहे. देशाची फाळणी धर्माच्या नावाखाली झाली. पाकिस्तान हा मुस्लीम देश झाला. तिथे इस्लामच्या नावाखाली हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. मंदीर फोडली जातायत, हिंदू मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण केले जाते. बांगलादेशातही हेच सुरू आहे. हिंदुस्तानात हिंदूंवर हेच अत्याचार सेक्युलरीझमच्या नावाखाली होतायत. हिंदू समाजाचे लचके तोडण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. उत्तर प्रदेशात जून महिन्यात एटीएसने मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर या दोघा मौलवींना अटक केली. दिव्यांग मुलं, गरीब महिलांसह हजार हिंदूंचे धर्मांतर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

धर्मांतरासाठी परदेशातून रसद येत होती.दक्षिण भारतात गोरगरीब वनवासी, अनुसुचित जाती-जमातीच्या लोकांचे गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात धर्मांतर झाले आहे. आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी यापैकी बहुसंख्य लोक आजही हिंदू नावे लावतात. त्यामुळे किती लोक ख्रिस्ती झाले याचा अंदाज लावता येत नाही.कोकणात येशूच्या मुर्तीसमोर आरत्या म्हटल्या जातात, त्यानंतर प्रसाद वाटण्यात येतो. प्रसाद खाता खाता कधी गळ्यात क्रॉस येतो हे त्यांचे त्यांना कळत नाही. सेक्युलरीझमच्या नावाखाली हा नंगा नाच सुरू आहे. धर्मांतरासाठी परदेशातून आलेले ख्रिस्ती पादरी मोठमोठे मेळावे भरवतात. येशूच्या कृपेचे पाणी शिंपडल्यावर इथे कॅंसर रुग्ण, मनोरुग्ण खडखडीत बरे होतात. हिंदूंच्या श्रद्धांवर सतत प्रहार करणारे अंधश्रद्धा समितीवाले भामटे इथे कधी फिरकत नाहीत.

या फसवणुकीबाबत त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. मुलुंड पूर्वेला हनुमान चौकातील एका एसआरएच्या इमारतीत एकाच घरात सासू हिंदू आणि सुन ख्रिस्ती अशी फाळणी झाली आहे. इथे राहणाऱ्या बहुसंख्य महिला घरकाम करतात. पैशाच्या जोरावर इथे कित्येकांचे धर्मांतर झाले आहे. दर रविवारी इथे नव खिश्चनांची प्रेअर होते. लाऊड स्पीकर लावून ख्रिस्ताची आळवणी केली जाते. अशा अनेक इमारती देशभरात आहेत.महाराष्ट्रात एल्गार परीषदेच्या व्यासपीठावर मदरसाछाप शर्जील उस्मानी हिंदू समाजाला सडका म्हणण्याची हिंमत करतो. प.बंगालमध्ये दुर्गापूजेवर बंदी घातली जाते, महाराष्ट्रात गणेशोत्सवावर नियंत्रणांचे ओझे आहे. केरळमध्ये बकरी ईदला बोकडांचे बळी देण्यासाठी निर्बंध शिथील केले जातात, पण हिंदू सणांवर ही मेहरनजर होत नाही. निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे नेते भर रस्त्यात वासराचा गळा चिरतात आणि बीफ पार्टी करतात, झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन नोकर भरती परीक्षेत संस्कृत आणि हिंदी वगळतात, परंतु उर्दूला स्थान मिळते. समाजवादी पार्टी सरकारच्या काळात मुख्यमंत्री अखिलेश यादव शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कावडयात्रेवर बंदी घालतात.

हे ही वाचा:

आता डिजिटल माध्यमे येणार या संस्थेच्या कक्षेत

महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या गुंडगिरीचा अडसर

अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट

महाग पेट्रोलवर हा नवा पर्याय येणार

ज्यू समाजावर अत्याचार करणाऱ्या अडॉल्फ हिटलरचे उदात्तीकरण करण्याची हिंमत इस्त्रायलमध्ये कोण करू शकेल? ओसामाचे उदात्तीकरण अमेरीकेत होऊ शकेल? परंतु भारतात मात्र हिंदूंच्या मुंडक्यांच्या राशी रचणाऱ्या तैमूर, जहांगीरची नावे आपल्या मुलांना ठेवण्याची हिंमत सैफ अलीसारखा एक बॉलिवुड स्टार करतो. ज्या हिंदूंमुळे या देशात धर्मनिरपेक्षतेचे रक्षण झाले. त्यांना खिजवण्याचा खेळ देशात सुरू आहे. हिंदूंच्या दु:खाचे मुळ काँग्रेसने पेरलेल्या तुष्टीकरणाच्या विषारी बीजात आहे. ज्यांनी ज्यांनी तुष्टीकरणाची पालखी खांद्यावर घेतील, त्यांच्या कारकीर्दीत हिंदूंवर अन्याय झाला हा इतिहास आहे. देश स्वतंत्र झाला, परंतु हिंदूंना अजून संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही. स्वातंत्र्यांची त्यांची लढाई अजून अपूर्णच आहे. अखंड भारताचे स्वप्न अधुरे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version