कुठे थांबायचे हे ज्यांना कळत नाही, त्यांना हात धरून थांबवले जाते. खाली बसवले जाते. जाणते नेते असा लौकीक असलेल्या शरद पवारांच्या वाट्याला असा अनुभव यावा हे महाराष्ट्राचे दुर्दैव. त्यांना थांबण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला कुणा भाजपा नेत्यांने दिलेला नाही. खुद्द त्यांच्या पुतण्यानेच दिलेला आहे. थोरल्या पवारांचे राजकारण आटोपल्याचे हे संकेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर झालेल्या घणाघाती भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकाश्री शरद पवार यांचे पुरते वस्त्रहरण केले. थोरल्या पवारांनी आयुष्यभर मारलेल्या कोलांट्यांचा पर्दाफाश केला. वय ८३ झाले, पुरे करा थांबा आता… असे खडे बोल सुनावले. शरद पवारांच्या कारकीर्दीत त्यांना अनेक चढउतार पाहिले, परंतु पवारांची इतकी शोभा कधीच झालेली नव्हती.
प्रत्येकाचा एक काळ असतो, परंतु सगळे दिवस सारखे नसतात. शरद पवार वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. परंतु राजकारणात त्यांची ती पत आता राहिली आहे का? हे त्यांनाही कळत असले तरी वळत मात्र नव्हते. राष्ट्रीय राजकारणातही अनेकदा याचे संकेत मिळाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील मोदी विरोधकांना बोलवण्यात आले होते. शरद पवार मंचावर होते. परंतु फोटो सेशनच्या वेळी नेमके त्यांना मागे ढकलण्यात आले. पाठीशी चार खासदार नसलेल्या नेत्याला राष्ट्रीय महत्वाकांक्षा असू शकते. परंतु इतर नेत्यांना त्याचे कौतूक कशाला असेल?
वयाची साठी सत्तरी उलटल्यानंतर फिल्मस्टार गोविंदा सारखा डान्स करणाऱ्या आजोबांचे रिल्स व्हायरल होतात, ते फुकट बघता येतात म्हणून. कोणी त्या आजोबांना लाखो रुपये मोजून सिनेमात गोविंदाच्या जागी हिरो म्हणून घेत नाही. कारण लोक यांना पैसे मोजून पाहायला येणार नाही, याची खात्री असते? पवारांना हा फरक लक्षात आला नाही. म्हणून मोठ्या पडद्यावर काम मिळेल, या आशेने ते वयाची आठ दशके उलटल्यानंतरही नाचत राहिले. अखेर आज त्यांना अजित पवारांनीच ऐकवले. ८२ झाले, ८३ झाले आता थांबा. आराम करा. आम्हाला आशीर्वाद द्या.
सुप्रिया सुळेंना अजित दादांचा युक्तिवाद मान्य नाही. अमिताभ वयाच्या ८० व्या वर्षी काम करतोय अशी तुलना त्यांनी केली. परंतु आजचा अमिताभ आज तो अमिताभ नाही. जो ७० ते ९० च्या दशकात सुपरस्टार म्हणून मिरवला. आजचा अमिताभ नवरत्न तेलच्या जाहीरातीतही काम करतो. मिळेल त्या भूमिका करतो. एक काळ गाजवलेले परंतु नंतर सद्दी संपलेले अनेक नट उतारवयातही काम करताना दिसले. परंतु त्यात मजबूरीचा भाग जास्त होता. बहुधा हे सुप्रिया सुळे यांना माहीत नसावे. एकेकाळचे ज्युबिली स्टार भारतभूषण अनेक सिनेमात मूठभर पैशांसाठी एखाद्या डायलॉगपुरते किंवा मॉब सीनमध्येही दिसले. पवारांचा अमिताभ झालाय की भारतभूषण हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावे.
परंतु पवारांच्या राजकारणाची जी काही माती झालेली आहे, ती फक्त वयामुळे नाही. त्यांच्या कोलांट्याही त्यांला जबाबदार आहेत. अजित पवारांनी तर आज त्यांची जंत्रीच सादर केली. विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून पवारांनी काँग्रेस सोडली आणि अवघ्या चार महिन्यांत त्यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना २०१४ मध्ये एतकर्फी पाठिंबा जाहीर केला. २०१७ मध्ये या सरकारमध्ये सामील होण्यासाठी बोलणी सुरू होती. परंतु शिवसेनेला सोडचिठ्ठी द्यावी ही अट भाजपाने धुडकावल्यामुळे पवारांनी ऐनवेळी निर्णय फिरवला. २५ वर्षे जुन्या मित्राला सोडणार नाही, त्यामुळे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे सरकार शक्य नाही. झालेच तर भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार बनेल असे भाजपाच्या नेतृत्वाने स्पष्ट केले. थोरल्या पवारांनी त्याला नकार दिला. पवारांना भाजपा आणि शिवसेनासोबत नकोच होती. २०१४ मध्ये जाहीर केलेला एकतर्फी पाठिंबा हा शिवसेनेला भाजपापासून दूर करण्यासाठीच दिलेला होता, अशी कबुली स्वत: पवारांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत दिली होती.
शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत जायचे नाही, असे कारण देऊन शरद पवारांनी पक्षातील लोकांना गप्प केले आणि २०१७ मध्ये भाजपाची ऑफर धुडकावली. २०१९ मध्ये एका उद्योगपतीच्या घरी पाच बैठका झाल्या. मंत्रिंडळाचे खातेवाटप आणि बाकीचा तपशीलही ठरला. परंतु ऐनवेळी भाजपाला अंधारात ठेवून शिवसेनेशी हातमिळवणी केली, असा सगळा घटनाक्रम अजित पवारांना उपस्थितांसमोर सादर केला.
अजित पवारांनी ज्या उद्योगपतीचा उल्लेख केला परंतु त्याचे नाव घेतले नाही, तो उद्योगपती कोण हे समजणे फार कठीण नाही. गेल्या तीन महिन्यात याच उद्योगपतीने पवारांची सिल्वर ओकवर भेट घेतली होती. राज्यात झालेल्या ताज्या घडामोडीत या उद्योगपतीची काही भूमिका आहे का? हे यथावकाश पुढे येईलच. एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत सरकारमध्ये सामील होणार होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
मोदीविरोधकांच्या बैठकांमध्ये मिरवणारे शरद पवार यांनीच आपल्याला २०२४ मध्ये मोदीच येणार असे सांगितले होते. तरीही देशात पक्षांचे कडबोळे बनवण्यात ते आघाडीवर असतात. कडबोळ्यांचा हा बार फुसका निघणार, येणार तर मोदीच असे सांगून अजित पवारांनी थोरल्या पवारांची उरली सुरली विश्वासाहर्ता संपवण्याचे काम केले आहे.
हे ही वाचा:
माजी क्रिकेटर प्रवीण कुमार थोडक्यात बचावला; कारला धडकला ट्रक
सर्पमित्राने कोब्राला बाटलीने पाणी पाजून दिले जीवनदान !
क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?
अजित पवारांच्या भाषणाने महाविकास आघाडीला चूड लावली आहे. हे भाषण ऐकल्यानंतर काँगेस आणि शिवसेनेच्या शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मविआची परिस्थिती बिकट झालेली आहे. परंतु आता अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे मविआमधे नवा संशय कल्लोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी थोरल्या पवारांना सुनावलेच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते छगन भुजबळ यांनीही सोडले नाही. पवारसाहेब तुम्हाला वाईट वाटले असेल परंतु वाईट वसंतदादांनाही वाटले होते. मला जेव्हा शिवसेनेतून फोडले तेव्हा बाळासाहेब आणि माँसाहेबांनाही वाईट वाटले होते, धनंजय मुंडे यांना फोडले तेव्हा गोपिनाथ मुंडे आणि पंकजा यांनाही वाईट वाटले असेल अशी खोचक शब्दात भुजबळांनी पवारांना सुनावले. थोडक्यात फक्त घर नाही, घराचे वासेही फिरले आहेत.
भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात अजितदादांनी थोरल्या पवारांना दम दिलेला आहे. तुम्ही सभा घेत फिराल तर मलाही उत्तर सभा घ्याव्या लागतील. मलाही अनेक गोष्टी उघड कराव्या लागतील असे दादा म्हणाले. पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलून मला कुणाला बदनाम करायचे नाही, असे सांगून त्यांनी थोरल्या पवारांना गर्भित इशारा दिलेला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)