महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांची राळ उडवून देत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार मात्र शांत आहेत. हाती पुरावे असल्याशिवाय मी आरोप करणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. अजितदादांची ही भूमिका महाविकास आघाडीच्या वाचाळ नेत्यांना सणसणीत चपराक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे, पक्षाचे महत्वाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा वेगळी किंवा त्यांच्या विरोधात जाणारी भूमिकाही बिनधास्तपणे मांडली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात अलिकडच्या काळातील सर्वात मोठी आयकर कारवाई अजित दादांवर झाली. त्यांचे कुटुंबियांना सुद्धा याची झळ बसली. परंतु अजित पवारांनी ना कधी या कारवाईचे भांडवल केले, ना कधी त्यांनी केंद्र सरकार किंवा भाजपावर बेताल टीका केली.
विरोधक शिंदे -फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक झाले असताना काल मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अजित दादांवर कौतूकाची फूलं उधळीत होते. अजित दादा पुराव्यांशिवाय कधी बोलत नाहीत. माहिती अधिकारात माहीत घेऊनच ते आरोप करतात, असे फडणवीस म्हणाले. अजितदादांचे कौतुक करताना फडणवीसांनी शिउबाठाला टोला लगावून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार असताना माफीया दाऊद इब्राहीमशी संबंध ठेवल्यामुळे तुरुंगात रवाना झालेल्या नवाब मलिक यांना सरकार कोसळेपर्यंत मंत्रिमंडळात ठेवणारे, अनिल देशमुख यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणे ही चूक होती, अशी निर्लज्ज कबूली देणारे महाविकास आघाडीचे नेते आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करतायत.
संजय राऊत यांनी आम्ही राज्य सरकारच्या विरोधात बॉम्ब घेऊन नागपूरमध्ये आलो आहोत, अशी गर्जना केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. अजित पवारांना या बॉम्बबद्दल काल जेव्हा पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा अजित पवार यांनी जे उत्तर दिलं ते तोंडाळ विरोधकांना आरसा दाखवणारे आहे. मी बॉम्बबद्दल बोललो नाही, जे बोलले त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारायला हवा.
हे ही वाचा:
लिओनेल मेस्सीचे धोनीच्या मुलीला खास गिफ्ट
दुचाकी चोरून तो विहिरीत टाकत होता…
पोलिसांना धमकावल्याप्रकरणी आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मी विरोधी पक्ष नेता असलो तरी तोंडाला येईल ते बोलणार नाही, पुराव्यांशिवाय काही बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून महाविकास आघाडीचा कार्यकाळ गाजवला. महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना त्यांचे सरकार असताना तुरुंगात धाडण्यात फडणवीसांची मोठी भूमिका होती.
ठाण्याच्या खाडीत मनसुख हिरण यांचे पार्थिव सापडले तेव्हा विधानसभेत फडणवीसांचे भाषण सुरू होते. अंटालिया स्फोटकं प्रकरणात मनसुख हिरण हा महत्वाचा दुवा असून त्याच्या जीवाला धोका आहे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. मनसुखच्या हत्येची बातमी तोपर्यंत बाहेर आलेली नव्हती. फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर काही मिनिटातच मनसुखची हत्या झाल्याचे वृत्त सर्व माध्यमांमध्ये झळकले. फडणवीस यांच्याकडे असलेली माहीती इतकी अचूक असायची. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून दिलेले दोन पेन ड्राईव्ह अजूनची महाविकास आघाडीच्या मानेवर तलवारीसारखे लटकतायत.
अजित पवार सुद्धा आक्रमक नेते आहेत. परंतु ते फडणवीसांसारखे आक्रमक होऊन सरकारवर प्रहार का करत नाहीत असा प्रश्न शिउबाठातील अनेकांना पडलाय. फडणवीसांनी दादांचे केलेले कौतुक जखमेवर मीठ चोळणारे आहे. विरोधकांना जेव्हा एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर सरकारला घेरायचे असते तेव्हा सगळा दारूगोळा विरोधी पक्षनेत्याकडे दिला जातो. विरोधी पक्ष नेता मग बार उडवून देतो. महाविकास आघाडीचे नेते विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मागतायत. परंतु विरोधी पक्षनेता म्हणून अजितदादा शांत आहेत. पुराव्याशिवाय मी आरोप करणार नाही, असं स्पष्टपणे सांगतायत.
त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सरकारला दे माय धरणी ठाय करून सोडण्याचा विरोधकांचा मनसुबा काही कामयाब होताना दिसत नाही. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जे काही होते तो सरकारच्या कामकाजाचा भाग असू शकत नाही. ते मीडियासाठी खाद्य असते. राजकीय फोटो सेशन असते. प्रसिद्धीसाठी त्याचा उपयोग होत असला तरी सरकारवर त्यामुळे साधा ओरखडाही येत नाही.
पत्रकारांसमोर उद्धव ठाकरे बॉम्बस्फोटांचा दावा करत असताना अजित पवार तिथे उपस्थित होते. महाविकास आघाडीतील अन्य नेतेही हजर होते. तरीही अजित पवार त्या मुद्यावर काही बोलत नाहीत. जे बोलले आहेत त्यांना विचारा असे स्पष्ट सांगतायत. अर्थ एवढाच कि बोलणाऱ्यांशी आपला संबंध नाही, त्यांच्या म्हणण्याला मी जबाबदार आणि उत्तरदायी नाही असे दादांनी सूचित केले आहे.
दुसरा अर्थ असाही आहे की विरोधकांनी ज्या ब़ॉम्बस्फोटांचा इशारा दिला आहे, ते घोटाळे नेमके कोणते याबाबत विरोधी पक्ष नेता अनभिज्ञ आहे. आरोप करणाऱ्यांचा विरोधी पक्षनेत्याशी ताळमेळ नाही. अजितदादांनी पुराव्यांवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे शिउबाठाला एक तर अजितदादांपर्यंत पोहोचवावे लागतील किंवा ही प्रकरणे पक्ष पातळीवर उपस्थित करावी लागतील. जर प्रकरणात दम असेल आणि तरीही सरकार दाद देत नसेल तर न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर हे सिद्ध करून दाखवावे लागेल.
परंतु असे काही घडेल याची शक्यता कमी आहे. हिट एण्ड रन ही महाविकास आघाडीची भूमिका सरकार असल्यापासूनच्या आजतागायत कायम आहे. आरोप करायचे आणि मीडियासमोर चमकून घ्यायचे याच्या पलिकडे मावा आघाडीची मजल जाताना दिसत नाही.