अजितदादांनी काढली ठाकरेंच्या बातचलाखीची हवा…

महिला मुख्यमंत्र्यावरून रणकंदन

अजितदादांनी काढली ठाकरेंच्या बातचलाखीची हवा…

उद्धव ठाकरे यांना आता एका महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे. ठाकरे यांचे हे जादूचे प्रयोग महाराष्ट्रातील जनतेला आता बऱ्यापैकी कळू लागले आहेत. एखादा जादूगार पोतडीत रुमाल टाकतो आणि कबूतर बाहेर काढतो, तीच हातचलाखी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केली. शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी एका शिवसैनिकाला बसवण्याची घोषणा केली. परंतु जेव्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची वेळ आली तेव्हा ते स्वत:
सिंहासनावर बसले. ज्या शिवसैनिकाला तख्तावर बसवण्याचे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वचन दिले होते तो शिवसैनिक ते स्वत: आहेत याचा खुलासा लोकांना नंतर झाला.

खरे तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नव्हे दोनदा स्वत:च्या हयातीतच पूर्ण केले होते. मनोहर जोशी आणि नारायण राणे हे कट्टर शिवसैनिकच होते. त्यामुळे उद्धव यांनी शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते वगैरे या दाव्यात तसेही काही तथ्य नव्हते.मात्र आता ते एका महिलेला मुख्यमंत्रीपदावर बसवायला उतावीळ झाले आहेत. ती महिला कोण असेल असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला. अनेकजण अंदाज लावतायत. अनेकजण गालातल्या गालात हसतायत.

गेले अनेक महीने शिउबाठाचा किल्ला लढवणाऱ्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेमुळे मनोमन मनात खूष झाल्या आहेत. हिंदीत यासाठी मन में लड्डू फुटना अशी छान म्हण आहे. असे लड्डू आणखी अनेकांच्या मनात फुटले असणार. ही महिला पक्षातील कि मविआतली. घरातली की घराबाहेरची असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. महिलेला मुख्यमंत्री करण्याच्या घोषणेतही काही हातचलाखी आहे, अशी अनेकांना शंका आहे.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर सामनाच्या संपादक पदाची सूत्र ते संजय राऊत यांच्याकडे सोपवतील अशी अनेकांना वाटत असताना अचानक संपादक पदाची माळ रश्मी ठाकरे यांच्या गळ्यात घातली. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांची लाडकी टॅगलाईन असल्यामुळे उद्या मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरे असा विचार करू शकणार नाही असे कोणी ठामपणे म्हणू शकत नाही.

हे ही वाचा:

वसईत ट्रकचोराला केले जेरबंद

‘सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरे गटात महिलांचे बंड होईल’

मुंबई मेट्रो-३ ने मिळवले हे नवे यश

पूर्वपरवानगी न घेता बांधलेली लिफ्ट कोसळली आणि एक जीव गेला

 

शिउबाठातील प्रति संजय राऊत अर्थात सुषमा अंधारे यांनी महिलांना मुख्यमंत्रीपद म्हटल्यावर सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे आठवल्या. स्वत:च्या पक्षातील मात्र नाव त्यांनी घेतले नाही. मुख्यमंत्री कोणीही झाले तरी आपण शिपाई म्हणून काम करायला तयार असल्याचे विनम्र मत त्यांनी व्यक्त केले. स्वत:च्या योग्यतेबद्दल फार कमी जण इतक्या ठामपणे सांगू शकतात. अंधारे बाईंनी स्वत:ची योग्यता इतकी अचूक ओळखली त्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे. बाई सध्या तमाम बड्या नेत्यांबद्दल अत्यंत आगाऊपणे बोलत असल्या तरी अशा मोक्याच्या क्षणी विनम्र होण्याची हातोटी त्यांना साध्य आहे.
या विषयावर सगळ्यात दमदार प्रतिक्रिया दिली ती अजित पवारांनी. महिला असो वा पुरुष ज्याच्याकडे १४५ जणांचे बहुमत असते तो आपला मुख्यमंत्री करू शकतो. एकीकडे उद्धव ठाकरे मुंगेरीलाल के हसीन सपने बघत असताना अजितदादांची प्रतिक्रिया वास्तवाचे भान असलेली आहे. दोन आकडी संख्या नसताना कायम पंतप्रधान पदाचे स्पप्न पाहणाऱ्या शरद पवारांच्या पुतण्याचा वास्तववाद कौतुकास्पद वाटतो.

१४५ चा तो जादुई आकडा सध्या महाविकास आघाडी सरकारकडे नाही. तो टप्प्यातही नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची चर्चा करतायत. आपल्याला सत्ता मिळवायची आहे, असा दावा करतायत, परंतु मुंबई ठाण्याच्या महापौर पदी कोण बसणार हे ठरवण्याचे बळ आता त्यांच्याकडे उरलेले नाही. भाजपाला गाफील ठेवून एकदा सत्ता मिळवली. आता ती शक्यताही उरलेली नाही. अजित पवार यांनी एका प्रकारे उद्धव ठाकरे यांची हवा काढलेली आहे. महिला मुख्यमंत्र्यांची पुडी ही अजित पवारांचा बाजार उठवण्यासाठी सोडण्यात आली होती असे काहींचे मत आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बसवण्यासाठी एकदा शरद पवारांनी हात दिला आता पवारांच्या कन्येला मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी या वक्तव्यातून दिले आहेत, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परंतु याची शक्यता सुतराम दिसत नाही.

उद्धव ठाकरे हे स्वत: पलिकडे फार फार तर कुटुंबाचा विचार करू शकतात. सामनाचे संपादक पद घराबाहेर जाऊ दिले नाही, ते मुख्यमंत्री पद असं सहजासहजी कोणाला बहाल करतील याची शक्यता शून्य. २५ वर्ष ज्यांच्यासोबत युती केली त्या भाजपाचा मुख्यमंत्री झाला हे उद्धवना सहन झाले नाही. याच भाजपाच्या पाठींब्याने शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री झाले. केंद्रात मंत्री पदे मिळाले. त्यांच्यासोबत पाच वर्षे सत्ते बसूनही द्वेषाने पेटलेले उद्धव ठाकरे सतत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारविरुद्ध काड्या करीत होते. ते कालपरवा ज्यांच्या सोबत दोस्ताना झाला त्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट मोकळी करतील ही शक्यता नाही विनोद आहे.

मुख्यमंत्री पदाची धूसर शक्यता जरी दिसली तरी ते स्वत:चेचे घोडे दामटतील किंवा आदित्यला पुढे करतील. मुख्यमंत्री पदी महिलेलाच बसवण्याची वेळ आली तर सौभाग्यवतींची वर्णी लावतील हे उघडच आहे.महाविकास आघाडीतील पक्ष आपापला मुख्यमंत्री बनवण्यासाठी शड्डू ठोकताना दिसतायत. शिर्डी अधिवेशनात पुढचा मुख्यमंत्री आमचाच अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील या आशावादावर मित्रपक्षानेच पाणी ओतलेले आहे. त्यामुळे पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्याचे ज्यांचे वांदे झालेत ते मुख्यमंत्री पदी कोणाला बसवणार याची चर्चा घडवून लोकांचे मनोरंजन करतायत. मुख्यमंत्री पदाच्या वावड्या महापालिका निवडणुकीपर्यंत सुरू राहतील. एकदाका महापालिकेतून सफाया झाला की सगळ्यांचे पाय जमीनीवर येतील. तोपर्यंत वाट पाहण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version