राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना सरकारला आता एक वर्षांचा काळ पूर्ण झाला. फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्तही जाहीर केला आहे. कालपर्यंत सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान देणाऱ्यांना शिंदे-फडणवीसांनी ती हिंमत दाखवली. शिउबाठातील कुडमुडे ज्योतिषी आता हे सरकार पडणार असे भविष्य वर्तवू लागले आहेत. सतत फसणारी भाकीत करून नवी भाकीतं करत राहण्याचा छंदच शिउबाठाच्या नेत्यांना जडला आहे.
वर्षभरापूर्वी राज्यात सत्तांतर झाले. नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली. परंतु एकेका मंत्र्याकडे इतक्या खात्यांचा भार होता की राज्याचा गाडा सुरळीत आणि सक्षमतेने चालणे कठीण होऊन बसले होते. मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक मुहूर्त सत्तेत सामील असलेल्या नेत्यांनी जाहीर केले, परंतु, प्रत्यक्षात विस्तार काही झाला नाही. अखेर ती वेळ आली. सरकारच्या वर्षपूर्तीच्या दिवशी फडणवीसांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे जाहीर केले. ही घोषणा केल्यानंतर, ‘आता हे सरकार कोसळणार’, असे भाकीत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाल्यापासून आदित्य ठाकरे पुन्हा पुन्हा अशी भाकीतं करतायत. गुरूदेव संजय राऊत यांनी बहुधा आदित्य यांना ही सवय लावली असावी. ‘पंधरा दिवसात सरकार कोसळणार’, ‘फेब्रुवारीनंतर हे सरकार कोसळणार’, ‘हे सरकार आता व्हेंटीलेटरवर…’ अशी अनेक भाकीतं संजय राऊतांनी केली. परंतु प्रत्येक वेळा ते तोंडावर पडले. आदित्य ठाकरे हे राऊतांच्या पावलावर पाऊल टाकत तोंडाळ वक्तव्य करत असतात. सरकार स्थापन झाल्या झाल्या ते म्हणाले होते की, गद्दारांचे सरकार कोसळणार. हे भाकीत ते दर दोन महिन्यांनी करू लागले.
शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांनी याचा पुनरुच्चार केला. ‘सरकार कोसळणार याची खात्री झाल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने अर्थ संकल्पात अनेक आकर्षक घोषणा केल्या आहेत’, अशी खोचक प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल जाहीर केल्यानंतर त्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टा आल्या. या भविष्यवाणीत कुणाला फार रस उरला नाही. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलायला सुरूवात केली. जांबोरी मैदानात झालेल्या निर्धार मेळाव्यात ते म्हणाले की, ‘मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सरकार कोसळणार’. पुढे ही थिअरी त्यांनी अधिक आत्मविश्वासाने मांडायला सुरूवात केली. ‘लिहून घ्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही’, असे ते सांगू लागले. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे फडणवीसांनी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, ही आदित्य यांची भविष्यवाणी खोटी ठरवली आहे. त्यामुळे आता त्यांचे चेले थोडा बदल करून नवे बोल बोलू लागलेत.
वरूण सरदेसाई म्हणालेत ‘शिवसेनेतील आमदार बुटाचे लेस बांधून तयार आहेत.’ शिउबाठामध्ये आदित्य ठाकरे यांचे सल्लागार, त्यांच्याशी अत्यंत घनिष्ट संबंध असलेले राहुल कनाल यांच्यासारखे लोक पक्ष सोडून जाणार, हे ज्यांच्या वेळेत लक्षात येत नाही, ते शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, कोसळेल अशा बोंबा ठोकून कार्यकर्ते आणि समर्थकांच्या टाळ्या घेतायत. म्हणजे स्वत: चा महाल आगीत जळतोय, त्याच महालात बसून हे दुसऱ्याची मजबूत इमारत कोसळणार असे दावे करतायत. मविआची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला होता. ‘हे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. पण माझे भाजपाला आव्हान आहे, हिंमत असेल तर त्यांनी हे सरकार पाडून दाखवावे’, असे जाहीर आव्हान त्यांनी भाजपाला दिले होते. पुढे त्यांचे काय झाले ते महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.
उद्धव ठाकरेंना राज्यात काय चालले आहे याची बित्तंबातमी नसायची, त्यांच्याकडे राजकीय चातुर्याचा अभाव होता, उद्या काय घडेल याचा अंदाज बांधण्याची त्यांच्यात क्षमता नव्हती, असे शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरीत्रात लिहून ठेवले नसते तर जनतेच्या लक्षात आलेच नसते काय? पवार यांनी लोकांना आधीच माहीत असलेली माहिती दिली आहे. राजकीय चातुर्य जर उद्धव यांच्याकडे नसेल तर ते मविआची सत्ता येण्यापूर्वी राजकारणात फारसे सक्रीय नसलेल्या आदित्य यांच्याकडे कुठून येणार?
‘आदित्य ठाकरे बालिश आहेत’, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते. राणे असे म्हणाले नसते तर लोकांनी आदित्यना प्रगल्भ नेता म्हणून कधी पाहिले असते काय? राणेही तेच सांगत होते, जे जनतेला आधीपासूनच माहिती आहे. फक्त कोणी उघडपणे बोलत नव्हते. सत्ता गेल्यानंतर आदित्य ज्या प्रकारे वागतायत, बोलतायत, संजय राऊत यांची री ओढतायत, त्यावरून त्यांचा बालिशपणा लोकांच्या लक्षात आलेलाच आहे.
हे ही वाचा:
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; ‘हे’ मुद्दे अधिवेशनात गाजणार?
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विजेच्या बाबतीत राज्य पुन्हा प्रगतीपथावर
समृद्धी महामार्गावरील अपघातावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
नीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर सरकार कोसळण्याची शक्यता शून्य. कारण उद्धव यांच्या घरबशा कारभाराला कंटाळून पक्ष सोडलेले शिवसेनेचे आमदार पुन्हा त्यांच्याकडे जातील कशाला? जेव्हा उद्धव सतत म्हणतायत की ‘माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही’, अशा परिस्थितीत तर अजिबातच जाणार नाहीत. बहुधा उद्धव यांच्याकडे जे काही आहे, त्यातून त्यांनी मातोश्री २ ची उभारणी केली आहे. त्यातूनही काही उरले तर ते मातोश्री ३ ची तयारी करतील.
एकनाथ शिंदे यांचे तसे नाही. काम करण्याची त्यांची खास स्टाईल आहे, ते रात्री अपरात्री पक्षाच्या नेत्यांना भेटत असतात. कोणी काम आणले तर थेट अधिकाऱ्यांना फोन करून विषय मार्गी लावतात. कधीही उपलब्ध असलेल्या नेत्यांला सोडून कायम घरी बसलेल्या नेत्याकडे लोक जातील कशाला? शरद पवारांनी महाराष्ट्रात १९७८ नंतर २०१९ मध्ये दुसऱ्यांदा चमत्कार करून दाखवला. परंतु प्रत्येक वेळा खंजीर वापरता येत नाही. पवारांचे विरोधक आता सजग झाले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार हे निर्विवाद. आदित्य ठाकरे यांनी स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी सरकार कोसळणार अशी भाकीतं करत राहावी तात्पुरते समाधान करून घ्यावे आणि जेव्हा ही भाकीत पडू लागतील, तेव्हा नवी भाकीतं करावी. राऊतांच्या सानिध्यात राहून आदित्य यांना किमान एवढं तर शिकावच लागेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)