पवार साहेब, ज्या वयातल्या गोष्टी त्याच वयात करायच्या असतात…

पवार हे लढाईचे घोडं नसून वरातीचे घोडं आहे.

पवार साहेब, ज्या वयातल्या गोष्टी त्याच वयात करायच्या असतात…

वय वर्षे ८४ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याची नैतिक जबाबदारी आठवली आहे. आठ दशके उलटल्यानंतर एखाद्याला आय़ुष्याचे लक्ष्य सापडावे, हे आश्चर्यकारक आहे. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात दहा वर्षे मंत्रीपदी असताना पवार असे काय करत होते, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उसंत मिळाली नाही, असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे.

‘ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात’, हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विधान आहे. एका मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी त्यांना सवाल केला की, ‘अलिकडे राजकारणी एकमेकांना डोळे मारत असतात, आपका क्या प्लान है?’ या विनोदी प्रश्नाला राज ठाकरे यांनी तेवढेच मिश्किल उत्तर दिले. ‘त्या वयात राहून गेले असेल म्हणून आता डोळे मारतायत’, असे ते म्हणाले.

आपण ज्या राज्यात राजकारण करतो, त्या राज्याचा किंवा देशाचा चेहरा मोहरा बदलण्याची गर्जना करण्याची एखाद्याला इच्छा होणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु ही आठवण वयाच्या ८४ व्या वर्षी होण्याचे कारण काय असू शकेल? आजवर चेहरा मोहरा बदलण्याची इच्छाच झाली नाही, किंवा झाली होती, परंतु झेपले नाही. किंवा अन्य भानगडी करण्यात वेळ गेला म्हणून आता उतार वयात हे सुचतंय? यातले नेमके काय?

लग्नाचे एक वय असते. ते वय निघून गेल्यानंतरही लोक लग्न करतात. नव्वदीतही लग्न करणारे लोक आहेत, परंतु उपयोग काय? संधी न मिळालेल्या व्यक्तिने वयाच्या ८४ व्या वर्षी ‘चेहरा मोहरा बदलू’ अशी भाषा केली तर ठीक आहे. टॅलेंट होते, परंतु सत्ता नसल्याने ते सिद्ध करता आले नाही, असे म्हणायला वाव आहे. परंतु चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दहा वर्षे केंद्रात मंत्री राहिलेल्या सात वेळा विधानसभेची आणि सात वेळा लोकसभेची निवडणूक लढलेल्या व्यक्तिला ही भाषा शोभत नाही. ‘मी ८४ वर्षांचा आहे, ९० व्या वर्षीही थांबणार नाही’, असे पवार म्हणतायत. त्यांनी शंभराव्या वर्षीही थांबू नये. परंतु सहा दशकांच्या राजकीय कारकीर्दीत पवारांनी नेमकं केले काय याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राला द्यावे लागेल.

राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जे करायला हवे, तेव्हा केले नाही की अशा गोष्टी सुचतात. ३८ व्या वर्षी पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सळसळत्या तारुण्यात त्यांना राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. आज हा आकडा उलटा झाला आहे. सळसळते चैतन्यही उरलेले नाही. उरलाय तो फक्त अभिनिवेश. भविष्याची तरतूद न केलेल्या एखाद्या व्यक्तिला हात-पाय चालेपर्यंत काम करत राहावे लागते, तसा हा प्रकार आहे. आज गेल्या अडीच वर्षांच्या काळात महायुतीच्या सरकारने मेट्रोच्या उद्घाटनाचा धुमधडाका लावला आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, अशी अनेक महत्वाची कामे आज होताना दिसतायत. पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रात प्रदीर्घ काळ मंत्री पदावर होते. महाराष्ट्र त्यांच्यानंतरही त्यांची आठवण काढेल असे एक काम तरी पवारांनी केले आहे का? महाराष्ट्रातील एका आयकॉनिक प्रकल्पाकडे बोट दाखवून, हा पवारांच्या प्रयत्नातून साकारलेला प्रकल्प असे म्हणण्याची परीस्थिती नाही. हे पवारांचे कर्तृत्त्व आहे.

हे ही वाचा:

मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’

भारताला मिळणार ३१ प्रिडेटर ड्रोन; अमेरिकेशी ३२ हजार कोटींचा करार!

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांनी घेतली शपथ!

मदरशांत खरोखरच कुणी डोकावून पाहतंय का?

राजकारणी म्हणून त्यांचा करिष्मा काय होता हेही पाहू. शरद पवारांनी पुलोदची स्थापना केली. निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. परंतु बहुमत मिळाले नाही.१९९० आणि १९९५ मध्ये त्यांनी एकसंध काँग्रेसचे नेतृत्व केले, परंतु त्यांना बहुमत मिळवता आले नाही. प्रत्येक वेळी काही तरी जुगाड करून पवारांनी सत्ता स्थापन केली. १९९९ पासून तर त्यांनी स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला. त्यानंतर सतत काँग्रेसची आघाडी करून त्यांनी सत्ता स्थापन केली.

एका बाजूला जयललिता, ममता यांच्या सारख्या महिला नेत्यांनी आपआपल्या राज्यात स्बवळावर सत्ता स्थापन करण्याचा करिष्मा केला. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा पवारांच्या तुलनेत अनुनभवी असलेल्या नेत्याने दोन वेळा स्वबळावर सत्ता स्थापन केली. तिथे पवार कायम ५०-५५ च्या आसपास घुटमळत राहिले. याचा अर्थ स्पष्ट आहे, पवार हे लढाईचे घोडं नसून वरातीचे घोडं आहे. घरात देखणी बायको असूनही कायम दुसऱ्याच्या बायकोकडे लक्ष्य असलेल्या नवऱ्यासारखे पवारांचे आहे. त्यांच्या हाती जेव्हा सत्ता होती तेव्हा लवासा, आयपीएल, संभाजी ब्रिगेड सारख्या उपद्व्यापात ते रमले. त्यामुळे पदावर असताना त्यांनी जे करणे अपेक्षित होते, ते त्यांना करताच आले नाही. अवघे पाऊणशे वयमान असलेल्याने लग्नाची गाठ बांधायला उभे राहावे आणि पवारांनी ८४ व्या वर्षी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कंबर कसावी यात प्रचंड साम्य आहे. दोन्हीतून महाराष्ट्रासाठी काहीही निष्पन्न होणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version