काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा सिझन-२ सुरू आहे. दरम्यान मराठवाड्याचे तालेवार नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते पुढे काय करतील याचा अंदाज साधारणपणे सर्वांना आहे. देशभरातील दिग्गज नेते इंडी आघाडीतून बाहेर पडतायत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसलाही मोठी गळती लागलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा खुळखुळा वाजवण्यासाठी फक्त शरद पवार आणि ठाकरे उरणार अशी शक्यता आहे. कारण जाता जाता चव्हाण मविआबाबतची खदखद व्यक्त करून गेले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात झाल्यापासून काँग्रेसची स्थिती फुटक्या मडक्यासारखी झालेली आहे. माजी मंत्री मिलिंद देवरा काँग्रेसमधून बाहेर पडले. वांद्र्याचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला. आता अशोक चव्हाण यांनी पक्षाला राम राम ठोकलाय. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे जसे काँग्रेसचे बडे नेते होते, गांधी परिवाराचे निष्ठावान होते तसेच अशोक चव्हाण यांचे पिताश्री शंकरराव यांच्याबाबत म्हणता येईल.
शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रात गृहमंत्री होते. करड्या शिस्तीचे असल्याने त्यांना हेड मास्तर म्हणत. गांधी परिवाराशी अत्यंत घनिष्ट संबंध असलेले लोकही आता पक्षातून बाजूला होत आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या चरणी ज्या नेत्यांनी निष्ठा अर्पण केल्या. त्यांची पुढची पिढी आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नाही. राहुल गांधी काँग्रेसचे काही भले करतील यावर त्यांचा विश्वास उरलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी ४०० पार चा नारा दिला आहेत. भाजपा एकेका मतदार संघाचा विचार करून सोंगट्या टाकते आहे. बिहारमध्ये नीतीश कुमार यांनी भाजपासोबत येऊन इंडी आघाडीचा कार्यक्रम करून टाकला आहे.
उत्तर प्रदेशात असलेल्या १३ टक्के जाट मतदारांना जवळ करण्यासाठी राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांना भाजपाने एनडीएसोबत घेतले. इंडी आघाडीला झटका दिला आणि पश्चिम उत्तर प्रदेशात जिथे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सात जागा गमावल्या होत्या तिथे आपली बाजू मजबूत केली.
अशोक चव्हाणांना सोबत घेऊन भाजपाने मराठवाड्यात आपली स्थिती मजबूत केली. एक तालेवार मराठा नेता आपल्या बाजूला वळवला आहे. नांदेड लोकसभा मतदार संघात आपली बाजू भक्कम केली आहे.
नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापराव चिखलीकर खासदार आहेत. अशोक चव्हाण २०१९ मध्ये इथून पराभूत झाले असले तरी त्यांना ३९ टक्के मतं पडली होती. त्यानंतर ते भोकर विधानसभा मतदार संघातून आमदार झाले.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी यांच्या पेक्षा जास्त धक्का पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लागलेला दिसतो. ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कालपर्यंत मविआच्या बैठकीत अशोक चव्हाण प्रत्येक जागेवरील चर्चेत हिरीरीने भाग घेत होते. प्रत्येक जागेबाबत आपली भूमिका स्पष्ट करत होते. तपशीलवार चर्चा करत होते, आज अचानक काय झाले? असा प्रश्न त्यांना पडलेला आहे.
ठाकरे काय म्हणाले हे बहुधा चव्हाणांच्या कानावर आलेही नसेल परंतु मविआतील जागा वाटपाबाबतच्या नाराजीला त्यांनीही वाट करून दिली आहे. पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण जेव्हा प्रथम मीडियाला समोरे गेले तेव्हा त्यांनी मविआमध्ये जागावाटपाबाबत असलेली खदखद बोलून दाखवली.
मविआमध्ये जागा वाटपाची चर्चा ज्या वेगाने व्हायला हवी तेवढ्या वेगाने होताना दिसत नाही. एवढ एकच वाक्य ते बोलले. जागा वाटपाबाबत काँग्रेस नेते समाधानी नाहीत. जागा वाटपासाठी होणाऱ्या बैठका म्हणजे निव्वळ चर्चेचे गुऱ्हाळ आहे. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांचे एक वाक्यही पुरेसे आहे.
उबाठाचे नेते काल पर्यंत अशोक चव्हाणांसोबत चर्चा करत होते. आज ते त्यांना गद्दार किंवा खोके म्हणणार का? अशोक चव्हाण जाणार याचे संकेत बराच काळ मिळत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी उशीरा पोहोचलेल्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. दिल्लीश्वरांपर्यंत त्यांची तक्रार गेली. नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील नेते निधी मिळत नसल्यामुळे ओरडा करत असताना चव्हाणांना मात्र महायुती सरकारने भरभरून निधी दिला, त्याबाबत बरीच बोंब झाली होती.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे भाजपावर तुटून पडले होते. काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीकेची राळ उडवली होती. परंतु अशोक चव्हाण मात्र तोंड बंद करून बसले होते. कुठे जायचे हे ठरवलेले नाही, दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करू असे चव्हाण यांनी जाहीर केलेले नाही. मीडियासमोर त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकाही केलेली नाही. अशोक चव्हाण यांच्या विरोधात ईडी किंवी आयकर खात्याची कोणतीही चौकशी सुरू नव्हती.
हे ही वाचा:
राष्ट्रीय लोक दलाचा ‘इंडी’ला रामराम; ‘एनडीए’ला देणार साथ
माकड टोपी गँगला अटक; घाटकोपरमधील एका ज्वेलर्सला करणार होते लक्ष्य
अशोक चव्हाण म्हणतात दोन दिवसांत स्पष्ट करणार राजकीय भूमिका
भारतातील उद्योग संघटना एक राष्ट्र, एक निवडणुकीच्या पाठीशी
आदर्श घोटाळ्यात त्यांना २०१७ पूर्वीच सीबीआयने क्लीनचिट दिली होती. आदर्श घोटाळा प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आरोपपत्रात चव्हाण यांचे नाव नव्हते. तरीही चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडली कारण काय असेल? देशात हवा कोणत्या दिशेने वाहते आहे याचा अंदाज चव्हाणांना आला असल्यामुळेच त्यांनी काँग्रेसला नारळ देण्याचा निर्णय़ घेतला हे स्पष्ट आहे.
राहुल गांधी जे स्वत:चे भले करू शकत नाहीत ते काँग्रेसचे भले काय करणार हे त्यांच्याही लक्षात आले असल्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकीने जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हाच आम्ही म्हटले होते की शिवसेना आणि राष्ट्रवादीचा इजा, बिजा झाल्यानंतर आता काँग्रेसचा तिजा होण्याची वेळ आलेली आहे.
२२ जानेवारीनंतर देशात अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. मतदार संघ टिकवायचा असेल तर जय श्रीराम म्हणण्या वाचून पर्याय नाही. काँग्रेसमध्ये राहून जय श्रीराम म्हणणे शक्य नाही, काँग्रेसमध्ये राहून जिंकणे शक्य नाही, त्यामुळे काँग्रेस सोडणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. अशोक चव्हाण यांनी तोच स्वीकारला आहे.
आता त्यांच्यासोबत किती आमदार येतात हा प्रश्न गौण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातासमोर आपण टिकू शकत नाही, याची खात्री आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही झाली आहे. राज्यात नव्या राजकीय भूकंपाची सुरूवात झालेली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)