मधमाशाच्या पोळ्यावर दगड माराल तर याद राखा? येत्या निवडणुकीत दाखवून देऊ असा सणसणीत इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला इशारा दिलेला आहे. मात्र भाजपावाल्यांना प्रश्न पडलाय की पोळं आहे कुठे? सगळ्या मधमाश्या मधाच्या पोळ्यासह उडून गेल्या. आता तर मेण सुद्धा शिल्लक नाही. त्यामुळे ठाकरे नेमकं कोणत्या पोळ्याबद्दल बोलतायत याबाबत तेही गोंधळलेले आहेत.
ठाकरे कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी शाखांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवसैनिकांना डिवचू नका असा इशारा ते भाजपाला देतायत. चांगले असताना तुम्हाल मध मिळाला, आता दगड माराल तर याद राखा, वगैरे वगैरे बोलतायत.
मधमाशा चांगले वातावरण असताना मधाचं वाटप करतात, हे कोणी सांगितले यांना? भविष्याची तरतूद म्हणून मधमाशा राबराबून मध गोळा करतात, तो काय इतरांना वाटायला? हे ठाकरेंना ठाऊक असण्याचे काहीच कारण नाही, कारण त्यांचा कष्टाशी संबंध नसला तरी त्यांनी हा मध चाखण्याचे मात्र काम केले आहे. मधमाश्यांना जेव्हा लक्षात आले की आपल्याकडे फक्त मध जमा करण्याची जबाबदारी आहे, चाखण्याची मुभा मात्र नाही, तेव्हा मधमाश्यांनी सगळं पोळ उचललं आणि दुसऱ्या झाडावर हलवलं. कधी काळी ठाकरेंसाठी मध गोळा करणाऱ्या तमाम मधमाशा आज भाजपासोबत सुखाने नांदतायत. त्याचे खापर ठाकरे भाजपावर फोडताना दिसतात.
मधाचं पोळं आपल्याकडे आहे हा गैरसमज ठाकरेंचे मोठे नुकसान करणारा आहे. कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यात बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना आपलीच शिवसेना आहे याचा पुनरोच्चार विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी केला. गैरसमज किती घट्ट रुजलाय याची झलक दाखवली.
ठाकरे लोकशाही वाचवण्याची भाषा करीत असले तरी त्यांची मानसिकता सरंजामी आहे. कारण ते स्वत:ला लोकशाही संस्थांपेक्षा मोठे समजतात. चार शहाणपणाच्या गोष्टी सांगणाऱ्या शहाण्या माणसाची ठाकरेंना तातडीने गरज आहे. तूर्तास ते कंपाऊंडरकडून सल्ला घेतायत. त्याची कटू फळेही चाखतायत. तरीही ठाकरेंच्या डोक्यात प्रकाश पडताना दिसत नाही.
हे ही वाचा:
मालदीवच्या अध्यक्षांनी तोडले अकलेचे तारे!
‘आरआरआर’ फेम अभिनेता रामचरण राम मंदिरासाठी सपत्निक आमंत्रित
इंडी आघाडीच्या संयोजकपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव
मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह मिळाला
कमरेची लंगोटी निसटली अशी स्थिती झालेली असताना ती सावरायची की दुसऱ्याच्या ढुंगणावर असलेले धोतर फेडण्याचा प्रय़त्न करायचा? लोकशाही व्यवस्थेत ज्यांच्या हातून पक्ष गेला असे ठाकरे पहिले नेते नाहीत. पक्ष गमावणारे किंवा पक्षाने ज्यांना नारळ दिला, अशा नेत्यांची संख्या मोठी आहे. ज्यांच्यात पीळ होता अशा नेत्यांनी दुसरे पक्ष स्थापन केले, बांधणी केली आणि कमबॅक केले. इथे फक्त रडारड आणि टोमणे या पलिकडे काही होताना दिसत नाही.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. शिवसेना ही एकनाथ शिंदेची असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर ठाकरे फक्त टोमणे बार सोडतायत. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंकडे पक्ष नाही. निवडणूक आय़ोगाने मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केलेला आहे. म्हणजे चिन्हाची शाश्वती सुद्धा नाही.
इंदिरा गांधी यांनी मूळ काँग्रेस पक्षातून फारकत घेऊन काँग्रेस(आय) ची स्थापना केली. पुढे याच पक्षाला मूळ काँग्रेस अशी ओळख मिळाल्यानंतर त्याचे नामकरण इंडियन नॅशनल काँग्रेस असे करण्यात आले. इंदिरा गांधी कधी माझ्या बापाचा पक्ष चोरला अशी ओरड केली नाही, की रडारड केली नाही.
शरद पवारांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून आधी काँग्रेस(यू), नंतर काँग्रेस(एस) ची स्थापना केली. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. वायएस आर रेड्डी यांच्या निधनानंतर जगमोहन रेड्डी यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. बाहेर येऊन त्यांनी उमेदीने वायएसआऱ काँग्रेसची स्थापना केली. आज ते सत्तेवर आहेत. पित्याच्या निधनानंतर चिराग पासवान यांच्या हातून पक्ष निसटल्यानंतर त्यांनीही नव्याने सुरूवात केली. परंतु या नेत्यांमध्ये आणि ठाकरेंमध्ये एक मोठा फरक आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारत ठाकरेंनी राजकारणाची सुरूवात केली. नवा पक्ष स्थापन करण्यासाठी कष्ट करण्याची ना त्यांच्यात क्षमता आहे, ना तयारी. आपण ठाकरे आहोत त्यामुळे लोक कायम आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतील या गैरसमजातून ते बाहेर यायला तयार नाहीत.
पक्ष बांधणी, नोंदणी सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी ठाकरे करताना दिसतात. सोमनाथचे उद्घाटन देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केले होते, म्हणून राम मंदीराचे उद्घाटनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करायला हवे, अशी मागणी ठाकरे करतात. मुळात जवाहरलाल नेहरु यांना सोमनाथच्या जीर्णोद्धार सोहळ्याला जाण्याची इच्छा नव्हती म्हणून राजेंद्र प्रसाद तिथे गेले हे ठाकरेंना माहीत नाही काय? ते राष्ट्रपतींना काळाराम मंदिरात आऱतीला बोलवण्याचा घाट घालयायत. खरं तर ठाकरेंची परीस्थिती इतकी वाईट आहे, की त्यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती भवनचा पीआरओ सुद्धा काळाराम मंदीरात येणार नाही.
महामहीम राष्ट्रपतींना त्यांचा मान त्यांना मिळतो आहे. प्रजासत्ताक दिनी सेनादलाच्या सर्वोच्च प्रमुख म्हणून त्या कर्तव्यपथावर तिन्ही सेनादलांची सलामी घेणार आहेत. हा बहुमान त्यांना मोदी नेतृत्व करीत असलेल्या केंद्र सरकारमुळे मिळालेला आहे. ठाकरेंनी त्यांच्या मानाची काळजी न करता मधाचं एखादं नवं पोळ निर्माण कसं होईल याची चिंता करावी.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)