महायुतीचे विसर्जन, पुनर्रचना की मजबुतीकरण?

२८८ जागा आणि पाच वाटेकरी. त्यात मनसेचा समावेश झाला तर सहा पक्ष. भाजपाच्या वाट्याला काय?

महायुतीचे विसर्जन, पुनर्रचना की मजबुतीकरण?

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर चर्चा आता महायुतीच्या उपयुक्ततेवर होते आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आहेत. महाराष्ट्रातील तीन मोठे पक्ष एकत्र आले असतानाही महायुतीला दारुण अपयश आले. भाजपाच्या जागा कमी झाल्या, अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात फज्जा उडाला. अजित पवार भविष्यात महायुतीत राहतील का? राज ठाकरे यांची महायुतीत एण्ट्री होईल का? या दोन प्रश्नांची सध्या चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा विचार केला तर मविआला एकूण १५० मतदार संघात लीड आहे, अस दावा मीडिया करतोय, तर संजय राऊतांनी १२५ मतदार संघात लीड असल्याचे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा पॅटर्न आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील पॅटर्न सारखा असेल याची सुतराम शक्यता नाही. अन्यथा लोकसभेत भाजपाला भरभरून यश देणारे दिल्लीतील मतदार विधानसभेत आम आदमी पार्टीकडे वळताना दिसले नसते.

भाजपाने एके काळी शत प्रतिशत भाजपाची घोषणा दिली होती. आज परिस्थिती अशी आहे की शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांसोबत भाजपाची युती आहे. रासपा, आरपीआय हे दोन अन्य पक्षही भाजपासोबत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठींबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकी दरम्यान मनसे आणि शिवसेना हा फेव्हीकॉलचा मजबूत जोड आहे… असे विधान श्रीकांत शिंदे यांनी केले होते, तेव्हा पुढच्या वेळी फेव्हीकॉल फक्त बाहेरुन लावू नका, असे राज ठाकरे म्हणाले होते. विनोदाचा भाग बाजूला ठेवून विचार केला तर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा समावेश करायचा झाल्यास त्यांना जागाचा वाटा द्यावा लागेल. २८८ जागा आणि पाच वाटेकरी. त्यात मनसेचा समावेश झाला तर सहा पक्ष. त्यात भाजपाच्या वाट्याला काय आणि किती येणार?

अजित पवारांच्या समावेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मत काही प्रमाणात तरी महायुतीच्या वाट्याला येतील असे वाटत होते. परंतु राजकारणातील गणितं वेगळी असतात. तिथे दोन अधिक दोन चार होत नाही. लोकसभा निवडणुकीने हे स्पष्ट केले आहे. अजित पवार आणि शरद पवारांचे काही संगनमत होते का ? अशी कुजबुज काही लोक करतायत. त्यात तथ्य वाटत नाही. अजित पवारांवर शंभर आक्षेप घेता येतील पण गद्दारीचा आक्षेप घेता येणार नाही. ते कमी पडले असतील, मत खेचण्यात त्यांना अपयश आले असेल, परंतु त्यांनी शरद पवारांसोबत हातमिळवणी करून काही राजकारण केले हे अशक्य आहे.

हे ही वाचा:

मै नरेंद्र दामोदरदास मोदी… ९ जून रोजी सायंकाळी तिसऱ्यांदा गुंजणार आवाज!

रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार

युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये केला विश्वविक्रम

अजितदादांचा स्वभाव अत्यंत रोखठोक आहे. अवघी राजकीय हयात थोरल्या पवारांच्या सोबत काढून त्यांचे अनेक गुण अजित पवारांनी घेतले नाहीत. त्यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. कधी अशाप्रकारच्या राजकारणाला हवाही दिली नाही. माणूस शब्दाचा पक्का आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांचा हात भाजपाला घट्ट धरून ठेवावा लागेल. या निवडणुकीत अजितदादांनी बारामतीतून त्यांच्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. घरातला माणूस त्यांनी लढायला उतरवला. जय-पराजय हा नंतरचा विषय, परंतु बारामतीत चुरशीची लढत झाली नाही, असे कोण म्हणू शकेल?

महायुतीत जे मित्र पक्ष आहेत, त्यांना त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर त्याची माती होईल. लोकसभेने हा धडा दिलेलाच आहे. आघाडी असताना मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते हे इंडी आघाडीने दाखवलेले आहे. प.बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल जीवाच्या आकांताने एकमेकांशी लढले. निकाल जाहीर झाल्यावर ममता बॅनर्जी पुन्हा इंडी आघाडीत दाखल झाल्या. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येही लढत झाली. निवडणुकीनंतर एकत्र आले.जे काँग्रेस प्रणीत आघाडीत होऊ शकते तर महायुतीत का होऊ शकत नाही? अजित पवारांना कदाचित वेगळे लढण्याचा फायदा होऊ शकतो.

प्रत्येक निवडणुकीच्या आधी काही कंपन्यांकडून सर्व्हे करून घ्यायचे फॅड भाजपामध्ये गेल्या काही वर्षात भारी बळावले आहे. त्याचा काडीचाही फायदा होत नाही, हे या निवडणुकीमुळे भाजपाच्या लक्षातही आले असेल. त्यामुळे पोटभरु कंपन्यांच्या नादी न लागता, कार्यकर्त्यांकडून आलेल्या ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावरच निर्णय व्हावेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version