सेव्ह गाझा वाले सक्रीय झाले…

जितेंद्र आव्हाड शांत आहेत, परंतु शिउबाठाचे प्रवक्ते संजय राऊत पॅलेस्टाईनसाठी मैदानात उतरले

सेव्ह गाझा वाले सक्रीय झाले…

इस्त्रायल- पॅलेस्टाईन प्रश्नाकडे पाहताना अल्पसंख्यांक मतांच्या दृष्टीकोनातून पाहण्याची खोड भारतातील अनेक राजकीय पक्षांना आहे. शिल्लक राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एरव्हीही सेव्ह गाझाचे टी-शर्ट घालून फिरत असतात. अनेकांनी आता गळ्यात सेव्ह-गाझाच्या पाट्या घातल्या आहेत. गाझापट्टीतून हमासने ईस्त्रायलवर पाच हजारावर क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यानंतरही हे घडते आहे, हे विशेष.

 

इस्त्रायली जनता योम किप्पूरचा सण साजरा करीत असताना शनिवारी पहाटे या हल्ल्याला सुरूवात झाली. ५० वर्षांपूर्वी इजिप्त आणि सिरीयाने याच दिवशी हल्ला केला होता. हमासचा हल्ला इतका तीव्र होता की इस्त्रायलची अभेद्य मानली जाणारी आर्यन डोम यंत्रणा कोसळली. क्षेपण्णास्त्रांमुळे तेल-अवीव, जेरुसलेमसारख्या शहरांतील इमारतींचे ढीगाऱ्यात रुपांतर झाले. हमासच्या दहशतवाद्यांनी ईस्त्रायलमध्ये शिरून शेकडोजणांनी बंधक बनवले त्यात महिला, लहान मुले, विदेशी नागरीक आणि इस्त्रायली सैनिकांचाही समावेश होता.

 

कुरापत कोणी काढली हे स्पष्ट आहे तरीही इस्त्रायलच्या विरोधात पॅलेस्टाईनचे समर्थन केले जाते आहे. जितेंद्र आव्हाड शांत आहेत, परंतु या वेळी शिउबाठाचे प्रवक्ते संजय राऊत पॅलेस्टाईनसाठी मैदानात उतरले आहेत. इंडी आघाडीतील मेहबुबा मुफ्ती यांनी पॅलेस्टाईनला दिलेल्या पाठिंब्यावरून राऊतांना प्रश्न विचारला. उत्तर देताना अलिकडे राऊत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दाखले देत नाहीत. त्यांना जवाहरलाल नेहरु, इंदीरा गांधी, राजीव गांधी आठवतात. हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे. कधी काळी हिंदुत्वाचा बुलंद आवाज असलेला हा पक्ष सध्या काँग्रेसची धुणीभांडी करताना पाहून दु:ख होते.

 

 

पॅलेस्टाईनच्या निर्मितीला भारताने कसा पाठिंबा दिला होता. यासर अराफत हे इंदिरा गांधींना कसे राखी बांधायचे, इंदिराजींच्या मृत्यूनंतर ते दिल्लीत येऊन कसे रडले होते, याची आठवण त्यांनी पत्रकारांना करून दिले. पॅलेस्टाईनच्या संदर्भात देशाचे धोरण काय होते, हे आपल्याला विसरता कामा नये असे वक्तव्य केले.
शरद पवारांच्या तालमीत महाराष्ट्रात दोन असे इतिहासकार झाले आहे, ज्यांचे वर्णन इतिहासाचार्य खाजवाडे असे करता येईल. यांना जागतिक इतिहासाचा ओ की ठो माहीत नसतो तरी ते इतक्या विश्वासाने सांगतात की समोरच्याला शंकाही येऊ नये.

 

 

यासर अराफात आणि इंदिरा गांधी यांच्या बहीण भावाच्या नात्यावर बोलणाऱ्या राऊतांना हेही माहीती नाही की यासर अराफात यांच्या पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन या दहशतवादी संघटनेने १९९३ मध्ये इस्त्रायलशी वाद मिटवण्यासाठी ओस्लो करार केला होता. हा करार अमेरिकेच्या मध्यस्थीने झाला होता. इस्त्रायलने ताब्यात घेतलेली गाझा पट्टी आणि वेस्ट बॅंक हा परिसर इस्त्रायलने परत द्यावा. पीएलओने दहशतीचा मार्ग सोडून राजकीय पक्ष म्हणून पॅलेस्टाईनमध्ये निवडणुकीत सहभाग घ्यावा ही त्यातील महत्वाची कलमे होती. यासर अराफात यांनी इस्त्रायलशी हात मिळवणी केली होती. त्यांनी त्यांच्या संघटनेचे नाव पॅलेस्टाईन अथॉरीटी असे करून घेतले होते.

 

 

इस्त्रायलवर जे ताजे हल्ले झालेले आहेत, त्यात यासर अराफात यांच्या संघटनेची कोणतीही भूमिका नाही. हे हल्ले त्यांच्या संघटेनेचे प्रतिस्पर्धी असलेल्या हमासने घडवलेले आहेत. त्यामुळे अराफात इंदिराजींच्या मृत्यूनंतर दिल्लीत येऊन कसे रडले होते किंवा इंदिराजी त्यांना राखी कशा बांधायच्या ही उदाहरणे अगदीच वाया गेलेली आहेत. देशातील काही राजकीय पक्ष कायम अल्पसंख्यकांची मते कशी मिळतील या संधीच्या शोधात असतात. त्यामुळे समर्थन कोणाचे करायचे हे आधीच ठरलेले असते. चूक कोणाची हा प्रश्न गौण असतो. हिंदुत्वाला झोडायचे आणि अल्पसंख्यांकांचा कट्टरतावाद कुरवाळायचा ही काँग्रेसची नीती आहे. काँग्रेसची इको सिस्टीम, त्यांनी चीनचे पैसे फेकून पोसलेले पत्रकार ही भूमिका डोक्यावर घेत असतात.

हे ही वाचा:

भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या ‘डी’ गँगपर्यंत

परळीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी आता २८६ कोटी रुपये मिळणार!

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रिपदाची शक्यता!

इस्त्रायल- पॅलेस्टिन संघर्षामध्ये अमेरिका इस्रायलच्या बाजूने मैदानात

 

काँग्रेस प्रणित इंडी आघाडीतील नेते पॅलेस्टाईन अर्थात हमासच्या बाजूने भूमिका घेतील हे अपेक्षितच होते. त्याची दोन कारणे आहेत. एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखादी भूमिका घेतली तर त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची हे काँग्रेसचे धोरण आहे, दुसरे म्हणजे हल्ला इस्त्रायलवर झाला आहे म्हणून त्यांना पाठिंबा देऊन काय कट्टरवाद्यांची मत मिळणार नाही. त्यामुळे शेकडोंचे बळी घेणाऱ्या हमासची तळी उचलली जाते आहे.

 

 

स्वरा भास्कर हीने सुद्धा पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. नमाजवादी पक्षाचा नेता असलेल्या नवऱ्याला खूष करण्यासाठी ही भूमिका घेतली असण्याची शक्यता जास्त आहे. ‘अग्रलेख मागे’ फेम संपादकांना हमासच्या हल्ल्यात बळी गेलेल्या दुर्दैवी लोकांबाबत हळहळ व्यक्त करण्यापेक्षा बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यावर गरळ ओकणे जास्त महत्वाचे वाटते. भ्रष्टाचारी, युद्धखोर नेत्यान्याहू यांची मिजास उतरवली, अभेद्य सुरक्षा यंत्रणेचा इस्त्रायलचा दावा फोल ठरला म्हणून त्यांना कोण आनंद झालेला दिसतो. देशाची सुरक्षा हा विषय दुसऱ्याचे लेख उचलण्या इतका सोपा नसतो हे त्यांना कोण सांगणार? पंतप्रधान मोदींनी इस्त्रायलला पाठिंबा दिला, त्यामुळे मोदी व्देषाने पछाडलेले इस्त्रायलच्या विरोधात तडतडणारच.

 

शरद पवार सध्या पक्ष सांभाळण्याच्या गडबडीत असल्यामुळे बहुधा त्यांना पॅलेस्टाईनची बाजू घ्यायला वेळ मिळालेला दिसत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी अजूनपर्यंत तरी सेव्ह गाझाचे टी-शर्ट घालून एक्सवर पोस्ट केलेला नाही. परंतु त्यांचा पाठिंबा पॅलेस्टाईनला आहेच, हे लोकांनी गृहीत धरलेले आहे. कारण त्याशिवाय त्यांना मुंब्र्याची मतं मिळणार नाहीत. अलिगड मुस्लीम युनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला आहे.

 

 

 

अर्थात इस्त्रायलचे बुलंद इरादे कोणाच्या विरोधामुळे डळमळण्या इतके कमकुवत नाहीत. हमासच्या हल्ल्यांचे इस्त्रायलने त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यायला सुरूवात केलेली आहे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटनांनी किंवा शेजारी अरब राष्ट्रांनी इस्त्रायलची खोड काढली तेव्हा तेव्हा इस्त्रायलच्या सीमा वाढल्या आहेत. इस्त्रायल भारताचा मित्र आहे. भारत इस्त्रायलसोबत ठामपणे उभा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version