भाजपाचा विजय आणि उबाठाचे ढोलताशे

काँग्रेस हरल्याचा उबाठा शिवसेनेला आनंद झाला आहे, हा आनंद ते फक्त व्यक्त करीत नाहीत एवढेच

भाजपाचा विजय आणि उबाठाचे ढोलताशे

हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांचे लक्ष महाराष्ट्रातील मविआ नेत्यांच्या विशेषत: उबाठा शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे होते. संध्याकाळच्या सुमारास खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया आली. अनेकांना वाटले होते की, बाई ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करतील. प्रत्यक्षात त्यांनी भाजपाचे अभिनंदन केले आणि काँग्रेसवर टीका केली. संजय राऊतांनीही तेच केले. दुसऱ्या दिवशी ‘सामना’मध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला त्यातही काँग्रेसची खरडपट्टी काढण्यात आली आहे. एका बाजूला काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएमचे तुणतुणे वाजवायला सुरूवात केलेली असताना उबाठा शिवसेनेचे नेते त्यांच्या सुरात सूर न मिसळता वेगळीच तान छेडतायत असे चित्र पाहायला मिळाले.

मविआमध्ये सर्व काही आलबेल नाही. मुख्यमंत्रीपदावरून राडे सुरू आहेत ही बाब सर्वश्रुत आहे, यात कोणतेही गुपित राहिलेले नाही. परंतु विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेस एकास एक लढतीत नेहमीच कमी पडते, अशी टीका चतुर्वेदी यांनी करणे ही बाब सरळसोपी नाही. जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.

‘हरियाणामध्ये अँटी इन्कम्बन्सी असताना भाजपा सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याबद्दल भाजपाचे अभिनंदन करायला हवे, काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपली रणनीती तपासण्याची गरज आहे. जेव्हा एकास एक लढत होते तेव्हा काँग्रेस नेहमीच कमजोर पडते’, असे विधान जेव्हा चतुर्वेदी करतात तेव्हा राहुल गांधी यांच्या मनाला काय इंगळ्या डसत असतील याचा विचार केलेला बरा. संजय राऊत त्याच्या चार पावले पुढे गेले. संजय राऊतांची विधाने कायम भाजपाविरोधात असतात. भाजपा नेत्यांवर विखारी टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये ते आघाडीवर असतात. त्यांनीही भाजपाला बाजूला ठेवून काँग्रेसला लक्ष्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हे ही वाचा:

दुर्गाष्टमीचा पूजापाठ पोलिसांनी घरात घुसून केला बंद, स्थानिकांकडून संताप!

संजय राऊतांनी काँग्रेसला काढले चिमटे, हरियाणातील पराभवावर टीका

‘हरियाणा जिंकले, आता महाराष्ट्र जिंकायचाय’

अनंतनागमधून अपहरण झालेल्या जवानाचा मृतदेह सापडला

‘भाजपाने निवडणूक चांगल्या प्रकारे लढवून हरलेली बाजी जिंकली. काँग्रेसला वाटत होते की, ते एकट्याच्या बळावर निवडणूक जिंकतील, त्यांनी समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आदी पक्षांना काही जागा दिल्या असत्या तर कदाचित त्यांना विजय मिळाला असता.’

एका पक्षाचे नेते जेव्हा एखाद्या मोठ्या घटनेवर प्रतिक्रिया देतात तेव्हा त्यांच्यात ताळमेळ असतो. त्यांनी आपसांत चर्चा करून लाईन ठरवलेली असते. चतुर्वेदी आणि राऊत यांच्या प्रतिक्रियांमध्ये ती लाईन स्पष्ट दिसते आहे. दोघांनी महाराष्ट्रात नंबर वन प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाचे कौतुक केले आहे. काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांना मिर्च्या झोंबाव्यात, अशा या प्रतिक्रिया आहेत.

हरियाणाचा विजय महाराष्ट्रात काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्याची झलक चतुर्वेदी-राऊत यांनी दिलेली आहे. जागा वाटपाच्या वाटाघाटीच्या मुद्द्यावर, अडगळीत पडलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर उबाठा शिवसेना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हा जनतेच्या मनातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे, असे सांगून सांगून राऊत थकले, परंतु काँग्रेसला लोकसभा निवडणुकीची झिंग एवढी होती की, त्यांनी साफ दुर्लक्ष केले होते. हा खुन्नस राऊत आणि मंडळी योग्य वेळ काढतायत.

काँग्रेसला जेव्हा सत्ता येण्याची खात्री असते तेव्हा मित्र पक्षांना फार किंमत दिली जात नाही. इंडी आघाडीच्या स्थापनेची पहिली बैठक झाल्यानंतर पुढे अनेक महिने काहीच घडले नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, अरुणाचल या पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपर्यंत काँग्रेसने मित्रपक्षांना टांगून ठेवले. इंडी आघाडीची एकही बैठक या काळात झाली नाही. या राज्यात चांगले यश मिळाले तर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची पंतप्रधान पदावर दावेदारी मजबूत होईल, असा हिशोब यामागे होता. प्रत्यक्षात या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या हाताला फारसे काही लागले नाही.

हरियाणाबाबत काँग्रेसला असाच अतिआत्मविश्वास होता. काँग्रेसची दलाली करणारे योगेंद्र यादव यांच्यासारखे नेते, प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यासारखे लोक भाजपाला जेमतेम दोन आकडी संख्या गाठता येईल, अशा प्रकारची मुक्ताफळे उधळत होती. ही हवा काँग्रेसच्या इतकी डोक्यात गेली होती की, आम आदमी पार्टीला काही जागा सोडाव्या असे काँग्रेसला वाटले नाही. केजरीवालांच्या पक्षाने काँग्रेसचे किती नुकसान केले हे आज उद्यापर्यंत स्पष्ट होईलच. महाराष्ट्रात आपला केजरीवाल होऊ नये म्हणून उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसचा पराभव झाल्या झाल्या नखे बाहेर काढली आहेत.

काँग्रेस हरल्याचा उबाठा शिवसेनेला आनंद झाला आहे, हा आनंद ते फक्त व्यक्त करीत नाहीत एवढेच. काँग्रेसला फटकारून राऊत-चतुर्वेदी यांनी दुधाची तहान ताकावर भागवली एवढेच. काँग्रेस पराभवानंतर एकाकी दिसते. काल पासून काँग्रेसचे नेते जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएमच्या नावाने बोंबा ठोकायला सुरूवात केली. परंतु उबाठा शिवसेनेचे नेते या नरेटीव्ह पासून चार पावले लांब उभे आहेत. एकही नेता ईव्हीएमबाबत बोलत नाही. ही बाब बोलकी आहे. हरियाणातील पराभवाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहे. मविआमध्ये सुरू असलेली ही नुरा कुस्ती भाजपाच्या नेत्यांना सुखावणारी आहे. या पराभवाने महाराष्ट्रातील वातावरण आणि समीकरण दोन्ही बदलण्याची शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version