मातोश्रीचे भागीदार, माफीचे साक्षीदार बनतील का?

चहल तपास यंत्रणांना सहकार्य का करत नव्हते याचा उलगडा आता होईल

मातोश्रीचे भागीदार, माफीचे साक्षीदार बनतील का?

नाकापर्यंत पाणी गेले की माकडीण पिल्लाला पायाखाली घेते असे म्हणतात. इक्बाल सिंह चहल यांच्याकडे आता हाच पर्याय शिल्लक आहे. कोविड सेंटर घोटाळाप्रकरणात त्यांना ईडीची नोटीस आली आहे. महामारीच्या संकटात कोविडग्रस्त आणि मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणी ओरपले याचा हिशोब आता चहल यांना द्यावा लागणार आहे.

लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हीसेस या कंपनीला कोविड सेंटरचे काम देण्यात आले. कोणताही अनुभव नसताना साधी नोंदणी नसलेल्या या कंपनीला हे कंत्राट मिळाले. त्यामुळे कोविडग्रस्तांच्या जीवाशी खेळ झालाच शिवाय महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लागला. याप्रकरणी पोलिस, आय़कर विभाग, कॅग, कॉर्पोरेट अफेअर मंत्रालय आदींकडून वारंवार मागणी करून देखील चहल सहकार्य करीत नव्हते असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

चहल यांनी कोविड काळात माध्यमांमध्ये स्वत:चे भरभरून कौतुक करून घेतले. तमाम मीडियाला ते मुलाखती देत सुटले होते. स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते बेस्ट महापालिका आय़ुक्त बनले होते. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील कोविड मृत्यूदर केवळ देशाच्या नव्हे तर जगाच्या तुलनेत सर्वाधिक होता. शिवसेना नेत्यांशी संबंधित बोगस कंपन्यांना पात्रता आणि अनुभव नसताना कोविड सेंटरची कामे वाटण्यात आली. भाजपा आमदार अमित साटम यांनी विधी मंडळ अधिवेशनात पालिका आयुक्तांवर थेट भ्रष्ट आणि अकार्यक्षम असण्याचे आरोप केले आहेत. चहल महापालिकेत भ्रष्टाचारी गँग चालवतायत, प्रत्येक टेंडरमध्ये त्यांची टक्केवारी आहे. महापालिकेतही सचिन वाझे आहेत, असा आरोप साटम यांनी केला होता.

अर्थ स्पष्ट आहे, कोविडच्या काळात मुंबईत मृत्यूचे तांडव सुरू असताना टक्केवारीचा धंदाही तेजीत होता. महापालिका आय़ुक्त या धंद्यातील भागीदार होते. टक्केवारीचा एक वाटा त्यांच्याकडेही जात होता, असा भाजपा नेत्यांचा आरोप आहे. जेव्हा कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात एफआय़आर दाखल करण्यात आला. तेव्हा या प्रकरणाची माहिती चहल तपास यंत्रणांना का देत नव्हते. त्यांना सहकार्य का करीत नव्हते, याचा उलगडा आता ईडीच्या चौकशीत होऊ शकेल.

हे ही वाचा:

टेम्पो दरीत उलटून ४० मजूर जखमी

मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना समन्स

शिवसेनेच्या चिन्हाचा धनुष्य बाण कुणाच्या भात्यात ?

भारत जोडो यात्रेत खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन

जेव्हा चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते. त्याच काळात अमित साटम यांनी एक ट्वीट केला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा एका सनदी अधिकाऱ्यावर निशाणा साधला आहे. खरं तर साटम यांनी घातलेले हे कोडं आहे. जे सुटणे मुंबईकरांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.

एक अधिकारी जो वर्षाला ४० लाखांचे कपडे शिवतो. मध्य मुंबईतील एका भव्य मॉलचा मालक जो एक प्रख्यात बिल्डर आहे तो हे पैसे खर्च करतो. या अधिकाऱ्याची अमेरिकेतही प्रचंड मोठी गुंतवणूक आहे. हा अधिकारी नुकताच अमेरिका भेटीवर गेला होता. ही भेट खासगी होती. तिथल्या जवळच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी होती. तिथेच एका शीख हॉटेल व्यवसायिक दिग्गजाला भेटला. ही भेट अर्थातच भारतात कमावलेल्या पैशांच्या गुंतवणुकीच्या संदर्भातील होती. साटम यांचा ट्वीट सुचक आहे. परंतु त्यात कोणाचेही नाव नाही. पण तर्क करणे फार कठीण नाही. म्हणजे पूर्वीची पॉर्नस्टार, सध्याची बॉलिवूड नायिका, असे म्हणायचे. परंतु सनी लिऑनीचे नाव घ्याचे नाही, असा प्रकार साटम यांनी केला आहे. अशी कोडी उलगडणे शेंबड्या पोरालाही शक्य आहे. आपले कोडे शेंबड्या पोरालाही उलगडता यावे, हा साटम यांचा हेतूही असावा. परंतु हे एकमेव कोडे नाही. साटम यांना अशी कोडी घालण्याचा छंद असावा. जनतेच्या मेंदूला ताण देऊन तो अधिक तल्लख करण्याचे हे साटम यांचे प्रयत्न स्तूत्य आहेत.

महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पैसा ज्यांच्यामार्फत फिरवला जातो त्यांची नावेही अशाच कोड वर्डमध्ये त्यांनी सांगितली आहे. वांद्र्याचा एसबी, जुहूचा एपी आणि पुण्याचा एबी, अशी नावे त्यांनी उघड केली आहेत. एबी म्हणजे लोकांना अमिताभ बच्चन माहीत आहे. आता पुण्याचा अमिताभ बच्चन कोण हे पुणेकरांना विचारायला हवे. गुप्तचर संस्थांकडे अशाप्रकारची सांकेतिक भाषा उलगडण्यासाठी क्रीप्टोलॉजी तज्ज्ञ असतात. साटम यांनी मात्र ही जबाबादारी थेट मुंबईकर यांच्यावर सोपवली आहे.

आता पुन्हा येऊया चहल यांच्या प्रकरणाकडे. कोविडच्या काळात सगळं जग ठप्प असताना भ्रष्टाचाराचे दुकान मात्र तेजीत होते. याच काळात मंत्री महोदय अस्लम शेख यांनी गोराईतील मोकळ्या जागेवर ५० स्टुडीओ ठोकले होते. याच काळात कोविडसाठी तीन हजार कोटी खर्च झाले. त्याच प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. चहल त्या भ्रष्टाचाराचे साक्षीदार आहेत. आता ते यात सहभागी आहेत की नाही, हे चौकशी अंती कळेलच. कोविडच्या काळात लोणी ओरपणारे बोके आता, तुरुंगाच्या वाटेवर आहेत. चहल यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होतील का. इतरांसोबत ते येत्या काळात गजाआड जातील का, अशा अनेक गोष्टी उघड होतीलच. त्यासाठी थोडे थांबावे लागेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version