सी-व्होटरच्या ताज्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला लोकसभेत घसघशीत जागा मिळणार असे भाकीत करण्यात आले आहे. २०२३ या वर्षातील हा अखेरचा सर्व्हे. अलिकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला घसघशीत यश मिळालेले असताना महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीची सरशी होणार असे यात म्हटले आहे. या सर्व्हेमुळे शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची परीस्थिती मन में लड्डू फुटा… अशी झालेली आहे.
सर्व्हेचे आकडे ३ ते ५ टक्के अधिक-उणे होऊ शकतात या तळटीपेमुळे मुळात या आकड्यांना काहीच अर्थ उरत नाही. कारण निवडणुकीच्या राजकारणात जिथे एक टक्का मतांमुळे सत्ता इकडची तिकडे होऊ शकते तिथे पाच टक्क्यांच्या फरकाने या सर्व्हेला किती अर्थ उरेल याची कल्पना करा. मविआला २६ ते २८, महायुतीला १९ ते २० आणि इतरांना दोन जागा हा सर्व्हे देतो. मविआतील तीन पैकी दोन पक्षांमध्ये उभी फूट पडलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुसंख्य नेते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत नाहीत. हा आकडा दोन तृतीयांश पेक्षा जास्त आहे. उरलेल्यांपैकी बरेच उडी मारण्याच्या तयारीत आहेत. अशा परीस्थितीत हे आकडे आले कुठून असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २३, शिवसेनेला १८, राष्ट्रवादीला चार, एमआयएम , काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी एक अशा जागा मिळाल्या होत्या. भाजपाला २७.८४ टक्के, शिवसेनेला २३.५ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला १५.६६ टक्के आणि काँग्रेसला१६.४१ टक्के मतं मिळाली होती. म्हणजे साधारणपणे युतीला ५१ टक्के आणि आघाडीला ३२ टक्के मतं
मिळाली होती. ताज्या सर्व्हेनुसार महायुतीला ३७ टक्के, मविआला ४१ टक्के आणि इतरांना २२ टक्के मत मिळतील.
वर्तवलेल्या अंदाजात ३ ते ५ टक्के अधिक- उणे होऊ शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. महायुतीच्या टक्क्यांची आकडेवारी ३७ वरून ४२ किंवा ३२ होऊ शकते. मविआची आकडेवारीही ४१ वरून ३६ किंवा ४६ होऊ शकते. आकडे जर इतके बदलले तर व्यक्त केलेल्या अंदाजाच्या ठिकऱ्या उडतील. हा प्रश्न निर्माण होण्याची ठोस कारणे आहेत.
सर्व्हेसाठी उत्तर प्रदेश, बिहार, प.बंगाल, पंजाब या पाच राज्यातील दोन लाख मतदारांशी संपर्क करण्यात आलेला आहे. या पाच राज्यात लोकसभेच्या २२३ जागा आहे. मुळात पाच राज्यात दोन लाख मतदार हा अत्यंत फुटकळ आकडा आहे. महाराष्ट्रात ४० हजारांपेक्षा कमी लोकांशी बोलून हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालापूर्वी जाहीर झालेल्या सर्व्हेचे अंदाज कसे तोंडावर पडले हा अनुभव ताजा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान असो वा छत्तीसगढ, प्रत्येक ठिकाणी भलतेच आकडे समोर आले. छत्तीसगढ बाबत तर सर्व्हेवाल्यांनी काँग्रेसला बहाल केला होता.
आताच्या सर्व्हेमध्येही अनेक अतर्क्य बाबी आहेत. देशभरात मोदी लाट आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र ही लाट आटलेली दिसते. कोरोनाच्या काळात घरी बसलेले उद्धव ठाकरे हे बेश्ट सीएम ठरले तसा काहीसा हा प्रकार आहे.
महाराष्ट्रात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबाबत ३८ टक्के लोक अत्यंत संतुष्ट, ३३ टक्के तुलनेने कमी पण संतुष्ट आणि २६ टक्के लोक असंतुष्ट आहेत. राहुल गांधीच्या नेतृत्वाबाबत ३९ लोक असंतुष्ट आहेत. परंतु यश मात्र मविआला मिळणार. देशात मोदी लाट कायम आहे. भाजपा प्रणित रालोआला २९५ ते ३३५ जागा मिळतील आणि विरोधकांना १६५ ते २०० जागा मिळतील असे भाकीत या सर्व्हेमध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मोदींचे कमी अधिक कौतुक करणाऱ्यांचा टक्का ७१ टक्क्यांच्या आसपास असूनही ही लाट महाराष्ट्रात नसण्याचे कारण काय?
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नेतृत्व अधिक शक्तीशाली झाल्याचे कुठेही चित्र नाही. पक्ष फुटल्यानंतर बळ घटेल की वाढेल? बळ घटले नसते तर ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांची दाणादाण उडाली नसती. ग्राम पंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवत नाहीत, हा युक्तिवाद क्षण भर मान्य केला तरी या निवडणुका जनमनाचा कल स्पष्ट करतात हे तर मानाल कि नाही? प्रत्येक मतदार संघात उबाठा गटाची मतं, पवार गटाची मतं आणि काँग्रेसची मतं अशी बेरीज करून ४१ टक्क्यांचे गणित मांडण्यात आले असले तरी ते काही खरे नाही. भाजपासोबत निवडणूक लढवून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता मिळवता येते. परंतु ही आघाडी मोदींचा चेहरा दाखवून मिळालेली मतं घेऊ शकेल का?
ठाकरे आणि काँग्रेस ही अत्यंत अनैसर्गिक आघाडी आहे. अयोद्धेत भव्य राम मंदिर उभे राहते आहे, देशभरात श्रीरामांचा जय जयकार होतो आहे, हा जय जयकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले करू शकतात का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
मुंबईत मराठी मतदार फक्त उद्धव ठाकरेंसोबत आहे, असे म्हणण्याची स्थिती, कधीही नव्हती. आता तर एकनाथ शिंदे यांच्यासह ४० पेक्षा जास्त आमदार ठाकरेंची साथ सोडून बाजूला गेले आहेत. त्यांच्यासोबत मतदार किती गेले या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात असले तरी सगळे मतदार ठाकरेंसोबत आहेत, असा दावा संजय राऊतांशिवाय कोण करू शकेल?
गुजरात्यांबाबत शिउबाठाचे नेते सतत गरळ ओकत राहतात, त्यामुळे केम छो… वरळीसारख्या कितीही घोषणा दिल्या तरी गुजराती मतं त्यांना मिळण्याची शक्यता नाही.
हे ही वाचा:
कटू आठवणी विसरून विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालाय सज्ज!
राजोरी-पुंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी
नांदेडजवळ पूर्णा- परळी पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला आग
इस्रायली जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर हिंदी महासागरात तीन युद्धनौका करडी नजर ठेवणार
उत्तर भारतीय मतांबाबतही हीच परीस्थिती आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत लोकसभेच्या १० जागा आहेत. या सर्व जागा जिंकण्यासाठी गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांची गरज आहे हे ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मुंबईत दुधातील साखरेसारखे मिसळले असे विधान त्यांना करावे लागते. जैन मुनींचे आशीर्वाद घ्यायला धावावे लागते. केम छो वरळी… ची पोस्टर लावावी लागतात.
ठाकरेंकडे पक्षाचे चिन्ह नाही. कालपर्यंत शिवसेनेत निवडणुका लढवण्याची जबाबदारी, त्यासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ याची जमवाजमव करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर होती. ते आज ठाकरेंच्या सोबत नाहीत. शरद पवारांची स्थिती वेगळी नाही. जनता पार्टीच्या काळातही पंतप्रधान पदाचा चेहरा नव्हता, तरीही जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले. असे विधान पवारांनी केलेले आहे. ते उमेदवार विजयी झाले कारण तेव्हा इंदिरा गांधीच्या बाबत लोकांच्या मनात प्रचंड असंतोष होता. तसा तो आज नाही हे पाच राज्यातील निवडणुकांमधून समोर आले आहे, सी-व्होटरच्या सर्व्हेमध्येही हेच सत्य समोर आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला किमान ३५ ते ४० जागा मिळाल्या तर फार आश्चर्य वाटणार नाही. मोदींचा चेहरा हा या निवडणुकीत देशभरात जादू करणार आणि महाराष्ट्र त्याला अपवाद नसेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)